The hospitals decided to close on Sunday | रुग्णालये रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय
रुग्णालये रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय

सिन्नर : नगरपरिषद क्षेत्रात येणाऱ्या व्यावयासिक अस्थापनांना आठवड्यातून एक दिवस साप्ताहिक सुटी घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार शहरातील व्यावसायिक शुक्रवारी आपले आर्थिक व्यवसाय बंद घेऊन सुटी घेत असतात. शुक्रवारची साप्ताहिक सुटी वैद्यकीय व्यवसायिकांसाठी गैरसोयीची असल्याचे सांगत रविवारी साप्ताहिक सुटी घेण्यात येणार असून यापुढे प्रत्येक रविवारी शहरातील सर्व दवाखने बंद ठेवणार असल्याचे निवेदन सिन्नर तालुका वैद्यकीय व्यावसायिक सेवाभावी संस्थेच्यावतीने तहसीलदार नितीन गवळी यांना देण्यात आले.
यापूर्वी दर शुक्रवारी घेत असलेल्या डॉक्टरांची सुट्टी आता दर रविवारी करण्याची मागणी निवेदनात केली आहे. डॉक्टरांच्या या मागणीला शहरातील विविध संघटनांनी पाठींबा दर्शविल्याचे संमतीपत्रही निवेदनासोबत जोडले आहे.
सिन्नर शहरातील डॉक्टर दर शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी घेत होते. मात्र, डॉक्टरांना वैद्यकीय चर्चासत्रे दर रविवारी होतात. त्यामुळे सिन्नरच्या डॉक्टरांना चर्चासत्रामध्ये सहभाग घेता येत नव्हता. वैद्यकीय परवाना नूतनीकरणासाठी चर्चासत्रांचे गुणांक विचारात घेतले जात असल्याने रविवारी सुट्टीचा निर्णय घेण्यात आला. सिन्नरचा आठवडे बाजार रविवारी असूनही शहरातील बहुतांश संस्था व आस्थापने बंद असतात. सिन्नर शहरालगत माळेगाव आणि मुसळगाव या दोन औद्योगिक वसाहतींमुळे सिन्नरला शनिवारी आणि रविवारी आठवडे बाजार भरतो. त्यामुळे रविवारी दवाखाने बंद असल्याचा फारसा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना होणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.


Web Title: The hospitals decided to close on Sunday
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.