ब्रेक फेल झाल्याने एनएमएमटीचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 03:22 AM2018-09-15T03:22:54+5:302018-09-15T03:23:09+5:30

सुदैवाने अपघाता वेळी रस्त्यावर रहदारी कमी होती, यामुळे मोठी दुर्घटना टळली.

NMMT Accident due to Break Failure | ब्रेक फेल झाल्याने एनएमएमटीचा अपघात

ब्रेक फेल झाल्याने एनएमएमटीचा अपघात

googlenewsNext

नवी मुंबई : एनएमएमटीचा ब्रेक फेल होऊन तीन वाहनांना धडक दिल्याचा प्रकार सानपाडा येथे घडला. सुदैवाने अपघाता वेळी रस्त्यावर रहदारी कमी होती, यामुळे मोठी दुर्घटना टळली. या अपघातामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
शहरातील बहुतांश ठिकाणचे सिग्नल मागील काही महिन्यांपासून नादुरुस्त स्थितीमध्ये आहेत, यामुळे अनेक चौकांमध्ये वाहतुकीचा खोळंबा उडत आहे. त्यात शहरांतर्गतच्या रस्त्यांसह ठाणे-बेलापूर व सायन-पनवेल या मुख्य मार्गांचाही समावेश आहे, यामुळे अपघातांनाही निमंत्रण मिळत असतानाच गुरुवारी दुपारी सानपाडा जंक्शन येथे विचित्र अपघात घडला. सायन-पनवेल मार्गावरून एपीएमसीकडे वळण घेणारी एनएमएमटी पुलाखाली रस्ता ओलांडत असताना चालकाचा बसवरील ताबा सुटला, यामुळे सदर बस रिक्षा, कार व टेम्पो अशा तीन वाहनांना धडकून रस्त्याच्या सुमारे अडीच फुटांच्या दुभाजकावर चढली. यामुळे विरुद्ध दिशेच्या मार्गावरून येणाऱ्या वाहनालाही तिची धडक बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. अपघातानंतर सानपाडा पोलीस व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात घडल्याची कबुली एनएमएमटी चालकाने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातामध्ये कार, टेम्पो व रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून, रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.
या दुर्घटनेत बसमधील काही प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत. एनएमएमटीच्या नादुरुस्त बस रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांचे जीव धोक्यात घालणारे प्रकार यापूर्वीही अनेकदा घडले आहेत. अर्ध्या प्रवासात इंधन संपणे, ब्रेक फेल होणे, चाक निखळणे, असे प्रकार एनएमएमटीच्या वाहनांसोबत घडत आहेत, यामुळे त्यांच्या डागडुजी व दुरुस्तीचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.

Web Title: NMMT Accident due to Break Failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.