Dharmasatta Tiklaye Modi's Rulance ?, Sant Mahanta's role is important | धर्मसत्ता टिकवेल मोदींची राजसत्ता?, संत-महंतांची भूमिका महत्त्वाची

संदीप प्रधान
आणंद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या गुजरातेत निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात राजसत्ता टिकवण्याकरिता धर्मसत्ता सक्रिय होऊ शकते. धार्मिक संत, साधू, महंत यांचा येथील जनमानसावर मोठा प्रभाव
असून हिंदुत्वाच्या विचारधारेसाठी भाजपाची पाठराखण करण्याचा सल्ला ते आपल्या अदृश्य यंत्रणेमार्फत मतदारांपर्यंत पोहोचवतात, असा मागील तीन निवडणुकांमध्ये अनुभव आहे.
अयोध्येतील राम मंदिर वादाचा निकाल २०१९ पर्यंत स्थगित करण्याची मागणी ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात करताच, भाजपाच्या हाती कोलीत मिळाले.
हाच मुद्दा मोदी यांनी प्रचारात उचलून धरला आणि इतका महत्त्वाचा मुद्दा अनिर्णीत ठेवण्याची मागणी केल्याबद्दल काँग्रेसला लक्ष्य केले. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनीही टिष्ट्वट करून काँग्रेसवर टीका केली. राम मंदिराबाबत काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी, असा आग्रह भाजपाने प्रचारात धरला आहे.
हे सर्व आक्रमकपणे करण्यामागे धर्मसत्तेचा पाठिंबा भाजपाला मिळावा हाच आहे.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रचाराच्या प्रारंभी गुजरातमधील अनेक देवस्थानांना भेटी दिल्याबद्दल त्यांच्यावर भाजपाकडून टीका करण्यात आली. मात्र गुजरात निवडणुकीत धर्मसत्ता आणि संत-महंतांची भूमिका महत्त्वाची असते हे माहीत असल्यानेच राहुल गांधी यांनी या भेटीगाठी घेतल्या होत्या, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.

सारेच दरबारात
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी अलीकडेच हरिप्रसाद स्वामींनी आयोजित केलेल्या बाल भिक्षार्थी कार्यक्रमात भाग घेऊन आशीर्वाद घेतला होता व त्यांचे मार्गदर्शन घेतले होते. त्याच पद्धतीने सध्या अनेक उमेदवार संत-महंतांच्या दरबारात पायधूळ झाडत आहेत.

आंबेडकरांचे योगदान मिटविण्याचा प्र्रयत्न
नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मते मागणाºया पक्षांनी आंबेडकरांचे योगदान मिटविण्याचा प्रयत्न केला, अशा शब्दांत मोदी यांनी गुुरुवारी काँग्रेसवर हल्ला चढवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. आपण शिवभक्त असल्याचे सांगणाºया राहुल गांधी यांचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, काही पक्ष डॉ. आंबेडकरांपेक्षा बाबा भोलेबाबत (भगवान शिव) अधिक बोलत आहेत.पण बाबासाहेबांचे विचार जनमानसातून हटविता आले नाहीत. नव्या पिढीत सामाजिक दोष संपविण्याची ताकद आहे. आम्ही बाबासाहेबांचे सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.

शेतकºयांच्या दुरवस्थेवरून मोदींवर निशाणा
नवी दिल्ली : शेतकºयांना कर्जमाफी मिळाली नाही आणि शेतमालाला रास्त भावही मिळाला नाही, ना विमा रक्कम, ना विंधन विहिरी, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी मोदी यांना रोज एक प्रश्न विचारत असून, त्यांनी गुरुवारी हा नववा प्रश्न विचारला आहे. राहुल गांधी यांनी मोदी यांना लक्ष्य करताना गब्बर शब्दाचाही उपयोग केला आहे. त्यांनी टिष्ट्वट केले आहे की, शेतीवर गब्बरसिंगचा मार, जमीन हिसकावली, अन्नदात्याला केले बेकार. पीएमसाहेब, शेतमजुराबाबत का असा सावत्र व्यवहार? राहुल गांधी यांनी यापूर्वी सरकारवर हल्ला करताना जीएसटीला गब्बर सिंग टॅक्स म्हणून संबोधले होते.

नर्मदेसाठी मोदी भेटले नाहीत
अहमदाबाद : नर्मदेच्या विषयावर आपण डॉ. मनमोहन सिंग यांना भेटण्याचा प्रयत्न केला होता, पण ते भेटले नाहीत, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचे डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरुवारी खंडन केले. ते म्हणाले की, या विषयासाठी ते माझ्याकडे कधी आल्याचे आठवत नाही. मोदींनी जेव्हा कधी भेटीची वेळ मागितली, तेव्हा मी त्यांना भेटलो होतो. पंतप्रधान म्हणून सर्व मुख्यमंत्र्यांना भेटणे माझे कामच होते. नोटाबंदीचा निर्णय फसला. भ्रष्टाचार आजही सुरू आहे, असे सांगून त्यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला.आर्थिक
आघाडीवर संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळाशी बरोबरी करायची असल्यास पाचव्या वर्षी अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर
१0.६ टक्के असायला हवा. पण मोदी सरकारला हे जमेल, असे वाटत नाही अशी टीका करून सिंग म्हणाले की, मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणात सातत्य नसल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचे नुकसान झाले आहे.

भक्तांनी कोणाला मत द्यावे, याची अप्रत्यक्ष सूचना
गुजरातमध्ये मुरारीबापू, बाप्पाजी, अटलदरा स्वामिनारायण मंदिराचे स्वामी, सोखडा स्वामिनारायण मंदिराचे स्वामी, हरिप्रसाद स्वामी, वैष्णव संप्रदायाचे द्वारेशलाल स्वामी हे व अन्य स्वामी, संत, महंत यांचा मोठा प्रभाव आहे. गोध्राहून आणंदकडे जात असताना वाटेत एका विस्तीर्ण प्रदेशावर मुरारीबापू यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम सुरू असल्याचे दिसले. प्रवेशासाठी रांग लागली होती. आतमध्येही गर्दी होती. वाटेत ठिकठिकाणी स्वामी, संत, महंत यांच्या प्रवचनांचे गुजराती भाषेमध्ये फलक लागले होते. सर्वच पक्षाचे उमेदवार या धर्मगुरूंच्या भेटीगाठीला जातात, आशीर्वाद मागतात. भेटीला येणाºया प्रत्येक उमेदवाराला हे धार्मिक गुरू पक्ष न पाहता आशीर्वाद देत असले तरी ते हिंदुत्वाच्या भूमिकेची पाठराखण करण्याचे संदेश देतात. प्रवचनात ही मंडळी कधीच थेट अमूक पक्षाला मते देण्यास सांगत नाहीत. मात्र त्यांची अदृश्य यंत्रणा त्यांच्या भक्तांपर्यंत कुठल्या उमेदवाराला मत द्यायचे, याचे संदेश पोहोचवते.
 


Web Title: Dharmasatta Tiklaye Modi's Rulance ?, Sant Mahanta's role is important
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.