नेहरूंमुळे भारत सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य बनला नाही, एस जयशंकर यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 07:43 AM2024-04-11T07:43:00+5:302024-04-11T07:44:02+5:30

S Jaishankar : दहशतवादावरूनही एस जयशंकर यांनी मागील काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला.

External Affairs Minister S Jaishankar claim – India did not become a permanent member of the Security Council because of the country's first Prime Minister Jawahar Lal Nehru, Bikaner rally | नेहरूंमुळे भारत सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य बनला नाही, एस जयशंकर यांचा दावा

नेहरूंमुळे भारत सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य बनला नाही, एस जयशंकर यांचा दावा

नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर जोरदार निशाणा साधला. राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात बुधवारी आयोजित सभेत नेहरूंमुळेच भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (UNSC) स्थायी सदस्य बनता आले नाही. भारताऐवजी चीनला ही संधी मिळाली, असे एस जयशंकर म्हणाले. तसेच, दहशतवादावरूनही एस जयशंकर यांनी मागील काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला.

नेहरूंना भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा (UNSC) स्थायी सदस्य व्हावे असे वाटत नव्हते. नेहरूंनी भारतापेक्षा चीनला प्राधान्य दिले होते आणि चीनच्या स्थायी सदस्य बनवण्याच्या बाजूने होते. चीन आधी स्थायी सदस्य होईल. नंतर भारत होईल, असे नेहरू तेव्हा म्हणाले होते. पण जर मी पंतप्रधान झालो असतो तर सर्वात आधी देशाचे हित पाहिले असते, असे एस जयशंकर म्हणाले. 

भारत यापुढे सीमेपलीकडून येणारा दहशतवाद सहन करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा आव्हानांवर मात करणे सर्वात महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आधी २००८ मध्ये भारतावर दहशतवादी हल्ला झाला आणि मुंबई हादरली होती. आजच्या भारतात सीमेपलीकडून कोणतीही दहशतवादी घटना घडली तर आम्ही उरीसारखी प्रतिक्रिया देतो, असे एस जयशंकर यांनी सांगितले. 

याचबरोबर, सीमावर्ती भागातील जिल्ह्यांमध्ये सुरक्षा मजबूत करणे अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येक नागरिकाला त्याचे महत्त्व माहीत आहे. देशाच्या उत्तर सीमेवर आपले जवान तैनात असल्यामुळेच आपल्याला सुरक्षित वाटते. हवामानासह सर्व प्रतिकूल परिस्थिती असतानाही आपल्या जवानांनी देशाच्या सीमा सुरक्षित ठेवल्या आहेत, असे एस जयशंकर म्हणाले.

पूर्वीचे आणि आजचे नेतृत्व यात खूप मोठा फरक आहे. आता मोदींचे नेतृत्व आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली १० वर्षांत सर्वात मोठा बदल झाला आहे. आज देश खंबीर नेतृत्वाच्या हाती आहे आणि निर्णयांमध्ये पूर्ण स्पष्टता आहे. योग्य निर्णयांमुळेच त्यांचे योग्य पालन करणे आपल्यासाठी सोपे होते. आज कोणतीही कारवाई करताना आम्हाला पूर्ण विश्वास आहे, कारण आम्हाला १०० टक्के पाठिंबा मिळेल, हे आम्हाला माहीत आहे, असेही एस. जयशंकर म्हणाले.

Web Title: External Affairs Minister S Jaishankar claim – India did not become a permanent member of the Security Council because of the country's first Prime Minister Jawahar Lal Nehru, Bikaner rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.