जिंतुर ग्रामीण रुग्णालयात औषधींच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 06:34 PM2018-05-30T18:34:06+5:302018-05-30T18:34:06+5:30

या रुग्णालयातील अधिकारी गरजूंना औषधी उपलब्ध करून देण्याऐवजी नाईलाज असल्याचे सांगत हतबलता दाखवत आहेत.

Due to the shortage of medicines in rural hospitals, | जिंतुर ग्रामीण रुग्णालयात औषधींच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल

जिंतुर ग्रामीण रुग्णालयात औषधींच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल

Next
ठळक मुद्देएकिकडे अ‍ॅलोपॅथी औषधी उपलब्ध नसताना औषधी भांडारात मात्र लाखो रूपयांची आयुर्वेदिक, होमिओपॅथी तसेच युनानी औषधी पडून आहे़त

- विजय चोरडिया 

जिंतूर (परभणी ) : येथील ग्रामीण रुग्णालयात विविध औषधींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असून, या रुग्णालयातील अधिकारी गरजूंना औषधी उपलब्ध करून देण्याऐवजी नाईलाज असल्याचे सांगत हतबलता दाखवत आहेत.

जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज ३०० ते ४०० रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णालयात सध्यस्थितीत कफसिरप, आॅक्सीटोसीन, पाम इंजेक्शन, अ‍ॅव्हील, रॅनिटिडीन, आमॉस्प्रिलीन, मेट्रो, सिप्रो, रॅबीज लस आदी औषधी अनेक दिवसांपासून उपलब्ध नाहीत. या रुग्णालयात आलेल्या बहुतांश रुग्णांना पॅरासिटीमॉल किंवा अ‍ॅन्टीबायोटिकच्या दोन गोळ्या किंवा पोटदुखी, अ‍ॅसिडिटीच्या दोन गोळ्या देऊन बोळवण केली जाते. गंभीर आजारी रुग्णांना वेळेवर औषधी उपलब्ध करून दिल्या जात नाही. तसेच गेल्या सहा महिन्यांत येथे बोटावर मोजण्या इतकेच सलाईन रुग्णालयात आले आहेत. त्यामुळे अतिसंवेदनशील रुग्णालाच येथे सलाईन लावले जाते. इतर रुग्णांना मात्र खाजगी दुकानातून औषधी व सलाईन आणण्याचा सल्ला येथील डॉक्टर देत आहेत.

विशेष म्हणजे गरजू रुग्णांना वेळेवर औषधी उपलब्ध न झाल्यास खाजगी दुकानातून ती खरेदी करण्यासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी रुग्णकल्याण समितीच्या माध्यमातून मिळत असतो. वर्षभरात याअंतर्गत आलेल्या निधीतून औषधी खरेदी झाली की, नाही,  याबाबत शंका उपस्थित होत आहे. तसेच मानव विकास मिशन यंत्रणेमार्फत वेगवेगळी शिबिरे घेण्यासाठी, कुटूंबकल्याण कार्यक्रमासाठी लाखोचा निधी उपलब्ध करून दिला जातो़ या निधी खर्चाची चौकशी होणे गरजेचे आहे़ तसेच ग्रामीण रुग्णालयात लाखो रुपये खर्च करून एक्सरे मशीन आणण्यात आली आहे. मात्र एक्सरे फिल्म नसल्याने पंधरा ते वीस दिवसांपासून या रूमला कुलूप आहे. त्यामुळे रुग्णांना खाजगी सेवा घ्यावी लागते.

आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि युनानी डॉक्टर देतात अ‍ॅलियोपॅथीची औषधी

एकिकडे ग्रामीण रुग्णालयाची अशी अवस्था असताना ट्रॉमाकेअरमध्येही फारशी समाधानकारक स्थिती नाही. येथे अर्थोपिडीक तज्ज्ञ नाही. भूलतज्ज्ञ आहे; परंतु, ते नियमित रुग्णांची तपासणी करतात. बालरोग तज्ज्ञही अपघात विभागात सेवा देतात. त्यामुळे नेमके ट्रॉमाकेअर काढले तरी कशाला, असा प्रश्न निर्माण होत आहे. अपघातातील जखमी रुग्णांवर मलमपट्टी करून त्यांना पुढील उपचारासाठी परभणीला पाठविले जाते. याकडे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिंधीचे दुर्लक्ष झाले आहे. तसेच प्रयोगशाळेतही शुगर कीट आदी तपासणीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध नाही.

रूग्णालयात अस्वच्छतेचा कळस
ग्रामीण रुग्णालयात अस्वच्छतेने कळस गाठला आहे़ बाथरुम व शौचालयात प्रचंड घाण असून रुग्ण वार्डामधील बेड अस्वच्छ आहेत. बेडवर फाटलेल्या गाद्या असून, त्यावर धूळ साचली आहे़ कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, प्रसुती वार्डातही मोठी दुर्गंधी पसरत आहे़ या इमारत परिसरात डुकरांचा मुक्त संचार असल्याने रुग्णांना जीव मुठीत धरून दवाखाना करावा लागत आहे़ तसेच इमारतीच्या चोहीबाजूच्या खिडक्याची तावदाने तुटलेली आहेत़ तुटलेल्या तावदानाला पुठ्ठे व पत्रे बसविलेले आहेत़ शौचालयाची स्वच्छता केली नसल्याने प्रचंड दुर्गंधी येते़ परिसराला लागून असलेल्या शवविच्छेदन गृह परिसरातील निवाऱ्याचाही भलत्याचा कामासाठी वापर होत आहे़

अ‍ॅलोपॅथी, युनानी औषधी पडून 
एकिकडे अ‍ॅलोपॅथी औषधी उपलब्ध नसताना औषधी भांडारात मात्र लाखो रूपयांची आयुर्वेदिक, होमिओपॅथी तसेच युनानी औषधी पडून आहे़ विशेष म्हणजे, या औषधीची मुदत संपत चालली आहे़ या औषधींवर धूळ साचली आहे़ औषधी उपलब्ध असताना आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी डॉक्टर अ‍ॅलोपॅथीची औषधी देत आहेत़ त्यामुळे रूग्णांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Due to the shortage of medicines in rural hospitals,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.