तामिळ ‘मरसेल’ चित्रपटाने भाजपा नेते प्रचंड अस्वस्थ; संवाद वगळण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:20 AM2017-10-22T00:20:16+5:302017-10-22T07:22:10+5:30

जीएसटी, नोटाबंदी व डिजिटल इंडिया यांच्यावर विनोदी भाष्य करणा-या ‘मरसेल’ या चित्रपटाने भाजपा नेते व कार्यकर्ते भलतेच अस्वस्थ झाले असून, या विषयांवरील संवाद चित्रपटांतून काढून टाकावेत, अशी मागणी त्यांनी सुरू केली आहे.

Tamil 'Marcel' is very uncomfortable with BJP leaders; Demand for the exclusion of the dialogue | तामिळ ‘मरसेल’ चित्रपटाने भाजपा नेते प्रचंड अस्वस्थ; संवाद वगळण्याची मागणी

तामिळ ‘मरसेल’ चित्रपटाने भाजपा नेते प्रचंड अस्वस्थ; संवाद वगळण्याची मागणी

Next

चेन्नई : जीएसटी, नोटाबंदी व डिजिटल इंडिया यांच्यावर विनोदी भाष्य करणा-या ‘मरसेल’ या चित्रपटाने भाजपा नेते व कार्यकर्ते भलतेच अस्वस्थ झाले असून, या विषयांवरील संवाद चित्रपटांतून काढून टाकावेत, अशी मागणी त्यांनी सुरू केली आहे. हा वाद वाढू नये, म्हणून काही संवाद वगळावेत का, असा विचार निर्माते करीत आहेत.
ऐन दिवाळीत, १८ आॅक्टोबर रोजी संपूर्ण तामिळनाडू, मुंबई तसेच अमेरिका, आॅस्ट्रेलिया, सिंगापूर व अन्य देशांत प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर रजनीकांतच्या कबाली या चित्रपटाचे तसेच आमीर खानचा दंगल व शाहरूख खानचा रईस या चित्रपटांचे रेकॉर्डही मोडले आहेत.
प्रख्यात दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन यांनी या चित्रपटाचे समर्थन करून निर्मात्यांना पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही या चित्रपटावरून पंतप्रधान मोदी यांना टोमणा मारला आहे, तर माजी मंत्री पी. चिदम्बरम यांनी केवळ भाजपा सरकारची प्रशंसा केलेल्या चित्रपटांनाच परवानगी देणार की काय, असा खोचक सवाल विचारला आहे. कमल हसन यांनी ‘मरसेल’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिले आहे. त्याला पुन्हा सेन्सॉर करू नका. टीकेला संयुक्तिक उत्तर द्या. टीकाकारांची मुस्कटदाबी करू नका. भारत बोलला तरच चमकेल. कमल हसन यांच्या ‘विश्वरूपम’ चित्रपटास विरोध झाला होता, तेव्हा त्यांनी देश सोडण्याची धमकी दिली होती.
‘मरसेल’मध्ये मुख्य भूमिका विजय यांची आहे. ते ख्रिश्चन असल्याने भाजपाने चित्रपटावर टीका करताना, त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री पोण्ण राधाकृष्णन यांनी चित्रपटाला विरोध करताना विजय यांच्या धर्मावरही तोंडसुख घेतले. जीएसटीची खोटी माहिती देणारा प्रसंग चित्रपटातून काढून टाकण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दुसरे एक भाजपा नेते एच. राजा यांनी म्हटले की, अभिनेते विजय यांचा मोदीविरोध यानिमित्ताने समोर आला आहे. प्रख्यात तामिळ दिग्दर्शक पी. ए. रणजीत यांनीही ‘मरसेल’च्या निर्मात्यांना पाठिंबा दिला आहे. भाजपाची टीका म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे, अशी टीका माकपाने केली आहे. 
>वादग्रस्त संवाद
तुम्ही मला लुटू नका. नोटाबंदीमुळे माझ्याकडे काहीच शिल्लक राहिलेले नाही. इथे २८ टक्के जीएसटी असूनही आरोग्यसेवा मिळत नाही. सिंगापूरमध्ये ७% जीएसटी असूनही मोफत आरोग्यसेवा मिळते. इथे औषधांवर १२ टक्के जीएसटी आहे. पण दारूवर मात्र जीएसटी नाही.
>पी. चिदंबरम यांचा हल्लाबोल
पी. चिदम्बरम यांनी म्हटले आहे की, भाजपाला सरकारची प्रशंसा करणा-या चित्रपटांनाच परवानगी दिली जावी, असे वाटत असावे. तसा कायदा लवकरच बनवला जाईल, असे दिसते. आज जर ‘परशक्ती’ प्रदर्शित झाला असता तर काय झाले असते याची कल्पना करा.
>परशक्तीविषयी
शिवाजी गणेशन यांची भूमिका असलेला परशक्ती चित्रपट १७ आॅक्टोबर १९५२ साली प्रदर्शित झाला. त्यात ब्राह्मण व हिंदू यांच्यावर कडाडून टीका करण्यात आली होती. त्या चित्रपटाची पटकथा व संवाद एम. करुणानिधी यांनी लिहिले होते. तो चित्रपटही दिवाळीतच प्रदर्शित झाला होता.
>राहुल गांधी यांचा मोदी यांना टोमणा
राहुल यांनी मोदी यांना टोमणा मारला आहे. त्यांनी म्हटले की, श्रीमान मोदी, हा चित्रपट तामिळ संस्कृती आणि भाषेची अभिव्यक्ती आहे. मरसेलमध्ये हस्तक्षेप करून तामिळ सन्मानाचे राक्षसीकरण करू नका.’ राहुल यांनी टिष्ट्वटमध्ये ‘राक्षसीकरण’ यासाठी ‘डेमोन-टाइज’ अशी इंग्रजी शब्दरचना केली आहे. ‘डेमोने-टाइज’ म्हणजे ‘नोटाबंदी करणे’ होय.

Web Title: Tamil 'Marcel' is very uncomfortable with BJP leaders; Demand for the exclusion of the dialogue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा