Ramesh Singh Pardeshi's funeral funeral in Nashik | शोकाकुल वातावरणात नाशिक अमरधाममध्ये रमेशसिंह परदेशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
शोकाकुल वातावरणात नाशिक अमरधाममध्ये रमेशसिंह परदेशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

ठळक मुद्दे शेजारी राहणारे पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे घटनास्थळी धावून गेले.पारी त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा

नाशिक : धुळे ग्रामीण पोलीस दलामध्ये गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असलेले रमेशसिंह परदेशी (५८) यांनी आपल्या राहात्या घरात पिस्तुलने गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री उघडकीस आली. परदेशी हे इंदिरानगरमध्ये वास्तव्यास होते. दुपारी त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. शोकाकुल वातावरणात नाशिक अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
धुळे येथील पालेशा महाविद्यालय रस्त्यावरील जुन्या राज्य राखीव दलाच्या मैदानासमोरच्या पोलीस वसाहतीत रमेशसिंह परदेशी कुटुंबासह नोकरीनिमित्त राहात होते. चार महिन्यांनंतर ते पोलीस दलातून निवृत्त होणार होते. परदेशी यांनी पोलीस ठाण्यातून घरी आल्यानंतर रात्री एक वाजेच्या दरम्यान, आपल्या खोलीत स्वत:वर गोळी झाडून घेतली. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांच्या पत्नीने खोलीत धाव घेतली असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेले परदेशी यांना बघून हंबरडा फोडला. यावेळी त्यांच्या आवाजाने शेजारी राहणारे पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे घटनास्थळी धावून गेले. घटनेबाबतची माहिती त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रामकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांना दिली. तातडीने सर्व अधिकारी घटनास्थळी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. परदेशी यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

त्यांचे पार्थिव सकाळी इंदिरानगरमधील आत्मविश्वास सोसायटी येथे त्यांच्या मूळ निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी, ठाण्याच्या लेखाधिकारी कन्या, जावई, मुलगा, सून यांना अश्रू अनावर झाले होते. नातेवाइकांसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने त्यांच्या अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी जमले होते. दुपारी त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. नाशिक अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलाने त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर, नारायण न्याहाळदे, मंगलसिंह सूर्यवंशी यांच्यासह पोलीस अधिकारी अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. त्यांच्या मृत्यूने धुळेसह नाशिकमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

 


Web Title: Ramesh Singh Pardeshi's funeral funeral in Nashik
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.