निर्यातभवन की कचराकुंडी!

By admin | Published: May 5, 2016 01:20 AM2016-05-05T01:20:00+5:302016-05-05T01:20:00+5:30

फळ मार्केटमधील निर्यातभवन इमारतीमध्ये कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. स्वच्छतेचे सर्व निकष धाब्यावर बसविले जात आहेत. विदेशात पाठविण्यात येणारा आंबा पॅकिंग

Garbage Export Garbage! | निर्यातभवन की कचराकुंडी!

निर्यातभवन की कचराकुंडी!

Next

नवी मुंबई : फळ मार्केटमधील निर्यातभवन इमारतीमध्ये कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. स्वच्छतेचे सर्व निकष धाब्यावर बसविले जात आहेत. विदेशात पाठविण्यात येणारा आंबा पॅकिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वच्छ गणवेश व हातमोजेही दिले जात नाहीत. निर्यातभवनची अवस्था कचराकुंडीप्रमाणे होवून गेली असून याकडे व्यापारी व प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
युरोपीयन देशांनी भारतामधील आंब्यावर निर्बंध लादले होते. योग्य प्रकारे निर्जुंतुकीकरण केले जात नसल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. परंतु यानंतरही अनेक निर्यातदारांनी योग्य काळजी घेतलेली नाही. फळ मार्केटमधील निर्यातभवन इमारतीमध्ये व्यापाऱ्यांनी रायपनिंग चेंबर बसविले आहेत. निर्यात केला जाणारा आंबा याच ठिकाणी पॅकिंग केला जातो. अत्यंत चांगल्या दर्जाचा आंबा विदेशात पाठविला जातो. त्यासाठी आकर्षक बॉक्सचा वापर केला जात असला तरी आंबे हाताळताना मात्र स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. एपीएमसीकडे नोंद नसलेल्या बंगाली कामगारांकडून कमी पैशात पॅकिंग करून घेतली जाते. लुंगी व बनियान परिधान केलेले हे कामगार दिवसभर पॅकिंग करत असतात. अनेक कामगार याच ठिकाणी जेवण बनवतात. निर्यात करणाऱ्या कामगारांना योग्य गणवेश दिला जात नाही. डोक्यावर टोपी, हातमोजेही दिले जात नाहीत. एखाद्या झोपडपट्टी परिसरातील मार्केटप्रमाणे निर्यातभवनची स्थिती झाली आहे. निर्यातभवनच्या गेटबाहेर कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. व्यापारी दिवसभर येथे कचरा टाकत असतात. यामुळे कामगारांनी कितीही सफाई केली तरी तेथे घाणीचे साम्राज्य कायम असल्याचेच चित्र पहावयास मिळते.
निर्यातभवनच्या पहिल्या मजल्यावरही मोकळ्या पॅसेजमध्ये सर्वत्र पॅकिंगचे साहित्य ठेवलेले आहे. कामगार तेथेच पॅकिंग करत असतात. जागा मिळेल तेथे कामगार आराम करत असल्याचे चित्र पहावयास मिळते. येथील विद्युत बॉक्सला लागून कागदाचे लगदे ठेवलेले आहेत. शॉर्टसर्किट झाल्यास पूर्ण इमारतीला आग लागण्याची शक्यता आहे. पॅकिंग करणाऱ्या खोल्यांमध्ये कामगारांचा मुक्काम असतो. अशा ठिकाणी पॅकिंग केलेला कृषी माल स्वच्छ कसा असणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसऱ्या माळ्यावरील स्थिती अत्यंत बिकट आहे. पूर्ण माळ्याच्या मूळ रचनेमध्ये बदल केले आहेत. येथील पिलर तोडले आहेत.
डेब्रिज सर्वत्र पडले आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. मार्केटमधील बंगाली कामगार या जागेचा राहण्यासाठी वापर करू लागले आहेत. जागा मिळेल तेथे कामगार आराम करत असल्याचे चित्र पहावयास मिळते. कामगार मोकळ्या जागेवर आंघोळ करत असून कपडेही तिथेच धुवत आहेत. एखादे विदेशी शिष्टमंडळ निर्यातभवन पहावयास आले तर देशातील कृषी व्यापाराचीच प्रतिमा मलिन होण्याची शक्यता व्यक्त केली असून स्वच्छतेचे आवश्यक ते निकष व्यापाऱ्यांनी पाळावे, असे मत मार्केटमधीलच घटकांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Garbage Export Garbage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.