नादालच्या या विक्रमापासून फेडरर अद्याप दूरच

By admin | Published: July 16, 2017 09:32 PM2017-07-16T21:32:20+5:302017-07-16T21:36:30+5:30

हिरवळीवरचा राजा असा लौकिक असलेल्या फेडररने आज झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत मारिन सिलिचा पराभव करत आवव्यांदा विम्बल्डनच्या विजेतेपदाला गवसणी घातली

Federer is still far from this record for Nadal | नादालच्या या विक्रमापासून फेडरर अद्याप दूरच

नादालच्या या विक्रमापासून फेडरर अद्याप दूरच

Next

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 16 - हिरवळीवरचा राजा असा लौकिक असलेल्या फेडररने आज झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत मारिन सिलिचा पराभव करत आवव्यांदा विम्बल्डनच्या विजेतेपदाला गवसणी घातली. फेडररचे हे कारकिर्दीतील 19 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरले आहे. त्याबरोबरच आठ वेळा विम्बल्डनचे पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावणारा तो पहिला टेनिसपटू ठरला असला तरी नदालच्या एका विक्रमापासून फेडरर अद्याप दूरच आहे.
एकाच टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक ग्रँडस्लॅम टायटल्स पटकवण्याचा विक्रम राफेल नादालच्या नावावर जमा आहे. नादालने फ्रेन्च ओपनमध्ये सर्वाधिक म्हणजे 10 विजेतेपदं पटकावली आहेत. त्यानंतर फेडररचा दुसरा क्रमांक लागतो. फेडररने या विजयासह विम्बल्डनमध्ये आठ वेळा ट्रॉफी उंचावण्याचा मान मिळवला. सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा विक्रम मात्र फेडररच्या नावे अबाधित आहे. फेडररने आतापर्यंत 19 जेतेपदं पटकावली आहेत. 15 विजेतेपदांसह राफेल दुसऱ्या क्रमांकावर आहे.
फेडररने आज 29 वी ग्रँडस्लॅम फायनल खेळली. विम्बल्डनची अंतिम फेरी खेळणारा फेडरर हा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. फेडरर 35 वर्षांचा आहे. यापूर्वी केन रोसवेलने 39 व्या वर्षी विम्बल्डनची फायनल खेळली होती.


आज झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत मारिन सिलिचवर 6-3, 6-1, 6-4 अशी सरळ सेटमध्ये मात करत फेडररने विक्रमी आठव्यांदा विम्बल्डनच्या विजेतेपदाला गवसणी घातली. स्वीत्झर्लंडच्या या महान खेळाडूच्या आव्हानाचा सामना करणे प्रतिस्पर्धी मारिन सिलिचला शक्य झाले नाही. पहिला गेम जिंकत सिलिचने चांगली सुरुवात केली. पण त्यानंतर फेडररच्या आव्हानासमोर त्याची डाळ शिजली नाही.
पहिल्या सेटमध्ये 6-3 ने बाजी मारल्यानंतर फेडररने सिलिचसाठी पुनरागमनाची कोणतीही वाट ठेवली नाही. दुसऱ्या सेटमध्ये सिलिच फेडररच्या आक्रमणापुढे पूर्णपणे निष्प्रभ झालेला दिसला. त्याचा फायदा उठवत फेडररने हा सेट 6-1 अशा फरकाने खिशात घातला. त्यानंतर तिसरा सेट 6-4 ने जिंकून फेडररने सामन्यासह विम्बल्डनच्या आठव्या विजेतेपदावर अगदी दिमाखात कब्जा केला.
तत्पूर्वी उपांत्य फेरीत ३५ वर्षीय फेडररने झेक प्रजासत्ताच्या ३१ वर्षीय थॉमस बर्डिचचे कडवे आव्हान 7-6, 7-6, 6-4 असे परतवले होते. तर पहिल्यांदाच विम्बल्डनची अंतिम सिलिचने गाठताना अमेरिकेच्या सॅम क्युरे याला नमवले होते. दोन तास 56 मिनिटांपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात सिलिचने क्युरेला 7-6, 4-6, 7-6, 7-5 असे पराभूत केले.

Web Title: Federer is still far from this record for Nadal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.