डोक्यात शंकासुरांचा धिंगाणा ! जर-तरची भीती आणि त्या भीतीचं चक्र आपण भेदणार कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 01:15 PM2017-08-31T13:15:31+5:302017-08-31T13:16:10+5:30

बसने कुठं प्रवासाला जायचं, तर जागा मिळेल का? बस वेळेवर येईल का? खिडकी मिळेल का? ट्रॅफिक असेल का? शेजारी बरी व्यक्ती असेल की कुणी डेंजरस असेल? गाडी वाटेत पंक्चर झाली तर? पाकीट हरवलं तर? किती प्रश्न. साधा एक बसचा प्रवास, त्यात एवढी भीती, एवढ्या शंका. त्यानंच आपण चिंतातुर. कधी असा विचार करतो का, या बसप्रवासात काहीतरी खास घडेल, वेगळा अनुभव येईल, मजा वाटेल. नाही ना? का आपण इतके घाबरतो सतत?

Scolding the head! If you fear the fear and fear of the cycle of fear? | डोक्यात शंकासुरांचा धिंगाणा ! जर-तरची भीती आणि त्या भीतीचं चक्र आपण भेदणार कसं?

डोक्यात शंकासुरांचा धिंगाणा ! जर-तरची भीती आणि त्या भीतीचं चक्र आपण भेदणार कसं?

Next

-प्राची पाठक
बस, ट्रेन, विमान मिळेल की चुकेल?
- असा प्रश्न कितीही वेळ हाताशी असला तरी मनात सारखा येऊन जातो का? बस मिळालीच तर त्यात जागा मिळेल का? की आधीच रिझर्व्हेशन करून टाकायचं? रिझर्व्हेशन करून बसमध्ये जाऊन बसलं आणि बस रिकामी दिसलीच तर उगाच रिझर्व्हेशन केलं असं स्वत:ला टोचणं सुरू होतं. रिझर्व्हेशन नसतं केलं तर काय, कसं झालं असतं याबद्दल मनात अनेक शक्यता तयार होत राहतात. असंच जाऊन बस पकडायची असेल, तर बस वेळेवर येईल ना? आपण अमुक वेळेत पोहोचू ना? बसला गर्दी नसेल ना? जागा मिळालीच तर खिडकीची मिळेल ना? आपल्या शेजारी येऊन बसलेली व्यक्ती बरी असेल ना? फोनला रेंज असेल ना?
काय काय डोक्यात सुरू होतं. छोट्या मोठ्या प्रवासासाठी. त्यात तुम्ही त्याच मार्गाने या पूर्वी अशाच बसनं गेलेले असता आणि बस बंद पडलेली असते. पंक्चर झालेली असते. ट्रॅफिक असते. ट्रॅफिक असेल की नसेल अमुक वेळी याबद्दलदेखील मनात अनेक उलट सुलट प्रश्न सुरू असतात. प्रवासापेक्षा जास्त वेळ आपला या प्रश्नांमध्ये जातो एकेकदा.
एखाद्या कार्यक्र माला जायचं असतं. आपण मनातून घाबरलेले असतो. तिथं काय होईल याची आधीच कल्पना करत बसतो. कोण येईल, काय बोलेल आपल्याला, कसं दिसू आपण, आपला तिथं सहभाग कसा असेल? आपण कोणाशी कसं वागायचं याची स्ट्रॅटेजी मनात आखत बसतो. ती व्यक्ती येणार की नाही, ते ही नीटसं माहीत नसतं. घटना अमुकच प्रकारे घडतील की नाही, ते ही आधी माहीत नसतं. ऐनवेळी काही बदलू शकतं. कधी अगदी ठरल्याप्रमाणं सगळे घडू शकतं, वगैरे. पण आपल्याला ठरावीक लोकांना सामोरे जायचा कंटाळा आलेला असतो. कोणाला तरी सामोरे जाताना आपण अमुक प्रकारेच दिसायला पाहिजे, असं वाटत असतं. कल्पनाविश्वात याबद्दल स्वत:शीच खूप काथ्याकूट करून आपण करायचं म्हणून ती गोष्ट करतो किंवा कितीही साधीशी वाटत असली तरी ती गोष्ट करणंच टाळतो. घरातले, कामाच्या ठिकाणचे, मित्रमंडळातले मागे लागतात, चल-चल, आटोप लवकर, कर पटपट.
पण आपण टाळतो. अनेकदा टाळतो.
अमुक गोष्ट रोज करायला कोणी सांगितली की, आपण परत कल्पनेचा धबधबा सुरू करतो मनात. असंच होईल, तसं होईल. हे जमणार नाही, ते अवघड आहे. एकट्यानं कसं करू? सोबत पाहिजे. अमुक सोबत नकोच. तमुक झालं की ढमुक करू. मला नाहीच जमणार. असे अनेक अडथळे प्रत्यक्ष असो की नसो, आपल्या मनात आधीच येऊन गेलेले असतात. त्यांना आपण कसं सामोरं जातो, यावर ते काम होईल की नाही, झालं तर कसं होईल आणि त्याही पलीकडे जाऊन त्याचा आनंद आपण घेऊ शकू का? असे अनेक मुद्दे असतात. कामं टाळली जातात, ती याहीमुळे. अनेकदा आपण काल्पनिक शक्यतांमध्येच वावरत असतो. वास्तव कदाचित त्याहून बरं आणि सुसह्य असू शकतं. पण आपण मनातच अडचणींचा डोंगर इतका मोठा करून ठेवलेला असतो की तो उपसण्यापेक्षा, तिथं भिडण्यापेक्षा ते काम टाळणं, तिथून पळ काढणं, पुढे ढकलणं जास्त सोयीचं वाटू लागतं.
आधीच्या बसच्या उदाहरणात किंवा कार्यक्र माला जायच्या उदाहरणात काहीतरी मजेदार आणि अनपेक्षित ट्विस्ट असू शकतो, ही शक्यताच मन आपल्या काल्पनिक भीतीपुढे तग धरूदेत नाही. त्यावर आपण विचार करत नाही. मग आपण असे प्रवास टाळू लागतो. पुढच्या कार्यक्र माला जाऊ, नंतर करू किंवा उरकून टाकू एकदाचं असं स्वत:ला सांगतो आणि ती वेळ मारून नेतो.
नजीकच्या भविष्यात अमुकच होईल आणि मग तमुक होईल, या विचारांनी मन व्यापलं जातं. हा असं म्हणेल आणि ती तशी वागेल, अशी गणितं सुरू राहतात. हे करायला गेलो, तर ते होईल आणि त्यातून अजून भलतंच काही घडेल अशी अवाजवी चिंता आपलं मन पोखरत राहतं आणि केवळ या मनातल्या, केवळ काल्पनिक अडथळ्यांना शरण जाऊन आपण ती एक गोष्ट करणं टाळत राहतो. तशा प्रकारच्या इतरही अनेक गोष्टींसाठी मनाची दारं बंद करून ठेवतो.
मग एखादी गोष्ट न करताच चिंता आणि चिंतेमुळे ताण वाढत जातो. ती गोष्ट करायची मजा दूरच राहते आणि मनातच शंभर शंका कोरल्या जातात. ते काम अतिशय निरस होऊन जातं. नवीन पैलू दिसू शकत नाहीत. मजा वाटत नाही. ते आहे त्यापेक्षा खूप अवघड वाटू लागतं.
तरीही ते करावं लागलं तर होईल-बघू- करू चक्र सुरू होतं. आणि आपण करत काहीच नाही. करतो फक्त विचार, तो ही पोकळ. नुस्ता वरवरचा, जरतरचा!

पोकळ विचार आणि भीतीचं हे चक्र भेदायचं कसं?
हे चक्र भेदायचं असेल, तर आपलं असं होतं का लहानसहान बाबतीत, ते स्वत:ला विचारून बघूयात.
नकोश्या वाटणाºया, आधीच भीती आणि चिंता मनात बसलेल्या कामाबद्दल अशी कोणती छानशी गोष्ट आपल्याला जोडता येईल का, जी आपल्याला मनापासून आवडते? त्यात टप्पे आखता येतील का? शेड्यूल आखता येईल का? ते बघायचं.
एखादा छोटासा टप्पा पार केल्यावर स्वत:लाच एखादं बक्षीस द्यायचं. त्यात गोडी वाढेल, असे काय काय मुद्दे आपण आणि आपल्या आजूबाजूचे आणू शकतो, ते ठरवायचे.
अशातूनच एखाद्या कामाविषयीची भीती हळूहळू कमी होऊ शकते. त्यातली गोडी वाढू शकते. आणि गोडी वाढली की कामं टाळली जायची शक्यता आपोआपच कमी होते. कालांतराने तेच काम अधिकाधिक व्यवस्थित आणि वेगानं होऊ लागतं. त्यासाठी मनातल्या कल्पनाविश्वावर पाळतच ठेवावी लागेल. एकेक मुद्दा हाणून पाडत, नवा पैलू जोडत कामाला भिडावं लागतं.
एकदा भिडलं की होईलच मग ते! होतंच!!

 prachi333@hotmail.com




 

 

Web Title: Scolding the head! If you fear the fear and fear of the cycle of fear?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.