सिडकोचा पाणीप्रश्न गाजला

By admin | Published: February 29, 2016 11:43 PM2016-02-29T23:43:49+5:302016-02-29T23:44:05+5:30

प्रभाग सभा : पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नगरसेवकांमध्ये नाराजी

CIDCO water questionnaire | सिडकोचा पाणीप्रश्न गाजला

सिडकोचा पाणीप्रश्न गाजला

Next

सिडको : महापालिकेच्या वतीने आठवठ्यातून एक दिवस पाणीकपातीचा निर्णय घेतला असला तरी त्या दिवसानंतर दुसऱ्या दिवशीही पाणीपुरवठा हा विस्कळीत होत असल्याने अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराबाबत नगरसेवकांनी प्रभाग सभेत नाराजी व्यक्त केली. याबरोबरच रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांकडून हप्ते घेतले जात असल्याचा आरोपही सभेत करण्यात आला. नगरसेवक अश्विनी बोरस्ते यांनी अधिकारी कामकाजच करीत नसल्याबाबत नाराजी व्यक्त करीत सभात्याग केला.
सिडको प्रभाग सभापती कांचन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन लाखो रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. यावेळी नगरसेवक सुवर्णा मटाले यांनी पाणीप्रश्नाबरोबरच प्रभाग ४९ मधील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला. माउली लॉन्स ते प्रणय स्टँपिंग या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांचे अतिक्रमण वाढले असून, याच परिसरात विभागीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान असतानाही येथील अतिक्रमण हटविले जात नसल्याने मटाले यांनी नाराजी व्यक्त केली. याच रस्त्यावरील भाजीबाजाराबाबत नगरसेवक कल्पना पांडे यांनीही नाराजी व्यक्त केली. जुने सिडको येथील रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांचे अतिक्रमण हे दिवसेंदिवस वाढत चालल्याने या रस्त्यांने पायी चालनेही मुश्कील झाले असल्याचे पांडे यांनी सांगितले. याबरोबरच गेल्या अनेक दिवसांपासून गल्लीबोळातील कचरा उचलण्यासाठी मिनी घंटागाडीची मागणी करूनही ती सुरू करण्यात आली नसल्याने पांडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नगरसेवक लक्ष्मण जायभावे यांनी तर दैनंदिन पावती फाडणारे कर्मचारी हे चक्क भाजीपाला व्यावसायिकांकडून पैसे घेत असल्याचा आरोप केला; तर नगरसेवक उत्तम दोंदे यांनी टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करणारे कर्मचारी हे मनपाचे पाणी स्वत:च्या खासगी टँकरमध्ये टाकून मनपाची लूट करीत असल्याचे सांगत अशा कर्मचाऱ्यांची त्वरित बदली करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. नगरसेवक शीतल भामरे, शोभा फडोळ, शोभा निकम, वंदना बिरारी आदिंनीही मनपाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: CIDCO water questionnaire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.