सोशल मीडियात जोकर ठरताय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:51 PM2019-01-31T12:51:45+5:302019-01-31T12:52:42+5:30

सोशल मीडियात तर आपण सारेच असतो, पण या 5 वाईट सवयी तिथं आपला घात करतात.

social media making you fool? | सोशल मीडियात जोकर ठरताय का?

सोशल मीडियात जोकर ठरताय का?

Next
ठळक मुद्देसतत इतरांवर टीका करण्याची, ट्रोलिंगची सवय अनेकांना लागलेली दिसते

-निशांत महाजन

सोशल मीडिया हे असं एक जाळं आहे, जे आपण वाढवतो आणि आपणच त्यात फसतो, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. हल्ली सगळेच जण म्हणतात की जरा सोशल मीडियाचा उपवास करायला हवा. जरा कमी करायला हवा वापर. अर्थात ते काही होत नाही. आपण सोडून बाकी सगळेच सोशल मीडिया वापराचा अतिरेक करत आहेत, असंही वाटणारे अनेकजण असतात. ते सतत पाहात असतात, कोण काय पोस्ट करतं, किती पर्सनल गोष्टी शेअर करतं, कोण किती फोटो टाकतं आणि मग ते पाहून बसल्याजागी चिडचिड करणारे, आणि आपण नाही बरं का तसे याचं समाधान मानणारेही अनेकजण असतात. मुद्दा काय - कितीही वापरत नाही असं म्हटलं तरी आपण सारे सोशल मीडिया वापरतोच. त्या ऑनलाइन वावरण्यातही आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप असतेच. त्यामुळे आपण एरवी जसे असतो त्या आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या खुणा आपल्या सोशल मीडिया वापरातही दिसतातच. 
आपला चांगूलपणा तर काय, आपण त्याच्या प्रेमातच असतो, त्याची चर्चा करण्यात काही हाशील नाही. मात्र आपल्या काही वाईट सवयी  सोशल मीडियात वावरतानाही दिसतात. मात्र त्या आपण मान्य करत नाहीत किंवा आपल्या लक्षातही येत नाही. 
पण म्हणून त्या आपल्याला नसतात असं नाही. त्या सवयींवर एक नजर टाका, आपण आपलाच इतिहास कसा जगजाहीर लिहितो आहे आणि त्यामुळे आपलं हसं होतं आहे, ते आपल्या लक्षातही येत नाही!

 त्या कोणत्या सवयी?

1) हमरीतुमरीवर येणं
आपल्याला व्यक्तिगत आयुष्यातही हमरीतुमरीवर येण्याची सवय असते. विनोद कळत नाहीत. तेच आपण ऑनलाइनही करतो. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक इथं लहानसहान कारणांनी जाहीरपणे भांडत असतो. कुणी काहीही लिहो, ते आपल्यालाच उद्देशून लिहिलेलं आहे, आपला अपमान करण्यासाठीच लिहिलेलं आहे असं वाटून थेट भांडायला उठणं, आणि समोरच्याचा अपमान कसा करता येईल या टोनमध्ये लिहिणं. आपण दुसर्‍या व्यक्तीची नाही तर आपलीच पत घालवतो आहोत, हे वेळेत लक्षात आलेलं बरं! 

2) ढमकन बोलणं
आता ही तर काय अनेकांना असतेच. नको तिथं नको ते, औचित्यभंग होईल असं अनेकजण बोलतात. मग सांगत बसतात, मला असं नव्हतं म्हणायचं. तेच सोशल मीडियातही होतं. आपण इतरांच्या पोस्टवर काहीतरी वाट्टेल ते बरळतो आहे, ढमकन बोलतो आहे हेच कळत नाही. मात्र इतरांचा सतत रसभंग होतो, ज्याच्या पोस्टवर लिहिलं त्याला असे खासगी तपशील, अवास्तव, अस्थानी विनोद आवडत नाही; पण सुधारणा करायला चूक तर लक्षात यायला हवी?

3) शो-ऑफ
प्रत्यक्षात काहीच खरं नसतं. बडा घर पोकळ वासा पण सोशल मीडियात अनेकजण इतकं शो ऑफ करतात. एकेक श्वासाचा हिशेब लिहितात. कुठं गेलं, काय खाल्लं, काय केलं, किती रुपयांचे कपडे, आपलंच कौतुक, आपलीच आरती गात राहाणं, हे इतकं अति होतं की लोकांना हळूहळू कळायला लागतं की हे खोटं आहे. त्यानं लोक आपल्याला गांभीर्यानं घेणंच बंद करतात.

4) प्रेमप्रदर्शन
काही मित्र-मैत्रिणी,नवरा-बायको, प्रियकर-प्रेयसीच नाही तर अनेकजणही आपलं इतरांवर असलेलं आणि नसलेलंही प्रेम अति व्यक्त करतात. अघळपघळ लिहितात, इतकं प्रेमळ लिहितात, इतकं भयंकर प्रेम दाखवतात की त्यामुळे दुसर्‍यांची करमणूक होते. लोक टिंगल करतात, आणि आपल्या नात्याचा जाहीर चव्हाटा होतोय हे तर अनेकदा लक्षातही येत नाही. 

5) टीका करणं
सतत इतरांवर टीका करण्याची ट्रोलिंगची सवय अनेकांना लागलेली दिसते. सतत तिरकं, खोचक आणि कडवट लिहायचं. सतत नाक वर, आपली टेस्ट किती भारी, बाकीचे किती टुकार असा त्यांचा स्वर. स्वतर्‍ काहीच करत नाहीत, कर्तृत्व कोमटच, पण इतरावर मात्र सतत टीका करतात. त्यांनाही कुणी गांभीर्यानं घेत नाही.

 

Web Title: social media making you fool?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.