रिक्षा थांब्यांवर संघटनांची मक्तेदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:20 PM2019-02-22T23:20:13+5:302019-02-22T23:20:36+5:30

प्रवाशांवर अरेरावी : संघटना विरहित सर्वसमावेशक थांब्यांची मागणी

Monopoly of organizations on rickshaw stops | रिक्षा थांब्यांवर संघटनांची मक्तेदारी

रिक्षा थांब्यांवर संघटनांची मक्तेदारी

नवी मुंबई : शहरातील बहुतांश रिक्षा थांबे ठरावीक संघटनांनी ताब्यात घेतले आहेत. त्या ठिकाणी इतर रिक्षाचालकांना प्रवेश मिळत नसल्याने अशा रिक्षाचालकांना रस्त्यावर थांबावे लागत आहे, यामुळे संघटनांच्या जोरावर ठरावीक गटाची वाढती मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी सर्वसमावेशक थांबे तयार करण्याची मागणी होऊ लागली आहे.

शहरातील बस थांब्यांलगत, महत्त्वाच्या मार्गावर तसेच रेल्वेस्थानकांच्या बाहेर टॅक्सी व रिक्षाचालकांसाठी थांबे देण्यात आले आहेत. त्यापैकी काही थांबे ठरावीक संघटनांनी प्रशासनाकडे मागणी करून मिळवलेले आहेत. तर काही ठिकाणी संघटनांनीच आपसात संगनमताने थांब्यांवर स्वत:चे वर्चस्व तयार केले आहे, अशा थांब्यांवर संघटनेच्या सदस्य नसलेल्या रिक्षा थांबण्यास मज्जाव घातला जात आहे. यामुळे कोणत्याही संघटनेत सहभागी नसलेल्या रिक्षाचालकांना प्रवाशांच्या प्रतीक्षेत रस्त्यावर अथवा बस थांब्यावर थांबावे लागत आहे. परिणामी, शहरातील जास्त रहदारीच्या महत्त्वाच्या मार्गावरील बहुतांश बस थांब्यावरच रिक्षांचे अवैध थांबे तयार झाले आहेत. तर परमिट खुले केल्यापासून शहरात रिक्षांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचाही परिणाम रहदारीवर दिसून येत आहे.
त्यामुळे रिक्षांचे थांबे कोणत्या एका संघटनेच्या ताब्यात न देता ते सर्वसमावेशक करावेत, अशी मागणी होऊ लागली आहे. बहुतांश संघटनांच्या पाठीशी राजकीय वरदहस्त असून, राजकीय स्वार्थासाठी त्यांना मोक्याच्या जागी थांबे मिळवून दिले जात आहेत. मात्र, जे रिक्षाचालक संघटित नाहीत अथवा कोणत्या राजकीय छत्रछायेखाली नाहीत, ते तिथल्या थांब्यापासून वंचित राहत आहेत. अशा वेळी त्यांच्याकडून जवळच थांबा तयार केला गेल्यास आपसात वादाचे प्रकार घडत आहेत. वाशी-कोपरखैरणे मार्गावर, नेरुळ रेल्वेस्थानकाच्या परिसरात, सीबीडीत तसेच घणसोलीत असे प्रकार सातत्याने घडत आहेत. घणसोली स्थानकाबाहेर गतवर्षी दोन संघटनांत दंगलीचा प्रकार घडला होता, तर वाशी-कोपरखैरणे मार्गावरील बस थांब्यांनाच रिक्षा थांब्याचे स्वरूप आले आहे. अशातच घणसोली रेल्वेस्थानकाबाहेर सिडको मार्फत नव्याने तयार होत असलेले दोन नवे रिक्षा थांबे वापरासाठी खुले होण्याअगोदरच त्या ठिकाणी ठरावीक संघटनांचे फलक झळकू लागले आहेत. याबाबत इतर रिक्षाचालकांकडून नाराजी व्यक्त होऊ लागली असून, ते थांबे सर्वच रिक्षाचालकांसाठी खुले करण्याची मागणी होऊ लागली आहे.
शहरात अधिकृत रिक्षा थांब्यांची कमतरता असून, बहुतांश संघटनांनी स्थानिक पातळीवर वरदहस्त वापरून अनधिकृत थांबे तयार केले आहेत. त्यातही काही संघटना थांब्यावर स्वत:चाच हक्क गाजवत असल्याने वादाचे प्रकार घडत आहेत. दीड महिन्यांपूर्वी सीवूड येथील गायमुख चौकालगतच्या थांब्यावर अशाच प्रकारातून दोन संघटनांत वाद उफाळून आला होता, तर नेरुळ रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील थांब्यावर प्रवाशांना मीटरने भाडे नाकारून केवळ शेअर भाडेच स्वीकारले जाते. तर त्या ठिकाणी ठरावीक रिक्षाचालकांव्यतिरिक्त इतर रिक्षाचालकाने भाडे स्वीकारल्यास त्यास दमदाटीही केली जात आहे.

ठरावीक संघटनांच्याच ताब्यात रिक्षा थांब्यांची जागा दिली जात असल्याने त्या ठिकाणी काही रिक्षाचालकांच्या मुजोरी प्रवृत्तीचे दर्शन घडत आहे. तर प्रवाशांवरही त्यांच्याच रिक्षात बसण्याची सक्ती करून इतर रिक्षाचालकांना दमदाटी केली जाते, यामुळे संघटनेच्या आडून रिक्षाचालकांची वाढत चाललेली आरेरावी थांबवण्यासाठी रिक्षांच्या थांब्यावरील ठरावीक संघटनांची मक्तेदारी मोडीत काढून सर्वच रिक्षाचालकांना समाविष्ट करून घेणे आवश्यक आहे.
 

Web Title: Monopoly of organizations on rickshaw stops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.