परभणी जिल्यातील प्रकल्पात केवळ २८ टक्के पाणीसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 06:10 PM2018-02-23T18:10:48+5:302018-02-23T18:13:17+5:30

मुख्य प्रकल्पांसह मध्यम व  लघु प्रकल्पात एकूण २२३़८८२ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून, प्रकल्पाच्या क्षमतेच्या तुलनेत २८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Only 28% water stock in Parbhani district's projects | परभणी जिल्यातील प्रकल्पात केवळ २८ टक्के पाणीसाठा शिल्लक

परभणी जिल्यातील प्रकल्पात केवळ २८ टक्के पाणीसाठा शिल्लक

googlenewsNext
ठळक मुद्देजिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पातून परभणी शहरासह जिंतूर, पूर्णा या दोन मोठ्या शहरांनाही पाणीपुरवठा होतो़तसेच जिंतूर तालुक्यातील शंभरहून अधिक ग्रामीण गावांच्या पाणीपुरवठाची भिस्तही याच प्रकल्पावर अवलंबून आहे़ मात्र दोन वर्षांपासून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला नाही़ त्यामुळे मोठ्या शहरांसह ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़

परभणी : जिल्ह्यातील मुख्य प्रकल्पांसह मध्यम व  लघु प्रकल्पात एकूण २२३़८८२ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून, प्रकल्पाच्या क्षमतेच्या तुलनेत २८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे जिल्ह्यात आगामी काळात पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत़ 

परभणी जिल्ह्यात येलदरी आणि निम्न दूधना हे दोन मुख्य प्रकल्प असून, गोदावरी नदीवर बांधलेले चार बंधारे, दोन मध्यम प्रकल्प आणि २२ लघु प्रकल्पांतून जिल्ह्यातील विविध गावांना आणि शहरांना पाणीपुरवठा केला जातो़ मागील वर्षी सरासरीपेक्षा ३१ टक्के पाऊस कमी झाल्याने यावर्षीच्या प्रकल्पातील पाणीसाठ्यावर मोठा परिणाम झाला आहे़ सध्या नागरिकांना उन्हाळ्याची चाहूल लागली असून, उपलब्ध असलेले २८ टक्के पाणी जुलै महिन्यापर्यंत पुरविण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे़ 

जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पातून परभणी शहरासह जिंतूर, पूर्णा या दोन मोठ्या शहरांनाही पाणीपुरवठा होतो़ तसेच जिंतूर तालुक्यातील शंभरहून अधिक ग्रामीण गावांच्या पाणीपुरवठाची भिस्तही याच प्रकल्पावर अवलंबून आहे़ मात्र दोन वर्षांपासून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला नाही़ त्यामुळे मोठ्या शहरांसह ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़ ९३४ दलघमी क्षमता असलेल्या येलदरी प्रकल्पात ८०९़७७० दलघमी जीवंत पाणीसाठ्याची क्षमता आहे़ जीवंत पाणीसाठ्यातूनच पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाते़ सध्या या प्रकल्पात केवळ ३८़५२५ दलघमी एवढाच जीवंत पाणीसाठा शिल्लक आहे़ ४़७६ टक्के पाणी प्रकल्पात उपलब्ध असल्याने अनेक गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे़ जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांत मिळून १२०८़९८७ दलघमी पाणी साठवण्याची क्षमता आहे़ मात्र प्रत्यक्षात केवळ २२३़८८२ दलघमी म्हणजे २७़५८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे़ उन्हाळ्याला आणखी सुरुवातही झालेली नाही़ काही गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत आहे़ तर काही गावांत आतापासूनच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे़ 

जिल्हा प्रशासनाने जून अखेरपर्यंतचे टंचाई कृती आराखडे तयार केले आहेत़ पाणीटंचाई निर्माण झाल्यास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचीही आखणी केली आहे़ प्रकल्पांमध्ये शहरी व ग्रामीण भागासाठी पाण्याचे आरक्षणही करण्यात आले आहे़ जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या पाण्यातून नियोजन केले असले तरी आगामी काळात पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे प्रशासनाला आतापासूनच सतर्क रहावे लागणार आहे़ 

प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा
येलदरी प्रकल्पात ३८़५२५ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे़ तर सेलू तालुक्यातील निम्न दूधना प्रकल्पात १३२़०८१ दलघमी, झरी प्रकल्पात ०़६२२ दलघमी, करपरा मध्यम प्रकल्पात ८़६७५ दलघमी, मासोळी प्रकल्पात १़९९१ दलघमी, डिग्रस उच्च पातळी बंधार्‍यात २९़४८० दलघमी, मुदगल बंधार्‍यात ६़०१० दलघमी, ढालेगाव बंधार्‍यात ५़८८० दलघमी तर पिंपळदरी तलावामध्ये ०़६१८ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे़ गंगाखेड तालुक्यातील मुळीचा बंधारा मात्र पूर्णत: कोरडाठाक पडला आहे़ 

‘निम्न दुधना’तून घेतले पाणी
परभणी आणि पूर्णा या दोन शहरांना येलदरी प्रकल्पातून पाणी घेतले जाते़ दरवर्षी टंचाईच्या काळात याच प्रकल्पात दोन्ही शहरांसाठी पाण्याचे आरक्षण केले जाते़ मात्र यंदा येलदरी प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध नसल्याने निम्न दूधना प्रकल्पात या शहरांसाठी ३० दलघमी पाणीसाठा आरक्षित केला आहे़ त्यातून परभणी शहराला एक पाणी पाळी यापूर्वीच घेण्यात आली आहे़ दूधना प्रकल्पामध्ये ५४़५३ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने परभणी शहरवासियांच्या चिंता कमी झाल्या आहेत़

जिल्ह्यातील भूजल पातळी स्थिर
येथील भूजल सर्वेक्षण विभागाने जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील भूजल पातळीचे निरीक्षण नोंदविले आहे़ मागील पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी एकाही तालुक्यात पाणी पातळीत घट झालेली नाही़ त्यामुळे मागील पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यातील भूजल  पातळी समाधानकारक असून, पूर्णा तालुक्यात २़३४ मीटर आणि पाथरी तालुक्यात २़९४ मीटरवर भूजल पातळी गेली आहे़ 

Web Title: Only 28% water stock in Parbhani district's projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.