गुरु-मंगल-बुधाचा शुभ योग: अयोध्येवर अपार रामकृपा, गतिमान विकास; ५ वर्षांत रामराज्य शक्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 07:07 AM2024-01-24T07:07:07+5:302024-01-24T07:07:07+5:30

Ayodhya Ram Mandir Ram Lala Pran Pratishtha Muhurat Kundali Astrology: राम मंदिर सोहळ्याच्या शुभ मुहुर्तावेळेची ग्रहस्थिती अयोध्या आणि उत्तर प्रदेशसाठी ‘संजीवनी’ ठरेल का? मुहूर्त कुंडली काय सांगते? जाणून घ्या...

रामनामाचा गजर, ५० वाद्यांचा निनादणारा मंगलध्वनी, पुरोहितांचे भारावून टाकणारे वैदिक मंत्रोच्चार अशा मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणात रामललांच्या मूर्तीची अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली. संपूर्ण देशभरात जय श्रीरामचा जयघोष गुंजला. रामभक्तांचे पाचशे वर्षांचे स्वप्न साकार झाले. या सुवर्णक्षणाची भारतासह अवघे जग उत्सुकतेने वाट पाहत होते.

अयोध्येत रामलला विराजमान झाला आहे. देशभरात एक नवचैतन्य पसरले आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला, त्यावेळी शुभ योग तयार झाला. तो केवळ अयोध्येसाठीच नाही तर संपूर्ण उत्तर प्रदेशसाठी शुभ ठरू शकेल. तसेच उत्तर प्रदेशच्या विकासात मोलाचे योगदान देईल. काही उलथापालथ आणि मोठे वाद होऊ शकतात, असे म्हटले जात आहे.

राम मंदिराचा भव्य सोहळा केवळ भारतात नाही तर जगभरात उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीरामजन्मभूमीवर प्रदीर्घ संघर्षानंतर उभारल्या जाणाऱ्या या मंदिराची पायाभरणी ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आली. राम मंदिराच्या पायाभरणीच्या वेळेबाबत काही वाद निर्माण झाले होते. आताही नामवंत शंकराचार्यांनी मंदिराच्या पूर्ण उभारणीपूर्वी राम मंदिर सोहळ्याबाबत काही प्रश्न उपस्थित केले.

आचार्य वेदमूर्ती पंडित गणेशवर शास्त्री द्रविड यांच्यानुसार, श्री रामलला प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त हा एक प्रकारचा संजीवनी मुहूर्त आहे. पाच बाणांपैकी रोग बाण, मृत्यू बाण, राज बाण, चोर बाण आणि अग्नी बाण यांपैकी एकही दोष विद्यमान नव्हता. पूर्वकालामृत या ज्योतिष ग्रंथात या संजीवनी मुहुर्ताची स्तुती करण्यात आली आहे.

याशिवाय मुहूर्त चिंतामणी ग्रंथात दिलेल्या नियमांनुसार, या प्राणप्रतिष्ठा मुहूर्तामध्ये या मुहूर्तामध्ये प्रचलित असलेले सर्व प्रमुख ग्रह दोष हे लग्नस्थानी असलेल्या गुरु आणि नवव्या तसेच त्रिकोण स्थानी असलेल्या बुध आणि शुक्राच्या युतीयोगाने निष्प्रभ होतात. अवकहडा चक्रानुसार, 'आ' हे अक्षर कृतिका नक्षत्राच्या पहिल्या चरणात मेष राशीत येते. प्राणप्रतिष्ठेच्या वेळी विराजमान गुरुपासून धन स्थानाच्या दुसऱ्या स्थानी बसलेल्या चंद्राशी शुभ योगात आहे. ग्रहांच्या या स्थितीमुळे पुढील काही वर्षांत अयोध्या उत्तर भारतातील सर्वात समृद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक बनू शकते.

वाल्मिकी रामायणानुसार, श्रीरामाचा जन्म इश्वाकु वंशात झाला. या वंशातील प्रमुख नक्षत्र म्हणजे विशाखा. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा वेळी विशाखा नक्षत्र संघटन चक्रात होते, विशाखा नक्षत्रावर सूर्याची दृष्टी होती. सूर्यदेव ही प्रभू रामाच्या वंशाचे पूजनीय देवता आहे. तिथी द्वादशी होती. ज्याचे देवता स्वतः भगवान विष्णू आहेत, ज्यांचा अवतार श्रीराम आहेत.

उत्तर प्रदेशची स्थापना कुंडली २४ जानेवारी १९५० च्या मध्यरात्रीची आहे. यावेळेस तूळ राशीचा उदय होत होता. चंद्र संघर्ष आणि विवादांच्या सहाव्या स्थानी मीन राशीमध्ये राहुच्या संयोगात होता. बाराव्या स्थानी बसलेल्या मंगळाची दृष्टी यावर होती. उत्तर प्रदेशच्या कुंडलीत राजसत्तेचा दशमेश चंद्राच्या अशुभ स्थितीमुळे या राज्यात प्रगतीचा वेग इतर राज्यांच्या तुलनेत खूपच मंद राहिला.

गेल्या काही वर्षांत येथे रस्ते, विमानतळ, नवीन रेल्वे मार्ग आदी पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास होत आहे. फेब्रुवारी २०२१ पासून उत्तर प्रदेशच्या कुंडलीतील राहुची विशोंत्तरी दशा सुरू झाली आहे. ही उत्तर प्रदेशच्या प्रगतीसाठी शुभ मानली जात आहे. कारण राहु मीन रास सहाव्या स्थानी आहे. त्याची राशीस्वामी गुरु, चतुर्थ स्थानातील शनी आणि मकर राशीत नीचभंग योग यांमुळे राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी चांगल्या संधी निर्माण होत आहेत.

पण सहावे स्थान वादाचे असल्याने पुढील वर्षी मार्च २०२५ मध्ये जेव्हा शनी मीन राशीत गोचर करेल, तेव्हा उत्तर प्रदेशच्या कुंडलीतील जन्मचंद्र आणि राहुवर भ्रमण काहीसे त्रासदायक ठरू शकेल. राज्यात राजकीय गोंधळ निर्माण होऊ शकतो. काही मोठे वादांना तोंड फुटू शकते, असे दावा केला जात आहे.

अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा मुहूर्त कुंडलीत गुरु ग्रह चर संज्ञक मेष राशीत आहे, जो नवमेश स्थितीत आहे. तर लग्न स्थानाचा स्वामी मंगळ नवव्या स्थानी गुरुशी अतिशय शुभ मानला गेलेला राशी परिवर्तनाचा राजयोग निर्माण करत आहे. लग्न स्थानातील गुरुवर लाभ एकादश स्थानातील शनीची शुभ दृष्टी पडत असून, एक उत्तम धनयोग जुळून येत आहे.

मंगळात शनीची विंशोत्तरी दशा फेब्रुवारी २०२५ पर्यंत आहे. या कालावधीत किंवा २०२६ मध्ये मंगळातील बुध ग्रहाच्या विंशोत्तरी दशाच्या वेळी श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये काही महत्त्वाचे बदल होऊ शकतात. सहाव्या (विवाद) स्थानाचा स्वामी बुध नवम स्थानात असल्यामुळे मोठ्या परिवर्तनाचा संकेत देत आहे. मंगळाची दशा ऑगस्ट २०२८ पर्यंत आहे, जी राशी आणि नवांशामध्ये शुभ वर्गांमध्ये असल्यामुळे राम मंदिर तीर्थक्षेत्रात जलद विकासाची ज्योतिषशास्त्रीय शक्यता दर्शवित आहे. सन २०२९ मध्ये कृत्तिका नक्षत्रावर शनीची दृष्टी येईल, तेव्हा अयोध्येतील विकासाचा वेग मंदावू शकतो, असा कयास बांधला जात आहे.

- सदर कोणत्याही दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.