भरधाव टेम्पोच्या धडकेत दुगाव-गिरणारे रस्त्यावर युवक ठार; जमावाने टेम्पो पेटवून दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 07:58 PM2017-12-14T19:58:30+5:302017-12-14T20:01:40+5:30

मखमलाबादकडून कटलरी माल घेऊन गिरणारेच्या दिशेने चालक भरधाव टेम्पो (एमएच १५ एजी १६५१) घेऊन जात असताना चालकाने रस्त्यावरून गिरणारेकडे जात असलेल्या दुचाकीस्वार बाबूलाल बोबडे याच्या दुचाकीला (एमएच १५, बीएम ७९८६) पाठीमागून जोरदार धडक दिली.

Youth killed on a road-breaking road; The mob burnt a tempo | भरधाव टेम्पोच्या धडकेत दुगाव-गिरणारे रस्त्यावर युवक ठार; जमावाने टेम्पो पेटवून दिला

भरधाव टेम्पोच्या धडकेत दुगाव-गिरणारे रस्त्यावर युवक ठार; जमावाने टेम्पो पेटवून दिला

Next
ठळक मुद्देआगीमध्ये सुमारे तीन लाख ४७ हजार रुपयांचे नुकसान अपघाताची माहिती पोलिसांना कळवूनदेखील पोलीस घटनास्थळी उशिरा

नाशिक : मखमलाबादकडून भरधाव वेगाने गिरणारेकडे जाणा-या टेम्पोने दुगाव चौफुलीच्या पुढे रस्त्यावरून जात असलेल्या दुचाकीस्वारास जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार बाबूलाल रतन बोबडे (२०) हा जागीच ठार झाला. सदर घटना गुरुवारी (दि.१४) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. यानंतर येथे जमलेल्या संतप्त जमावाने अपघातग्रस्त वाहन पेटवून दिल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.
मखमलाबादकडून कटलरी माल घेऊन गिरणारेच्या दिशेने चालक भरधाव टेम्पो (एमएच १५ एजी १६५१) घेऊन जात असताना चालकाने रस्त्यावरून गिरणारेकडे जात असलेल्या दुचाकीस्वार बाबूलाल बोबडे याच्या दुचाकीला (एमएच १५, बीएम ७९८६) पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत बोबडे हा जमिनीवर कोसळून जागीच ठार झाला. अपघात होताच टेम्पोचालकाने घटनास्थळी वाहन सोडून पळ काढला. सकाळच्या सुमारास अपघात झाल्यामुळे रस्त्यावरून फारशी वर्दळ नव्हती; मात्र अपघाताची वार्ता दुगाव, गिरणारे गावात पसरल्यानंतर मोठ्या संख्येने गावक-यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती पोलिसांना कळवूनदेखील पोलीस घटनास्थळी उशिरा पोहचल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला. पोलिसांची करावी लागणारी प्रतीक्षा आणि टेम्पोचालकाने घटनास्थळावरून केलेल्या पलायनामुळे जमाव संतप्त झाला. यावेळी जमलेल्या जमावाने संतप्त होत टेम्पो पेटवून दिला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पेटत्या टेम्पोमुळे वाहतूक ठप्प झाली. सदर घटना समजताच पोलीस अधीक्षक कार्यालयातून दखल घेण्यात आली आणि दंगल नियंत्रण पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. जवानांनी जमावाला पांगवून तत्काळ पेटलेला टेम्पो विझविण्याचा प्रयत्न सुरू केला; मात्र आगीच्या भक्ष्यस्थानी टेम्पो पडल्यामुळे पोलिसांनी अग्निशामक दलाला माहिती दिली. यावेळी अग्निशामक दलाच्या सातपूर उपकेंद्राचा बंब घटनास्थळी पोहचला. जवानांनी तत्काळ पेटलेला टेम्पो विझविला; मात्र तोपर्यंत टेम्पोचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला होता. पोलीस कर्मचारी संजय सांगळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, फिर्यादीत सुमारे तीन लाख ४७ हजार रुपयांचे नुकसान आगीमध्ये झाल्याचे म्हटले आहे. बोबडे हा महावीर तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. याबाबत अज्ञात टेम्पोचालकाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 


.

Web Title: Youth killed on a road-breaking road; The mob burnt a tempo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.