शिक्षक संघटना : येवल्यात आयडीबीआय बॅँकेची शाखा नसल्याने शिक्षकांची गैरसोय

By admin | Published: June 21, 2017 12:33 AM2017-06-21T00:33:39+5:302017-06-21T00:34:00+5:30

बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी

Teachers Association: Disadvantage of teachers due to IDBI bank in Yeola | शिक्षक संघटना : येवल्यात आयडीबीआय बॅँकेची शाखा नसल्याने शिक्षकांची गैरसोय

शिक्षक संघटना : येवल्यात आयडीबीआय बॅँकेची शाखा नसल्याने शिक्षकांची गैरसोय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : शिक्षकांचे पगार आयडीबीआय बँकेत होणार असल्याचा सुखावणारा निर्णय शासनाने घेतला असला तरी, आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार, असा प्रश्न येवला तालुका शिक्षक संघटनेने उपस्थित केला आहे. आयडीबीआय बँकेने येवल्यात तत्काळ शाखा सुरू करावी, अशी मागणी केली आहे.
शिक्षकांचे गेल्या पाच महिन्यांपासून पगार नाही. शासनाने उशिरा का होईना निर्णय घेतला. बुधवारी मुख्याध्यापक व शाळा यांचे संयुक्त खाते बँकेमार्फत काढण्याचे काम नाशिक येथे होणार आहे. सध्या सर्वत्र स्थानिक बँका असतानादेखील ग्राहकांना पैसे काढताना हेळसांड होत आहे. येवला शहरातील सर्व एटीएम बंद आहेत. जिल्हा बँकेत पैसे अडकले आहेत. तेदेखील काढणे जिकिरीचे झाले आहे. एटीएममध्ये खडखडाट असल्याने शिक्षक पैसे कसे काढतील? असा प्रश्न आहे. येवला तालुक्यात एकही शाखा नाही. तत्परतेने बँकेने येवल्यात शाखा उघडावी अशी मागणी राज्य शिक्षक महामंडळ प्रतिनिधी सविता साळुंके, तालुका अध्यक्ष दत्तकुमार उटावळे, यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे. थेट बँकेला संघटनेने पत्र दिले आहे.
स्टेट, महाराष्ट्र, बडोदा, देना, इंडिया आदींसह एचडीएफसी, अ‍ॅक्सिस या बँकांच्या शाखा प्रत्येक तालुक्यात असताना त्यांच्याकडे पगाराची जबाबदारी न देता ज्या बँकेच्या मर्यादित शाखा आहेत त्या बँकेला परवानगी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येवल्यासह लगतच्या तालुक्यात या बँकेच्या शाखा नसताना शिक्षकांचे पगार आयडीबीआय बँक करणार आहे. गेल्या पाच महिन्यांपासून उपाशी असलेल्या शिक्षकांनी विरोध करण्याची भूमिका घेतली नाही. शकले पडलेल्या आणि गटबाजीने पोखरलेल्या शिक्षक संघटनांनी श्रेयवादाच्या लढाईत विरोध करणे पसंद केले नाही; मात्र प्रत्यक्षात कार्यवाही कशी होते याकडे शिक्षकांचे लक्ष आहे. एकही शाखा नसताना फक्त एटीएमवरून व्यवहार करीत शिक्षकांना आयडीबीआय बँकेने अनेक सवलतींचा पाऊस पडणार असल्याचे सूतोवाच केले आहे. आगीतून उठून फुफाट्यात पडायला नका,े अशी चर्चा शिक्षकांत सुरू आहे.

Web Title: Teachers Association: Disadvantage of teachers due to IDBI bank in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.