चुकलं तर चुकलं, करु तरी!

By admin | Published: March 31, 2016 02:32 PM2016-03-31T14:32:54+5:302016-03-31T14:32:54+5:30

बॅँकेत जायची भीती वाटते? एटीएम कार्ड सरकवताना धास्ती वाटते, काही चुकलं तर? कुठं सरकारी कार्यालयात जाऊन दाखला मागायचा तर कुणी डाफरलं तर काय अशी लाज वाटते? यावर उपाय काय?

If you make a mistake, then do mistake! | चुकलं तर चुकलं, करु तरी!

चुकलं तर चुकलं, करु तरी!

Next
>गेल्या आठवडय़ात आमच्या शाळेच्या दारात चक्क बँक आली. आता तसा प्रसंग काही फार आश्चर्याचा नाही. बरेच बँकवाले त्यांच्या योजना खपवायला आपल्या दारात येत असतातच. पण ही शाळा आहे तालुक्याच्या गावापासून फारच आतल्या गावातली. शिवाय बँक फक्त शाळेच्या दारात नाही आली तर या ‘बँक ऑफ जव्हार’ने काही तासांसाठी चक्क आपली शाखाच उघडली इथे.
त्याचं झालं असं की बँका, सरकारी कार्यालये अशा ठिकाणी जाऊन आपलं काही काम करणं हे  अनेकांसाठी पहिले  काही वेळी तरी धडधडवणारं, घाबरवणारंच असतं. एखाद्या बँकेत, सरकारी कार्यालयात जाऊन एखादं काम करण्याची आपली पहिली वेळ आठवून पहा! कसे होते ते क्षण? मजेचे? उत्सुकतेचे? उत्कंठेचे? की धास्तीचे? भीतीचे? लाजेचे? 
आमचं जव्हार गाव आहे तसं छोटंसंच. इथे बँका, सरकारी कार्यालयात कामानिमित्त आसपासच्या खेडेगावातले तरूण येत असतात. तेव्हा कायम दिसणारा भाव असतो तो हा धास्तीचाच. भीतीचा. लाजेचा. 
कसली असते ही भीती किंवा लाज?  
लहानपणापासून असते ती आपल्यासोबत. वर्गात शिकताना एखादं गणित समजलेलं नसतं. विज्ञानातली एखादी व्याख्या कळालेली नसते. आपण विचारतो का वर्गात? नाही. कारण तसं विचारायचं नसतं ही आपल्या शाळा आणि शिकण्याची पद्धत जुनी आहेच. आपलं एखादं चुकलेलं गणित, चुकलेलं स्पेलिंग, चुकलेला प्रश्न यांची चेष्टा झालेली आपण अनुभवलेली असते. ‘कुणी ओरडेल का’ नाहीतर ‘हसेल का’ ही भीती तेव्हापासून जी एकदा शिरते ती आपल्या मनात चांगलंच घर करते. त्यामुळे तोंड उघडण्यापूर्वी शंभरदा मनाशी उजळणी केल्याशिवाय तोंड उघडण्याचं साहस आपण सहसा करत नाही. ‘चुकीचं बोलण्यापेक्षा न बोललेलं बरं’ याच संस्कारात वाढलेले आपले शिक्षक. आपणही तोच वारसा चालवतो. 
सतत बरोबरच करण्याचं-वागण्याचं-बोलण्याचं शिक्षण आपल्याला केवढय़ा ताणांना तोंड द्यायला लावतं! शाळेच्या चार भिंतीत तोंड न उघडता मुकाट बसून राहणं खपूनही जातं पण त्यानंतर जगात शिरल्यावर काय होतं याचा अनुभव आपल्या सर्वांना येतोच!
प्रत्यक्ष जगात आता चुकलं तर शिक्षा नसते होणार; पण कुणी हसेल का ही भीती तर पोखरतच असते. शिवाय जसं वय वाढू लागतं तसं इतकं मोठं होऊन आपल्याला ‘ही साधी पैसे भरायची स्लीप कशी भरायची’ आणि ‘एटीएम मध्ये कार्ड कसं सरकवायचं’ एवढंही कळत नाही याची अतोनात लाज वाटायला लागते. 
परिणाम? अशा गोष्टी शक्य तितक्या पुढं ढकलायच्या असं धोरण आपण मनाशी ठरवून टाकतो. 
याचसाठी आम्ही एक छोटासा उपक्रम करून पाहिला. आमच्या नववीच्या वर्गात काही मुलं बँकेत खूपदा गेलेली होती. तर काही मुलांनी कधीच बँकेचा व्यवहार केलेला नव्हता. मग वर्गातल्या 12 मुलामुलींना घेऊन आम्ही सरळ बँकच तयार केली. काऊंटर्स केले. पासबुकं बनवली. पैसेही छापले. काही अडलं तर चौकशी कक्ष मदतीला तय्यार होता. 
वर्गातल्या उर्वरीत मुलांना आम्ही पैसे काढणं, भरणं, चेक भरणं इ. कामं दिली. इथं कुणीच हसणार नव्हतं की एखादी स्लीप भरायला चुकली म्हणून ओरडणार नव्हतं. त्यामुळं सगळ्यांनीच धम्माल मजा केली. एकमेकांना मदत केली. थोडेसे लाजत लाजत का होईना पण पहिल्यांदा आपले आपण पैसे काढलेच. 
हा उपक्र म संपवून घरी आल्यावर विचार करत राहिले, ही मुलं उद्या प्रत्यक्ष हे व्यवहार कशी करतील? एखाद्या कार्यालयात जाऊन उत्पन्नाचा दाखला कसा मिळवतील? शासकीय योजना मिळवण्यासाठीची कागदपत्नं कशी भरतील? जातपडताळणीचा अर्ज, एखाद्या अभ्यासक्र माचा प्रवेश अर्ज कशी भरतील? हा अनुभव असा कितीसा उपयोगी पडेल यांना? 
पण मग गेल्या काही तासातले चेहरे आठवत राहिले. एरवी वर्गात एकच स्थीरभाव धारण करणारे चेहरे. पण ते दीडदोन तास त्यांचे फुललेले चेहरे पाहणं हा एक सुखद धक्का होता. एखादी चुकल्यावर हळूच जीभ बाहेर काढायची. काही चेहरे प्रश्नांकित होते. पण कुठेही लाज नव्हती. भीती नव्हती. 
कसं करू? हा एक नितळ प्रश्न होता. 
मग वाटलं, आपल्याला पडलेले प्रश्न मोकळेपणाने समोरच्याला विचारण्याची वाट जरी या दोन तासांनी त्यांना दाखवली तरी ते खूपच मोठं आहे!
 
दीपाली गोगटे                               
(लेखिका.. आहेत.)
medeepali@gmail.com

Web Title: If you make a mistake, then do mistake!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.