ठळक मुद्देबिदर ते गुलबर्गा या रेल्वे मार्गाचे उद्घाटन २९ आॅक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले़नव्या रेल्वे गाड्यांची घोषणा न केल्याने रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची निराशा केली आहे 

परभणी : बिदर-गुलबर्गा या रेल्वे मार्गाचे उद्घाटन करण्यात आले़ मात्र या मार्गावरून एकही नवीन गाडी सुरू केली नसल्याने मराठवाड्यातील रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची घोर निराशा केल्याचा आरोप मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केला आहे़ 

बिदर ते गुलबर्गा या रेल्वे मार्गाचे उद्घाटन २९ आॅक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले़ या मार्गामुळे उत्तर ते दक्षिण भारताला सर्वात जवळून जोडणारा रेल्वे मार्ग उपलब्ध झाला आहे़ या मार्गाचे उद्घाटन झाल्यानंतर या मार्गावरून पूर्वीपासूनच धावणा-या बिदर - हुमनाबाद या रेल्वेचा गुलबर्गापर्यंत विस्तार करण्यात आला. मात्र एकही नवीन गाडी घोषित केली नाही़ त्यामुळे मराठवाडा तसेच कर्नाटकातील प्रवाशांची घोर निराशा झाली आहे़ मार्ग सुरू होवूनही नवीन गाडी घोषित होत नसेल तर या नवीन मार्गाचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ 

मराठवाड्यातील परळी ते बिदर, परभणी मार्गे अकोला, नांदेड, औरंगाबाद, उस्मानाबाद ते बिदर, उस्मानाबाद - औरंगाबाद/नांदेड/अकोला आदी मार्गाची निर्मिती होवून अनेक वर्षे झाले. परंतु, प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे गाड्या उपलब्ध होत नाहीत़ त्यामुळे या मार्गावर नवीन रेल्वे गाड्यांची घोषणा करावी, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे प्रभाकर वाईकर, अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, राकेश भट, हर्षद शहा, शंतनु डोईफोडे, गौतम नाहटा, रविंद्र मुथा, नवीनकुमार चोैकडा, दीपक कुलथे, राजेश चव्हाण, ओंकारसिंह ठाकूर, प्रकाश मंडोत, संभानाथ काळे, डॉ़ राजगोपाल कालानी, दयानंद दीक्षित, प्रवीण थानवी आदींनी केली आहे़ 

नवीन रेल्वे गाड्यांची मागणी
बिदर - गुलबर्गा या मार्गावर कन्याकुमारी-कटरा, औरंगाबाद-हुबळी, वाराणसी-म्हैसूर, नांदेड - गोवा या चार नवीन रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे़ तसेच नांदेड-बेंगलूर रेल्वेला बिदर व पुढे विकाराबाद ऐवजी गुलबर्गा मार्गे वळवावे, अशीही प्रवासी संघटनेची मागणी आहे.