Sudharshan Chakra Power : ब्रह्मास्त्रापेक्षाही घातक असलेल्या सुदर्शन चक्राचा वेग अणि वजन किती होतं? खासियत जाणून व्हाल अवाक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 01:42 PM2022-12-19T13:42:05+5:302022-12-19T13:55:49+5:30

भगवान विष्णू आणि त्यांचा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्ण यांनी याच सुदर्शन चक्राने अनेक राक्षसांचा वध केला आहे. आज आम्ही आपल्याला याच महासंहारक शस्त्रासंदर्भात माहिती देणार आहोत.

हिंदू धर्मातील त्रिदेव अर्थात ब्रह्मा, विष्णू आणि महेश. एक विश्वाचे निर्माते, दुसरे पालनकर्ता आणि तिसरे संहारक आहेत, असे मानले जाते. या तीनही देवांच्या शक्तीला मर्यादा नाही. ब्रह्मदेवांच्या महासंहारक शस्त्राचे नाव आहे ब्रह्मास्त्र, महादेवाकडे त्रिशूल आहे, तर भगवान श्री हरी विष्णूच्या बोटात आपण सुदर्शन चक्र पाहिले असेल.

भगवान विष्णू आणि त्यांचा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्ण यांनी याच सुदर्शन चक्राने अनेक राक्षसांचा वध केला आहे. आज आम्ही आपल्याला याच महासंहारक शस्त्रासंदर्भात माहिती देणार आहोत.

सुदर्शन चक्र हे नाव सु आणि दर्शन या दोन शब्दांनी मिळून तयार झाले आहे. याचा अर्थ होतो शुभ दृष्टी. सर्व महान शस्त्रास्त्रांपैकी सुदर्शन चक्र हे एकमेव असे शस्त्र आहे, जे नेहमीच गतीमान असते. ते कसे तयार झाले यासंदर्भात अनेक कथा आहेत. मात्र, ब्रह्मा, विष्णू, महेश आणि बृहस्पती यांच्या संयुक्त शक्तीपासून ते तयार झाले, असे काही धर्मग्रंथांमधून सांगते.

एक कथा तर अशीही आहे की, विश्वकर्मा यांनी हे शस्त्र तयार केले. विश्वकर्मा यांची मुलगी संजना हिचा विवाह भगवान सूर्य यांच्यासोबत झाला होता. मात्र, सूर्याच्या तेजामुळे तिला त्यांच्या जवळ जाता येत नव्हते. यासंदर्भात तिने तिच्या पतीला सांगितले. यानंतर विश्वकर्मा यांनी सूर्याचे तेज कमी केले. यानंतर जी धूळ उरली, ती विश्वकर्मा यांनी एकत्रित केली आणि त्यापासून तीन गोष्टी तयार केल्या. यात पहिले, पुष्पक विमान, दुसरे भगवान शंकर यांचे त्रिशूल आणि तिसरे सुदर्शन चक्र.

याशिवाय पुरानातील काही ग्रंथांमध्ये असेही म्हटले आहे, की एकदा राक्षसांनी स्वर्गावर आक्रमण करून देवांना बंदी बनवले. भगवान विष्णूही त्याचे रक्षण करू शकले नाहीत. यानंतर त्यांनी सहस्त्र कमल पुष्पांनी भगवान शिवशंकर यांची पूजा केली. त्यांच्या तपश्चर्येने भगवान शिव प्रसन्न झाले. मात्र, त्यांनी त्यांच्या मायेने एक कमळ गायब केले. जेव्हा भगवान विष्णूंना एक कमळ सापडले नाही तेव्हा त्यांनी आपला एक डोळा काढून शिवलिंगावर अर्पण केला. यानंतर भगवान शंकरांनी त्यांना सुदर्शन चक्र दिले, याच्या सहाय्याने भगवान विष्णूंनी राक्षसांचा नाश केला.

महाभारतानुसार, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाने खांडव वन जाळण्यासाठी अग्नि देवाला सहकार्य केले होते. या बदल्यात अग्नीदेवाने भगवान श्रीकृष्ण यांना एक चक्र आणि एक कौमोदकी नावाची गदा भेट केली होती. याशिवाय, भगवान परशुराम यांनी भगवान श्रीकृष्ण यांना सुदर्शन चक्र दिल्याचीही कथा प्रचलित आहे.

सुदर्शन चक्राची खासियत म्हणजे, ते शत्रूवर फेकले जात नाही. ते मनाच्या गतीने चालते आणि शत्रूचा नाश करूनच परतते. संपूर्ण भूमंडलावर यापासून वाचण्याचा कुठलाही मार्ग नाही.

पौराणिक ग्रंथांनुसार, ते एका सेकंदात लाखो वेळा फिरते. एवढेच नाही, तर ते क्षणात लाखो योजन (1 योजना-8 किमी) अंतर कापू शकते. सुदर्शन चक्राचे वजन 2200 किलो असल्याचे मानले जाते.

हे एक गोल शस्त्र आहे. जे आकाराने साधारणपणे 12-30 सेंटीमीटर व्यासाचे आहे. या चक्राला दातेरी किनार आहे. हे ब्रह्मास्त्रापेक्षाही अधिक शक्तीशाला शस्त्र असल्याचे मानले जाते.