अवकाळी नुकसानीचा मुद्दा अधिवेशनात प्रभावीपणे मांडू - बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 06:08 PM2023-11-29T18:08:22+5:302023-11-29T18:10:03+5:30

बाळासाहेब थोरात यांनी बहादुरी ता. चांदवड यासह परिसरातील गावांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसान झालेल्या द्राक्षबागांची पाहणी केली.

The issue of untimely damage will be effectively raised in the session says Balasaheb Thorat | अवकाळी नुकसानीचा मुद्दा अधिवेशनात प्रभावीपणे मांडू - बाळासाहेब थोरात

अवकाळी नुकसानीचा मुद्दा अधिवेशनात प्रभावीपणे मांडू - बाळासाहेब थोरात

महेश गुजराथी -

चांदवड (नाशिक) : पंचनाम्यांचे निकष लावले तरी आता अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाला शेतकऱ्यांना दिलासा द्यावाच लागणार आहे. हिवाळी अधिवेशनात अवकाळीच्या नुकसानीचा मुद्दा काँग्रेसकडून प्रभावीपणे मांडला जाईल, अशी ग्वाही राज्याचे माजी मंत्री व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी (दि.२९) जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील बहादुरीसह निफाड तालुक्यातील कसबे-सुकेणे येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर दिली.

बाळासाहेब थोरात यांनी बहादुरी ता. चांदवड यासह परिसरातील गावांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसान झालेल्या द्राक्षबागांची पाहणी केली. यावेळी तहसीलदार व अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी आपली कैफीयत त्यांच्यासमोर मांडली. यंदा बँकेकडून पीक कर्ज घेऊन द्राक्षबागांवर केलेला सर्व खर्च वाया गेला आहे. यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता, राज्य सरकार काहीही मदत करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे बँकेचे पीक कर्ज माफ करावे, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली. थोरात यांनी सद्य:स्थितीत शंभर टक्के नुकसान झाल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचे सांगत कृषी विभागाने पंचनामे करताना वस्तुस्थितीदर्शक अहवाल तयार करावा तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो, असे स्पष्ट केले.

काँग्रेस याबाबत राज्य शासनाला दखल घेण्यास भाग पाडेल. त्यासाठी आम्ही राज्यातील सर्व विरोधी पक्षांना बरोबर घेऊन विधिमंडळात त्यावर सरकारचे लक्ष वेधू, असे आश्वासनही थोरात यांनी यावेळी दिले. यावेळी माजी आमदार शिरीष कोतवाल, राजाराम पानगव्हाणे, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, चांदवड बाजार समितीचे सभापती संजय जाधव, रमेश कहांडाळे, भीमराव जेजुरे, बाळासाहेब शिंदे, ज्ञानेश्वर गायकवाड, शिवाजी कासव, उत्तमराव ठोंबरे, अरुण पगार आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
 

Web Title: The issue of untimely damage will be effectively raised in the session says Balasaheb Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.