शानदार सोहळ्याद्वारे स्पर्धा सुरू

By admin | Published: February 6, 2016 03:19 AM2016-02-06T03:19:33+5:302016-02-06T03:19:33+5:30

देशाच्या पूर्व भागातील सांस्कृतिक समृद्धी आणि विविधतेची झलक सादर करीत विविधरंगी कार्यक्रमांच्या रेलचेलसह शानदार सोहळ्याद्वारे शुक्रवारी १२ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेचा श्रीगणेशा झाला.

Competition started with a spectacular celebration | शानदार सोहळ्याद्वारे स्पर्धा सुरू

शानदार सोहळ्याद्वारे स्पर्धा सुरू

Next

गुवाहाटी : देशाच्या पूर्व भागातील सांस्कृतिक समृद्धी आणि विविधतेची झलक सादर करीत विविधरंगी कार्यक्रमांच्या रेलचेलसह शानदार सोहळ्याद्वारे शुक्रवारी १२ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेचा श्रीगणेशा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या साक्षीने जवळपास २ तास ४५ मिनिटे चाललेला हा उद्घाटन सोहळा अविस्मरणीय ठरला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी अ‍ॅथ्लेटिक्स स्टेडियम येथे १२ दिवस चालणाऱ्या या स्पर्धा सुरू झाल्याची घोषणा केली. गुवाहाटी आणि शिलाँग येथे एकाचवेळी होत असलेल्या या स्पर्धेत भारतासह अफगाणिस्तान, बांगला देश, मालदीव, भूतान, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकेचे २६०० खेळाडू सहभागी झाले आहेत.
उद्घाटन सोहळ्याला आसाम आणि मेघालयचे राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल, तसेच भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष एन. रामचंद्रन यांची उपस्थिती होती. अनेक कारणांमुळे वारंवार लांबणीवर पडलेली ही स्पर्धा द. आशियाई आॅलिम्पिक परिषदेच्या यजमानपदाखाली आयोजित करण्यात येत आहे. २३ खेळांमध्ये विविध २२८ प्रकारात स्पर्धा होतील. सर्व खेळात पुरुष आणि महिला गटात सारखेच आयोजन होणार असून २२८ सुवर्ण, २२८ रौप्य आणि ३०८ कांस्य पदकांसाठी चढाओढ होणार आहे. भारताचे सर्वांत मोठे ५२१ जणांचे पथक सहभागी झाले आहे. त्यात २४५ खेळाडूंचा समावेश आहे.
स्पर्धेचे शुभचिन्ह असलेल्या ‘तिखोर’च्या नेतृत्वात सर्व देशांच्या संघांनी सुरेख पथसंचलन केले. अफगाण पथक सर्वांत पुढे होते. भारताचे पथक सर्वांत शेवटी आले. प्रत्येक देशाच्या पथकापुढे एक मुलगा आणि मुलगी आपल्या देशातून नदीचे पाणी सोबत घेऊन आले होते. द. आशियाई देशांची एकजूट म्हणून हे पाणी ब्रम्हपुत्रा नदीत विसर्जित करण्यात येणार आहे.
भारतीय ध्वजवाहक होण्याचा मान स्क्वॅश खेळाडू सौरव घोषाल याला मिळाला. पाकिस्तान आणि नेपाळच्या पथकाचे प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. घोषालने सर्व खेळाडूंच्यावतीने खेळ भावनेची शपथ घेतली. त्याआधी भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भूतिया, गगन नारंग, मोनालिसा बरुआ, राणी रामपाल, भोगेश्वर बरुआ, कृष्णा पुनिया आणि अंजू बॉबी जॉर्ज यांनी क्रीडा ज्योत मैदानात आणली. सांस्कृतिक नृत्य तसेच डिजिटल लायटिंगच्या सादरीकरणानंतर आतषबाजी करण्यात आली. (वृत्तसंस्था)
> आशियाई देशातील एकजुटीचा उत्सव : पंतप्रधान - उद्घाटनप्रसंगी मोदी म्हणाले,‘ ही स्पर्धा व्यवसाय, चर्चा आणि खेळांद्वारे क्षेत्रात शांती आणि समृद्धी आणण्याचे साधन होऊ शकते. या १२ दिवसांत तुम्ही मित्र बनवाल आणि त्या आठवणी कायम तुमच्यासोबत जीवनभर राहतील. खेळाच्या मैदानावर आम्ही आपसातील अंतर विसरून जातो आणि खेळभावना आणि रोमांच एकमेकांशी जुळले जातात.ही स्पर्धा विकासाची संधी शोधण्याची एक संधी आहे. दक्षिण आशियाईसाठीदेखील माझा दृष्टिकोन तोच आहे, जो भारतासाठी आहे. ‘...सर्वांची साथ, सर्वांचा विकास. दक्षिण आशियाई देशांतील एकजूटतेचा उत्सव आहे. टीमवर्क, टुगेदरनेस आणि टॅलेंट या तीन टी चा हा संगम आहे. मी माझे शेजारी देशातील खेळाडू आणि सार्क देशांच्या भाऊ बहिणींदरम्यान येऊन खूप गौरवान्वित आहे. आपली उपस्थिती आणि खेळातील उत्साहाने मी खूप प्रभावित आहे. आमच्यादरम्यान दक्षिण आशियातील सर्वोत्तम गुणवत्ता आहे. हा खेळ सर्वच दक्षिण आशियाई देशांतील एकजूटतेचे द्योतक आहे. खेळभावना फक्त मैदानावरच नव्हे, तर जीवनातील अन्य पैलूंतदेखील आपल्याला उपयोगात येईल. मी नेहमीच म्हणतो, जे खेळतील, ते बहरतील. या स्पर्धेने सर्वच सहभागी देशांदरम्यान पर्यटन आणि व्यवसायाच्या संधी वाढतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Competition started with a spectacular celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.