लढाऊ वैमानिक सैन्याचा कणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:44 PM2017-10-22T23:44:28+5:302017-10-23T00:18:47+5:30

भारतीय सैन्याचा कणा म्हणून लढाऊ हेलिकॉप्टरचा वैमानिक ओळखला जातो. जम्मू-काश्मीरच्या संवेदनशील भागातील सैन्य आॅपरेशनपासून तर विविध युद्धप्रसंगी लढाऊ वैमानिकांनी स्वत:ला देशसेवेसाठी सिद्ध केले आहे. ‘कॅट्स’मध्ये २००३ पासून यशस्वीरीत्या लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जात असून, सातत्याने वैमानिकांच्या तुकड्या घडविल्या जात आहेत, असे प्रतिपादन कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचे कमान्डंट ब्रिगेडियर विनोदकुमार बाहरी यांनी केले.

 Fighter pilots | लढाऊ वैमानिक सैन्याचा कणा

लढाऊ वैमानिक सैन्याचा कणा

Next

नाशिक : भारतीय सैन्याचा कणा म्हणून लढाऊ हेलिकॉप्टरचा वैमानिक ओळखला जातो. जम्मू-काश्मीरच्या संवेदनशील भागातील सैन्य आॅपरेशनपासून तर विविध युद्धप्रसंगी लढाऊ वैमानिकांनी स्वत:ला देशसेवेसाठी सिद्ध केले आहे. ‘कॅट्स’मध्ये २००३ पासून यशस्वीरीत्या लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जात असून, सातत्याने वैमानिकांच्या तुकड्या घडविल्या जात आहेत, असे प्रतिपादन कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचे कमान्डंट ब्रिगेडियर विनोदकुमार बाहरी यांनी केले.  निमित्त होते, गांधीनगर येथील ‘कॅट्स’च्या २८ व्या तुक डीचा ‘एव्हिएशन विंग’ प्रदान सोहळा व पासिंग आउट परेडचे. बाहरी यांच्या हस्ते तुकडीमधील २७ वैमानिकांना ‘एव्हिएशन विंग’ प्रदान करण्यात आली. तत्पूर्वी जवानांच्या तुकडीने लष्करी बॅन्ड पथकाच्या तालावर थाटात संचलन करत वरिष्ठ अधिकाºयांना सॅल्युट केले. दरम्यान, श्रीलंका, फिलीपिन्स, लाहोस, कंबोडिया, अफगाणिस्तान या देशांचे सैनिक देखील या सोहळ्याला विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते.  यावेळी बाहरी म्हणाले, ‘कॅट्स’मधून प्रशिक्षण घेऊन देशसेवेत दाखल झालेले वैमानिक आपले कर्तव्य भारतीय सैन्य दलात यशस्वीरीत्या पार पाडत असून मला त्यांचा अभिमान आहे. तुम्हीदेखील आपल्या प्रशिक्षण केंद्राचे नाव उज्ज्वल करत अभिमानास्पद कामगिरीचे देशसेवेसाठी योगदान द्याल, असा विश्वास आहे. मानसिक आरोग्य, कौशल्य, प्रसंगावधान, अचूक लक्ष्यभेद, निर्णयक्षमता या बाबी एका उत्कृष्ट लढाऊ वैमानिकासाठी आवश्यक असतात, असा गुरूमंत्रही त्यांनी यावेळी दिला. तसेच चार उत्कृष्ट प्रशिक्षणार्थींना स्मृतिचिन्ह व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. कॅप्टन गगनदीपसिंग यांनी प्रशिक्षण कालावधीमध्ये सर्वच विषयांमध्ये नैपुण्य प्राप्त करत अष्टपैलू कामगिरी बजावल्याने त्यांना ‘सिल्व्हर चित्ता’ स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी ‘कॅट्स’चे कमांडंट ब्रिगेडिअर विनोदकुमार बाहरी, उपकमांडंट कर्नल चांद वानखेडे, कर्नल असिमकुमार आदी उपस्थित होते. १८ आठवड्यांच्या प्रशिक्षण कालावधीत युद्धजन्य परिस्थितीत हेलिकॉप्टर चालविणे, शत्रूवर हवाई हल्ला करणे, जमिनीवरील सैन्याला वेळोवेळी विविध आव्हानांचा सामना करत रसद पुरविणे, जखमी जवानांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलविणे आदींचे सैनिकी लढाऊ विमानचालनाचे प्रशिक्षण या केंद्रातून जवानांना देण्यात आले.
‘आॅपरेशन विजय’ फत्ते
युद्धजन्य परिस्थितीमध्ये भूदलावरील जवानांच्या दृष्टीने व शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी लढाऊ हेलिकॉप्टरच्या वैमानिकांचे असलेले महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हेलिकॉप्टरची प्रात्याक्षिके सादर करण्यात आली. यावेळी ‘आॅपरेशन विजय’ची झलक उपस्थिताना दाखविण्याचा प्रयत्न जवानांनी केला. दरम्यान चित्ता, चेतक, ध्रुव या हेलिकॉप्टरच्या साहाय्याने युद्धभूमीवर तत्काळ पॅराशूटद्वारे उतरणाºया सैनिकांसह पोहचणारे जवान, चेतक द्वारे त्यांना पुरविण्यात आलेली रसद आणि शत्रूच्या छावण्यांवर सैनिकांनी चढविलेला हल्ला, अल्पवधीत शत्रूवर विजय मिळवून सैनिक आनंदाने तिरंगा फडकावून सलामी देतात. या आॅपरेशनमध्ये जखमी झालेल्या सैनिकांना पुन्हा ‘चेतक’मधून सुरक्षितरीत्या हलविले जाते. असा हा प्रात्यक्षिकांचा सोहळा डोळ्यांत साठविताना उपस्थितांच्या अंगाला शहारे आले व देशाच्या सैनिकांविषयीचा अभिमान अधिकच उंचावला.
‘सेल्फी’साठी झुंबड
४सोहळ्यानंतर मैदानातील धावपट्टीवर ठेवलेल्या चित्ता, चेतक, ध्रुव हेलिकॉप्टरसोबत ‘सेल्फी’ काढण्यासाठी जवानांसह त्यांच्या कुटुंबीयांची झुंबड उडाली होती. यावेळी काहींनी तर थेट हेलिकॉप्टरमध्ये बसून छायाचित्र काढले. एकूणच तीनही हेलिकॉप्टरचे कुतूहल कुटुंबीयांमध्ये दिसून आले. जवानांकडून कुटुंबातील सदस्यांना हेलिकॉप्टरचे वैशिष्ट्य व माहिती दिली जात होती.
परदेशी सैनिकांनाही भुरळ
विशेष निमंत्रित म्हणून सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या श्रीलंका, अफगाणिस्तान, कंबोडिया, लाहोस या देशांच्या सैनिकांनाही भारतीय सैन्याच्या ‘कॅट्स’मधील हेलिकॉप्टरची भुरळ पडल्याचे दिसून आले. सैनिकांनी हेलिकॉप्टरसोबत यावेळी ‘सेल्फी’ क्लिक केली. भारतीय आर्मी एव्हिएशनच्या जवानांनी सादर केलेल्या चित्तथरारक हवाई कसरती बघून त्यांच्याही तोंडातून ‘ग्रेट’ असेच गौरवोद्गार बाहेर पडले.

Web Title:  Fighter pilots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.