Muhurat Makar Sankranti: Ramkunda of Nashik flown for bath | मुहूर्त मकर संक्रांतीचा : नाशिकच्या रामकुंडावर स्नानासाठी उडाली झुंबड

ठळक मुद्दे सकाळपासून भाविकांची नदीवर गर्दी बाहेरगावाहून आलेल्या पर्यटकांमुळे रामकुंडावरील वाहनतळ हाऊसफुल्ल गोदावरीवर स्नान करण्यासाठी महिला, पुरूषांची झुंबड

नाशिक : वर्षभरातील महत्त्वाच्या मुहूर्तांपैकी एक असलेला मकरसंक्रांतीचा मुहूर्त साधत बहुसंख्य नागरिकांनी गोदावरीच्या रामकुं डावर स्नानासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती.
मकर संक्रांत हा नववर्षामधील पहिला सण असतो. या सणानिमित्त नदीपात्रावर स्नान करण्याची प्रथा आहे. या प्रथेनिमित्त शहरातील गोदावरीवर स्नान करण्यासाठी महिला, पुरूषांची झुंबड उडाली होती.
सुर्याचा धनू राशीमधून मकर राशीत होणारा प्रवेशाची ही तिथी मानली जाते. या तिथीपासून सुर्य दक्षिणायनपासून उत्तरायण होत जातो.


या तिथीच्या दिवशी नदीमध्ये स्नान करण्याला शुभ मानले जाते. यामुळे भाविक मोठ्या श्रध्दने स्नान करण्यासाठी नदीवर जमले होते. यामुळे जणू कुंभमेळ्याची पर्वणी आहे, की काय असेच चित्र पहावयास मिळाले. सकाळपासून भाविकांची नदीवर गर्दी झाली होती. रामकुंड, गांधी तलाव, दुतोंड्या मारुती कुंडापर्यंत भाविक नदीकाठावर घाटावर बसून डुबकी लगावताना दिसून आले. शहरासह जिल्हाभरातून तसेच विविध राज्यांमधूनही धार्मिक पर्यटनासाठी नाशिकमध्ये आलेल्या भाविकांनी स्नानाचा आनंद लुटला. बाहेरगावाहून आलेल्या पर्यटकांमुळे रामकुंडावरील वाहनतळ हाऊसफुल्ल झाले होते. यावेळी लोटलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्याकडून वाढीव पोलीस बंदोबस्त रामकुंड परिसरात तैनात करण्यात आला होता.
अनेकांनी गोदापात्रात उतरून आंघोळ करीत गोदावरीला नमस्कार करत पुजाविधी आटोपला.