नवी दिल्ली : राहुल द्रविड व झहीर खान यांची नियुक्ती रोखून त्यांचा सार्वजनिक अपमान करण्यात येत आहे, असे मत प्रशासकांच्या समितीचे (सीओए) माजी सदस्य रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केले.
गुहा यांनी टिष्ट्वट केले, ‘अनिल कुंबळे यांच्यासोबत लाजीरवाणे वर्तन आणि झहीर व राहुल द्रविड यांच्याबाबतची भूमिका बघता समितीची नीती चुकीची भासते. कुंबळे, द्रविड व झहीर हे महान खेळाडू आहेत. त्यांनी मैदानावर सर्वस्व झोकून दिलेले आहे. त्यांचा सार्वजनिक अपमान होणे चुकीचे आहे.’ सीओएने शनिवारी रवी शास्त्री यांच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्तीला मंजुरी दिली. त्यानंतर गुहा यांनी हे वक्तव्य केले. समितीला अद्याप द्रविड व झहीर विदेश दौऱ्यासाठी अनुक्रमे फलंदाजी व गोलंदाजी सल्लागार आहेत किंवा नाही, हे स्पष्ट करता आलेले नाही. बीसीसीआयने सुरुवातीला तसा दावा केला होता. बैठकीच्या अहवालानुसार अन्य सल्लागारांच्या नियुक्तीबाबतचा निर्णय समिती मुख्य प्रशिक्षकासोबत चर्चा केल्यानंतर करणार आहे. गुहा यांनी भारतीय क्रिकेटमधील ‘सुपरस्टार संस्कृतीवर टीका करताना प्रशासकांच्या समितीमधून राजीनामा दिला होता. त्यांनी माजी खेळाडूंच्या दुटप्पी भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. (वृत्तसंस्था)
कुंबळेंच्या तुलनेत शास्त्री यांना कमी वेतन
नवी दिल्ली : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे वेतन चार सदस्यांची समिती निश्चित करणार आहे, पण नवनियुक्त प्रशिक्षकाला वेतन म्हणून वार्षिक ७ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे माजी प्रशिक्षक कुंबळे यांच्या तुलनेत ही रक्कम दोन कोटी रुपयांनी कमी आहे. शास्त्री यांचे वेतन निश्चित करण्यासाठी बीसीसीआयचे काळजीवाहू अध्यक्ष सी.के. खन्ना, काळजीवाहू सचिव अमिताभ चौधरी, सीईओ राहुल जोहरी व प्रशासकीय समितीतील डायना एडलजी या चार सदस्यांचा समावेश असलेल्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. शास्त्री यांना मिळणारे वेतन (७ कोटी रुपये) ‘अ’ दर्जा असलेल्या खेळाडूच्या वार्षिक मानधनाच्या बरोबरीचे आहे. (वृत्तसंस्था)