Biometric use for presence in 600 government offices in Parbhani district | परभणी जिल्ह्यातील ६०० शासकीय कार्यालयात उपस्थितीसाठी बायोमॅट्रिकचा वापर

- प्रसाद आर्वीकर 

परभणी : जिल्ह्यातील सुमारे १०३ शासकीय कार्यालयांच्या उपकार्यालय आणि या उपकार्यालयातील प्रत्येक विभागात सुमारे ६०० आधार बेसड् बायोमेट्रिक मशीन वाटप करण्यात आल्या असून, फेब्रुवारी महिन्याची उपस्थिती या मशीनवरच नोंदविली जात आहे़ विशेष म्हणजे, फेब्रुवारी महिन्याचा पगार या उपस्थितीवरूनच काढण्यात येणार असून, अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी बायोमेट्रिकसाठी नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे़ 

जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्या पुढाकारातून जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांना आधार बेसड् बायोमेट्रिक उपस्थिती नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे़ या प्रणालीत कर्मचार्‍यांच्या आधार क्रमांकावर नोंदणी केली जात असून, प्रत्येक कर्मचार्‍यांना आधार क्रमांक टाकून हजेरी नोंदवावी लागणार आहे़ या पद्धतीमुळे कर्मचार्‍यांच्या उपस्थितीवर जिल्हाधिकार्‍यांना काटेकोर नजर ठेवता येणार आहे़ जिल्हास्तरावर सुमारे १०३ शासकीय कार्यालये आहेत़ या कार्यालयांतर्गत तालुकास्तरावरील उपविभागीय कार्यालये आणि ग्रामस्तरावरील कार्यालये आहेत़ जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका अशा २३ आॅर्गनायझेशन तयार करण्यात आल्या असून, या आॅर्गनायझेशन अंतर्गत येणार्‍या कार्यालयातील सर्व विभागप्रमुखांना बायोमेट्रिक मशीन देण्यात आल्या आहेत़ ६०० बायोमेट्रिक वाटप झाले असून, बहुतांश ठिकाणी आधार बेसड् बायोमेट्रिकवर उपस्थिती नोंदविण्यास सुरुवात झाली आहे़ त्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील  १०० टक्के उपस्थिती याच प्रणालीद्वारे नोंदविली जात आहे़ 

परभणी जिल्हाधिकारी कार्यालय या प्रमुख आॅर्गनायझेशन अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभाग, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालये, सर्व तहसील कार्यालये, सर्व नगरपालिका आणि या कार्यालयांतर्गत येणारे उपविभाग, विभागप्रमुख यांची एकत्रित नोंदणी झाली आहे़ 
या शिवाय जिल्हा परिषद या आॅर्गनायझेशनमध्ये जिल्हा परिषदेतील शिक्षण, आरोग्य, लेखा, बांधकाम, जलसंपदा, कृषी, अर्थ, समाजकल्याण आदी उपविभाग, तालुकास्तरावरील कार्यालये, सर्व पंचायत समित्या त्यातील उपविभागांचा समावेश आहे़ अशा २३ शासकीय आॅर्गनायझेशन असून, त्यातील ६० टक्क्यांपेक्षा अधिक, अधिकारी आणि कर्मचार्‍यांची बायोमेट्रिक नोंदणी पूर्ण झाली आहे. या सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन याच बायोमेट्रिकच्या आधारे केले जाणार आहे़ उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जिल्हाभरातील २ हजार २९३ अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन पूर्ण झाले आहे़ 

फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत सर्वच्या सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांना आधार बेसड् बायोमेट्रिकचे रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे़ काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारी महिन्यात  ज्यांचे रजिस्ट्रेशन झाले नाही, त्यांचा पगार काढण्यासाठी सवलत देण्यात आली आहे़ मार्च महिन्यापासून मात्र प्रत्येक कर्मचार्‍याचा पगार हा आधार बेसड् बायोमेट्रिकवरच काढण्यात येणार आहे़ त्यामुळे या हजेरी नोंदविण्याच्या नवीन प्रणालीमुळे अधिकारी, कर्मचार्‍यांची कार्यालयीन उपस्थिती  वाढणार आहे़ 

‘ई-मेल आयडी’मुळे अडचण
आधार बेसड् बायोमॅट्रिक सुरू करण्यासाठी शासनाच्या संकेतस्थळावरील ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे़ जिल्ह्यातील काही विभागप्रमुखांचे शासकीय संकेतस्थळावर ई-मेल आयडी उपलब्ध नाहीत़ हे ई-मेलआयडी एनआयसी दिल्ली येथून जनरेट होतात़ त्यासाठी १० ते १५ दिवसांचा कालावधी लागतो़ त्यामुळे अशा विभागप्रमुखांच्या अंतर्गत असलेल्या कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी फेब्रुवारी महिन्याची मुभा देण्यात आली आहे़ कर्मचार्‍यांचे रजिस्ट्रेशन मात्र करून घेण्यात आले आहेत़ 

कर्मचार्‍यांना होणार फायदा
आधार बेसड् बायोमेट्रिक पद्धतीत ८ तासांपेक्षा अधिक काम करणार्‍या कर्मचार्‍यांचीही नोंद घेतली जाणार आहे. चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांना आगाऊ काम केल्यानंतर त्या कामाचे पैसे मिळतात. यामुळे अधिकचे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना लाभ होणार आहे.

ग्रामीण भागासाठी ३५० टॅब
जिल्हा आणि तालुकास्तरावरील शासकीय कार्यालयांमध्ये आधार  बेसड् बायोमेट्रिक सुरू करण्यात आले आहेत़ आता ग्रामीण भागातही हे बायोमेट्रिक सुरू केले जाणार आहेत. ग्रामीण भागात अनेक वेळा वीज पुरवठा उपलब्ध नसतो़ इंटरनेटचे कनेक्शन मिळत नाही़ अशा परिस्थितीत अडचणी येऊ नयेत, यासाठी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी ३५० एमएफएस टॅब मागविले आहेत़ येत्या एक-दोन दिवसांत हे टॅब उपलब्ध होणार आहेत़ ग्रामपंचायत कार्यालय किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेत हे टॅब बसविले जाणार असून, या टॅबला विजेची आवश्यकता नाही़ वायफाय किंवा मोबाईल सीमकार्डद्वारे इंटरनेटची जोडणी होणार आहे़ टॅबवरच थम्ब करण्याची सुविधा आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, आरोग्य कर्मचारी, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, कर्मचारी यांना याच टॅबवर आपली उपस्थिती नोंदवावी लागणार आहे़ 

जिल्हाधिकार्‍यांचे राहणार नियंत्रण
आधार बेसड् बायोमेट्रिक यंत्रणा ही तांत्रिकदृष्ट्या सक्षम यंत्रणा आहे़ या यंत्रणेत आधार क्रमांकावरून हजेरी नोंदविल्यानंतर कर्मचार्‍यांनी कोठून हजेरी नोंदविली, त्याचे लोकेशन प्राप्त होते़ तसेच एका क्लिकवर कर्मचार्‍यांची इत्यंभूत माहिती उपलब्ध होते़ जसे उशिरा येणार्‍या कर्मचार्‍यांची यादी एकाच क्लिकवर उपलब्ध होणार आहे तर आठ तासांपेक्षा अधिक काम करणार्‍या कर्मचार्‍यांची यादीही मिळणार आहे़ त्याच प्रमाणे कर्मचार्‍याने हजेरी नोंदविल्यानंतर त्याचे लोकेशनही समजणार आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कर्मचार्‍यांवर या यंत्रणेमार्फत जिल्हाधिकार्‍यांचे नियंत्रण राहणार आहे. काही अधिकारी, कर्मचार्‍यांना दौर्‍यावर जायचे असेल तर याच बायोमेट्रिकवरून आॅनलाईन रजा टाकावी लागणार आहे़  आॅनलाईन दौरा टाकल्यानंतर तो विभागप्रमुखांच्या लॉगीनद्वारे मंजूर होणार आहे़ त्यामुळे विभागप्रमुखांनाही दौर्‍यावर गेलेल्या कर्मचार्‍यांची माहिती उपलब्ध होणार आहे.