Traffic Rules: 1 फेब्रुवारीपासून वाहतुकीचे नियम बदललेत! 10 हजारांचे चलन फाडणार, लायसन्सही रद्द होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 03:25 PM2023-02-03T15:25:51+5:302023-02-03T15:29:27+5:30

एवढेच नाही तर हे चलन थेट लोकांच्या बँक खात्यातून कापले जाणार आहे. यासाठी तिथेच एटीएम कार्डने स्वाईप करण्याची सोय करण्यात येत आहे.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिस कडक कारवाई करत आहेत. १ फेब्रुवारीपासून वाहतूक नियमांच्या चलनात मोठा बदल करण्यात आला आहे. वाहतुकीचे नियम तोडताना कोणी पकडले गेले तर त्याला 10 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जात आहे.

एवढेच नाही तर हे चलन थेट लोकांच्या बँक खात्यातून कापले जाणार आहे. यासाठी तिथेच एटीएम कार्डने स्वाईप करण्याची सोय करण्यात येत आहे. जर कोणी वाहतुकीचे नियम मोडून ठराविक लेनबाहेर गाडी चालवली तर त्याचे ड्रायव्हिंग लायसन्सही रद्द होऊ शकते.

आता हळहळू पोलिसांनी जुन्या वाहनांकडे लक्ष वळविण्यास सुरुवात केली आहे. त्यांची कागदपत्रे, पीयुसी आदी तपासले जात आहे. जर १५ वर्षांपेक्षा जुनी कार, बाईक किंवा वाहने सापडली तर ती जप्त केली जात आहेत. यामुळे या वाहनांच्या मालकांना थेट न्यायालयात जावे लागणार आहे. यामध्ये अधिकांश डिझेल गाड्या आहेत. या गाड्या स्क्रॅपमध्ये देखील पाठविण्याची तयारी सुरु झाली आहे.

जर तुम्ही तुमची टू-व्हीलर म्हणजे बाईक किंवा स्कूटर बदलली असेल, तर तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. पोलीस मॉडिफाईड दुचाकींना पकडून चालान करत आहेत. नवीन वाहतूक नियमांनुसार कोणत्याही वाहनात केलेले फेरफार बेकायदेशीर आहे. यासाठी तुम्हाला दंड होऊ शकतो. दुचाकीही जप्त केली जाऊ शकते.

वेगवेगळे आवाज करणारे हॉर्न तुमच्या सोबत चालणाऱ्या वाहन चालकांचे लक्ष विचलित करू शकतात. यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. मोटार वाहन कायदा 2019 मध्ये जोडलेल्या नवीन तरतुदींनुसार, कोणत्याही वाहनात स्वतंत्र प्रेशर हॉर्न लावणे बेकायदेशीर आहे. असे केल्यास चालकाला 500 रुपये किंवा त्याहून अधिक दंड होऊ शकतो. त्यामुळे वाहनात फॅन्सी हॉर्न किंवा सायरन लावणे टाळावे.

बरेच लोक त्यांच्या बाईकचे सायलेन्सर देखील बदलतात. अनेकदा रॉयल एनफिल्ड बुलेट वापरणाऱ्यांमध्ये वेगवेगळे दिसणारे, आवाज काढणारे सायलेन्सरची क्रेझ अधिक दिसून आली आहे. लोक बाइकमध्ये असे सायलेन्सर लावतात ज्यामुळे मोठा आवाज होतो किंवा त्यातून फटाक्याचे आवाज निघतात. अशा सायलेन्सरचा वापर केल्यास वाहतूक पोलिस तुम्हाला पकडून चालान करतील. यामुळे ध्वनीप्रदुषण होते.

मोटार वाहन कायद्यानुसार वाहनांमध्ये फॅन्सी नंबर प्लेट वापरणे बेकायदेशीर आहे. सरकारने नंबर प्लेटसाठी स्टाइल शीट निश्चित केली आहे. नंबर प्लेटवर तुमच्या वाहनाचा नंबर स्पष्ट दिसणे आवश्यक आहे. फॅन्सी पद्धतीने लिहिलेले असल्यास वाहतूक पोलीस अशांवर कारवाई करत आहेत.