साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 05:59 AM2024-05-09T05:59:54+5:302024-05-09T06:00:15+5:30

Ajit Pawar InterView: भावकी-गावकीची नव्हे, देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक : अजित पवार, ‘लोकमत डिजिटल’ला दिलेल्या मुलाखतीत रोखठोक उत्तरे

Got Rajya Sabha in exchange for Satara lok sabha for BJP! Ajit Pawar's big hint on sending Partha Pawar to Delhi | साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत

साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मी कोणालाही आव्हान दिलेले नाही. मुळात ही निवडणूक भावकीची-गावकीची नाहीच; तर ही देशाचे भवितव्य ठरवणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध काँग्रेस नेते राहुल गांधी अशी ही निवडणूक आहे. देशात मोदींचे सरकार येणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांचा खासदार बारामतीतून केंद्रात पाठवून बारामती मतदारसंघातील सहा विधानसभांचा विकास करायचा आहे, असा निर्धार करीत बारामती लोकसभा निवडणूक ही काका विरुद्ध पुतण्या असल्याची बाबच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘लोकमत डिजिटल’ला दिलेल्या दिलखुलास मुलाखतीतून फेटाळून लावली. 
या मुलाखतीदरम्यान त्यांनी ८० तासांचे सरकार, सिंचन, राज्य सहकारी बँक घोटाळा तसेच सुनेत्रा पवार यांना लोकसभा निवडणुकीसाठी तयार करण्यापर्यंतच्या अनेक बाबींना दिलखुलासपणे उत्तरे दिली.

साताऱ्याची, परभणीची जागा का सोडली?
सन २०१९च्या निवडणुकीत ४८ जागांपैकी ४१ जागा भाजप-शिवसेनेच्या आलेल्या आहेत. त्यानुसारच जागावाटप झाले आहे. छत्रपतींच्या गादीपैकी कोल्हापूरची गादी महाविकास आघाडीकडे आहे. त्यामुळे साताऱ्याची गादी महायुतीकडे असावी, म्हणून भाजपकडून उदयनराजे यांना उमेदवारी देण्यासंदर्भात निर्णय झाला. ही जागा एवढी वर्षे राष्ट्रवादीच लढवत होती; परंतु त्या बदल्यात राज्यसभा देण्याचे आश्वासन देण्यात आले व ती देण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणेच परभणीतही आमचा उमेदवार निवडून येण्याची खात्री असतानाही आम्ही ही जागा रासपच्या महादेव जानकरांना सोडली, असा खुलासा अजित पवार यांनी केला. ही राज्यसभेची जागा पार्थ पवार यांना द्यायची की अन्य कोणाला, याबाबतचा निर्णयही पार्लमेंटरी बोर्डच घेईल, असा खुलासाही त्यांनी केला.

पवार-पवार समोरासमोर प्रथमच नाही
१९६२ पोटनिवडणुकीत माझे काका स्व. वसंतदादा पवार यांनी शेकापमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. तेव्हा आजी-आजोबा आणि अन्य त्यांच्या बाजूने होते; तर शरद पवार काँग्रेसचे काम करीत होते. आजही माझे थोरले बंधू राजेंद्र पवार, धाकटे बंधू श्रीनिवास पवार आणि पवारसाहेबांचा परिवार हे तीन परिवार एका बाजूला आणि माझा परिवार एका बाजूला आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

हुकूमशाही नाही, आमच्या पक्षात लोकशाही चालते...

राष्ट्रवादी पक्षात हुकूमशाही नाही. लोकशाहीने इथे निर्णय घेतले जातात. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवावी हा निर्णय मी घेतलेला नाही. तो निर्णय पार्लमेंटरी बोर्डाने घेतलेला आहे. पार्लमेंटरी बोर्डाने काही नावे सुचवली, त्यांत सुनेत्रा पवार यांचेही नाव होते. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, आपल्याला निवडणुकीला उभे करण्याचा निर्णय झाला तर ती आपल्याला  ती जागा लढवण्याची मानसिकता तयार करा. त्यानुसार त्यांनी आपली मानसिकता तयार केली आणि पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेतल्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Web Title: Got Rajya Sabha in exchange for Satara lok sabha for BJP! Ajit Pawar's big hint on sending Partha Pawar to Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.