नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

By योगेश पिंगळे | Published: February 7, 2024 05:43 PM2024-02-07T17:43:52+5:302024-02-07T17:44:44+5:30

गौतम जाधव हा ३१ वर्षीय तरुण डायलेटेड कार्डिओमायोपॅथी आजाराने ग्रस्त होता.

Heart transplant surgery of youth preparing for civil services exam successful in navi mumbai | नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

योगेश पिंगळे,नवी मुंबई : पोलिस उपनिरीक्षक होण्याची इच्छा असलेल्या आणि त्यासाठी नागरी सेवा परीक्षेची तयारी करत असलेला गौतम जाधव हा ३१ वर्षीय तरुण डायलेटेड कार्डिओमायोपॅथी आजाराने ग्रस्त होता. नवी मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून या तरुणाला नवीन आयुष्य मिळाले आहे.

डायलेटेड कार्डिओमायोपॅथीमुळे हृदयाच्या कक्षा वाढतात आणि त्यांची आकुंचन क्षमता कमी होते. या रुग्णाला छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास अशी समस्या होती. ज्यामुळे त्यांच्या जीवनशैलीवर गंभीर परिणाम झाला होता. प्रत्यारोपण करण्यासाठी त्यांची नोंद करण्यात आली होती. एका वर्षानंतर, डिसेंबर २०२३ रोजी नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलचे हृदय प्रत्यारोपणाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. संजीव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. डोक्याला दुखापत झाल्यामुळे नवी मुंबईतील ‘ब्रेन डेड’ २० वर्षीय दात्याकडून हृदय प्राप्त करण्यात आले. २ वर्षांपूर्वी गौतम जाधव यांना डायलेटेड कार्डिओमायोपॅथी आणि शेवटच्या टप्प्यातील हृदय निकामी झाल्याचे निदान झाले होते. हृदय केवळ १० टक्क्यांपर्यंत एवढे पंप करत होते. म्हणजेच हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणे आवश्यक असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. 

गौतम जाधव यांना आरोग्याच्या बाबतीत गंभीर आव्हानांचा सामना करावा लागला, ज्यामुळे केवळ त्यांच्या जीवनशैलीवरच परिणाम झाला नाही तर पोलिस उपनिरीक्षक होण्याचे त्यांचे स्वप्न देखील भंगले होते. आनंदाची बाब म्हणजे प्रत्यारोपणानंतर गौतम जाधव आपली सर्व दैनंदिन कामे स्वतः करतात आणि त्यांच्यामध्ये उल्लेखनीय प्रगती दिसून आली आल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. गौतम हे सध्या नागरी सेवा परीक्षांसाठी तयारी करत असून त्यांची जिद्द अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे हृदय प्रत्यारोपणाचा संपूर्ण खर्च क्राउड फंडिंग आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या साहाय्याने केला. अवयव दात्याच्या कुटुंबाने पुढाकार घेतल्यामुळे आम्ही पोलिस होण्याची इच्छा असलेल्या तरुण उमेदवारावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करू शकलो, याचा आम्हाला आनंद असल्याचे अपोलो हॉस्पिटलचे पश्चिमी क्षेत्राचे प्रादेशिक सीईओ संतोष मराठे यांनी सांगितले.

Web Title: Heart transplant surgery of youth preparing for civil services exam successful in navi mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.