बंडखोरांच्या मनधरणीसाठी प्रयत्न

By admin | Published: May 11, 2017 02:15 AM2017-05-11T02:15:08+5:302017-05-11T02:15:08+5:30

महानगरपालिकेची २४ मे रोजी होणारी निवडणूक रंगात आली आहे. पहिल्या वहिल्या पनवेल महानगरपालिकेसाठी सर्वच

Trying to consolidate the rebels | बंडखोरांच्या मनधरणीसाठी प्रयत्न

बंडखोरांच्या मनधरणीसाठी प्रयत्न

Next

वैभव गायकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : महानगरपालिकेची २४ मे रोजी होणारी निवडणूक रंगात आली आहे. पहिल्या वहिल्या पनवेल महानगरपालिकेसाठी सर्वच राजकीय पक्षासह अपक्ष उमेदवार देखील गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. २० प्रभागातील ७८ जागेसाठी एकूण ६३६ जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. तिकीट न मिळालेल्या अनेक कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतल्याने सर्वच पक्षां समोर बंडखोरांना शांत करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ११ मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असल्याने भाजपा, शेकाप यांच्यासह सर्वच पक्षांनी बंडखोरांच्या मनधरणीसाठी जोरात प्रयत्न सुरू केल्याचे समजते.
पनवेल महानगरपालिकेत भाजपामध्ये इच्छुकांची संख्या जास्त होती. आमदार प्रशांत ठाकूर व माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिन्यांपासून महापालिकेची जोरदार तयारी सुरु होती. त्यानुसार पक्षात इच्छुकांची संख्या मोठी होती. सर्वांनाच उमेदवारी देणे शक्य नसल्याने काहींनी नाराज होऊन बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षाची युती असल्याने शेकापच्या वाट्याला जास्त जागा गेल्याने राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. विशेष म्हणजे खारघरमधील प्रभाग क्र मांक ६ मध्ये सुनील सावर्डेकर यांना काँग्रेसने एबी फॉर्म दिल्याने त्यांनी स्वतंत्ररीत्या आपला प्रचार सुरु केला आहे. याच प्रभागात शेकापच्या चारही उमेदवारांनी प्रचार देखील सुरु केला आहे. ७८ जागांसाठी सुमारे ३३६ इच्छुक संख्या मोठी आहे. त्यापैकी छाननीत ५७२ अर्ज वैध ठरविण्यात आले असल्याने ११ तारखेनंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे. यामध्ये किती उमेदवार अर्ज मागे घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या बंडखोरांना शांत करण्यासाठी मागील दोन दिवसांपासून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आल्याचे बोलले जात आहे. बंडखोरांना शांत करण्यासाठी स्वीकृत नगरसेवकांसह विविध समित्यांवर बसविण्याचे आश्वासन दिले जात आहे. नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महानगर पालिकेत पहिले नगरसेवक होण्याचा मान आपल्यालाच मिळावा अशी अनेक उमेदवारांची इच्छा असल्याने अनेक जण आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत.

Web Title: Trying to consolidate the rebels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.