जावाची तिसरी धाकड बाईक पेरक अखेर लाँच; किंमत दोन लाखांच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 07:43 PM2019-11-15T19:43:46+5:302019-11-15T19:47:00+5:30

Classic Legends ची भागिदार कंपनी महिंद्रा आणि महिंद्राने गेल्या वर्षी दाखविलेली Jawa Perak Bobber भारतात लाँच केली आहे. या धाकड बाईकची किंमत एक्स शोरुम 1.94 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. पेरकला जावाने भारतात पुन्हा एन्ट्री घेत असताना अन्य दोन मोटारसाकलींसोबत 2018 मध्ये दाखविले होते.

भारतीय मनांवर अधिराज्य गाजवलेल्या भन्नाट मोटारसायकल जावाने पुन्हा भारतात पाऊल ठेवले होते. रॉयल एनफिल्डच्या बुलेटला टक्कर देण्यासाठी जावाने एक नाही तर तीन खतरनाक लूक असलेल्या मोटारसायकल त्याही कमी किंमतीत लाँच केल्या होत्या. यातील सर्वात कमी जावा मोटारसायकलची किंमत 1.64 लाख, जावा 42 ची किंमत 1.55 लाख ठेवण्यात आली होती.

पेरक ही मोटारसायकल तर हार्ले डेव्हिडसनचा लूक देते.

गेल्या वर्षी पेरकची किंमत 1.89 लाख रुपये असल्याचे कंपनीने सांगितले होते. मात्र, बीएस 6 मानकांमुळे या बॉबर मोटारसायकलची किंमत 5 हजार रुपयांनी वाढविली आहे. 1946 मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ही बाईक पॅरिस मोटार शोमध्ये दाखविण्यात आली होती. याच बाईकवरून नव्या पेरकची संकल्पना घेण्यात आली आहे.

Jawa Perak मध्ये 334 सीसी सिंगल सिलेंडर, DOHC लिक्विड-कूल्ड मोटार देण्यात आली आहे. हे इंजिन 30 बीएचपी ताकद आणि 31 एनएम टॉर्क तयार करते. हे इंजिन 293 सीसीच्या जावा आणि जावा फोर्टी टू यांच्या इंजिनासारखेच आहे. मात्र, हे इंजिन जास्त ताकद आणि बोअरसोबत येते. 6 स्पीड गिअरबॉक्स आहे.

या बाईकची बुकिंग तीन तीन महिन्यांपुरतीच असणार आहे. यामुळे काही दिवसांत बुकिंग फुल झाल्यास पुढील तीन महिने एकही बुकिंग घेण्यात येणार नाही.

बीएस 6 इंधन उपलब्ध झाल्यावरच देशभरात ही बाईक टेस्ट ड्राईव्हसाठी उपलब्ध होणार आहे. सध्या देशात काही शहरांतच बीएस 6 इंधन मिळत आहे.