परभणी शहरातून २२ टिप्पर गेले चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:34 PM2017-11-24T23:34:35+5:302017-11-24T23:34:43+5:30

शहरातील विविध भागातून गेल्या दीड वर्षात तब्बल २२ टिप्पर चोरीस गेले असून यातील एकाही टिप्परचा तपास लावण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळालेले नाही. त्यामुळे वाहनधारकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

22 stolen items from Parbhani city | परभणी शहरातून २२ टिप्पर गेले चोरीस

परभणी शहरातून २२ टिप्पर गेले चोरीस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील विविध भागातून गेल्या दीड वर्षात तब्बल २२ टिप्पर चोरीस गेले असून यातील एकाही टिप्परचा तपास लावण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळालेले नाही. त्यामुळे वाहनधारकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
परभणी शहरात गेल्या दीड वर्षापासून टिप्पर चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत. या संदर्भात पोलिसांत तक्रार देऊनही फारशी गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचा प्रकार समोर येत आहे. या दीड वर्षात तब्बल २२ टिप्पर चोरीला गेले आहेत.
विशेष म्हणजे टिप्पर चोरणारी पर जिल्ह्यतील टोळी शहरात कार्यरत असून या टोळीला स्थानिक काही व्यक्तींची मदत असल्याचे टिप्पर चालकांचे म्हणणे आहे. या संदर्भात पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर प्रारंभी तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली जाते. नंतर तक्रार दाखल करण्यासाठी तगादा लावल्यास तक्रार नोंद करुन घेण्याची औपचारिकता पूर्ण केली जाते. तपास मात्र केला जात नसल्याचा अनुभव टिप्पर चालकांनी व्यक्त केला आहे. सर्वसामान्य टिप्पर चालकांना याबाबतचा अनुभव येत असताना राजकीय नेत्यांच्या धाकांमुळे एक- दोघांचे चोरीला गेलेले टिप्पर सापडल्याचाही अनुभव काहींनी व्यक्त केला.
टिप्पर चोरीची नुकतीच एक घटना शहरातील काद्रबाद प्लॉट भागात घडली. शंकर किशनराव नाईकनवरे यांचे एम.एच.१७ ए ६२४७ या क्रमांचे टिप्पर १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री सरकारी दवाखान्याजवळील त्यांच्या घर परिसरात उभे केले असता अज्ञात व्यक्तींनी ते चोरुन नेले. याबाबत त्यांनी २० नोव्हेंबर रोजी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला. परंतु, तक्रारीमध्ये टिप्परची किंमत फक्त ५० हजार रुपये दर्शविली गेली. अधिक रक्कम तक्रारीत दर्शविल्यास वरिष्ठ अधिकाºयांकडून तपासासाठी विचारणा होईल म्हणून या वाहनाची कमी रक्कम पोलिसांनी नोंदविली गेली असल्याचे नाईकनवरे यांनी सांगितले. याबाबत वारंवार विनंती करुनही वेगाने तपास केला जात नसल्याचे ते म्हणाले.
चोरलेले टिप्पर भंगारात
४टिप्पर चोरणारी परजिल्ह्यातील एक टोळीच कार्यरत असून त्यांना स्थानिकांची मदत असल्याचे जाणकारांनी सांगितले. बहुतांश वेळा चोरुन नेलेला टिप्पर तोडून तो भंगारात विकला जातो किंवा परभणीपासून १०० ते २०० कि.मी.अंतरावर असलेल्या भागात तो विक्री करुन खदानीच्या कामासाठी नंबर प्लेट न लावता वापरला जातो, असेही जाणकारांचे मत आहे. टिप्पर चोरीच्या घटना मध्यरात्री होत असताना गस्तीवरील पोलिसांच्या निदर्शनास ही बाब कशी काय येत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

Web Title: 22 stolen items from Parbhani city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.