परभणी जिल्ह्यातील स्थिती: विहीर अधिग्रहण, टँकरसाठी ३६ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:02 AM2018-12-29T00:02:54+5:302018-12-29T00:03:53+5:30

जिल्ह्यात दुष्काळामुळे पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली असून विहीर अधिग्रहण व टँकरसाठी पंचायत समित्यांकडे एकूण ३६ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. प्रत्यक्ष टँकर मात्र एकाही गावामध्ये अद्याप सुरु नाही.

Status in Parbhani District: 36 proposals for the well acquisition and tanker | परभणी जिल्ह्यातील स्थिती: विहीर अधिग्रहण, टँकरसाठी ३६ प्रस्ताव

परभणी जिल्ह्यातील स्थिती: विहीर अधिग्रहण, टँकरसाठी ३६ प्रस्ताव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी :जिल्ह्यात दुष्काळामुळे पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली असून विहीर अधिग्रहण व टँकरसाठी पंचायत समित्यांकडे एकूण ३६ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. प्रत्यक्ष टँकर मात्र एकाही गावामध्ये अद्याप सुरु नाही.
जिल्ह्यात चालू वर्षी फक्त ६२.३० टक्के पाऊस झाला आहे. त्यामध्ये परभणी तालुक्यात ५९.२०, गंगाखेड तालुक्यात ६०.२०, पालम तालुक्यात ५८.४०, पूर्णा तालुक्यात ८९.७०, पाथरी तालुक्यात ५३ टक्के, मानवत तालुक्यात ६१.८०, सोनपेठ तालुक्यात ६२.७०, सेलू तालुक्यात ५६.८०, जिंतूर तालुक्यात ६२.८० टक्के पाऊस झाला होता. समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सर्वत्र टंचाई जाणवू लागली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांकडे टँकर व विहीर अधिग्रहणाचे ३६ प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यामध्ये पालम तालुक्यातून ४ प्रस्ताव दाखल झाले असून त्यापैकी एका प्रस्तावावर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. तीन प्रस्ताव तहसीलस्तरावर प्रलंबित आहेत. गंगाखेड तालुक्यातून सर्वाधिक म्हणजे १४ प्रस्ताव प्राप्त झाले असून एका प्रस्तावावर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांनी निर्गमित केले आहेत. १३ प्रस्ताव गटविकास अधिकारीस्तरावर प्रलंबित आहेत. सेलू तालुक्यातून ६ प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झाले आहेत. त्यापैकी एका प्रस्तावावर कारवाईचे आदेश तहसीलदारांनी निर्गमित केले आहेत. ५ प्रस्ताव गटविकास अधिकारीस्तरावर प्रलंबित आहेत. सोनपेठ तालुक्यातून ४ प्रस्ताव पं.स.कडे दाखल झाले असून हे सर्व प्रस्ताव गटविकास अधिकारी स्तरावर प्रलंबित आहेत.
मानवत तालुक्यातून दोन प्रस्ताव प्राप्त झाले असून दोन्ही प्रस्तावांवर कारवाई करण्याचे निर्देश तहसीलदारांनी संबंधित यंत्रणेस दिले आहेत. परभणी तालुक्यातून ६ प्रस्ताव पं.स.कडे दाखल झाले आहेत. त्यापैकी दोन प्रस्ताव गटविकास अधिकारी तर चार प्रस्ताव तहसीलस्तरावर प्रलंबित आहेत. पाथरी, जिंतूर, पूर्णा या तिन्ही तालुक्यातून एकही प्रस्ताव यासाठी दाखल झालेला नाही.
गटविकास अधिकारी स्तरावर सर्वाधिक प्रस्ताव प्रलंबित
जिल्ह्यातील ३६ पैकी तब्बल २४ प्रस्ताव गटविकास अधिकारीस्तरावर निर्णयाविना प्रलंबित आहेत. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १३ प्रस्ताव गंगाखेड येथील गटविकास अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत. तहसीलस्तरावर जिल्ह्यात ७ प्रस्ताव प्रलंबित आहेत. असे असले तरी जिल्ह्यात सध्य स्थितीमध्ये कुठेही टँकर सुरु करण्यात आलेले नाहीत.

Web Title: Status in Parbhani District: 36 proposals for the well acquisition and tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.