शवागारात अद्यापही  ३४ मृतदेह पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 01:16 AM2019-07-01T01:16:25+5:302019-07-01T01:16:58+5:30

महापालिका व पोलीस प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना नेहमीच बसतो. मात्र बेवारसस्थितीत आढळलेल्या मानवी मृतदेहांचा अखेरचा प्रवासदेखील या दोन्ही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सुमारे तीन ते चार महिन्यांपासून रखडला आहे.

 34 bodies are still lying in the graveyard | शवागारात अद्यापही  ३४ मृतदेह पडून

शवागारात अद्यापही  ३४ मृतदेह पडून

Next

नाशिक : महापालिका व पोलीस प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना नेहमीच बसतो. मात्र बेवारसस्थितीत आढळलेल्या मानवी मृतदेहांचा अखेरचा प्रवासदेखील या दोन्ही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सुमारे तीन ते चार महिन्यांपासून रखडला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहाच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहर-ग्रामीण पोलिसांकडून याबाबत अंतिम अहवाल महापालिका प्रशासनाकडे सोपविला गेला नसल्यामुळे ३४ मृतदेह शवागारात पडून असल्याचे समजते.
शहरासह जिल्ह्यात अपघाती अथवा नैसर्गिकरीत्या मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची ओळख न पटल्यास त्यांचे मृतदेह येथील शवागारात पोलीस तपास होईपर्यंत ठेवले जातात. या बेवारस मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी १४ दिवसांची मुदत संबंधित पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना दिली जाते. या मुदतीत चौकशी करून ओळख पटल्यास संबंधित नातेवाइकांकडे मृतदेह सोपवावे अन्यथा तसा अहवाल महापालिका प्रशासनाकडे द्यावा, अशी याबाबत शासकीय व्यवस्था आहे. मात्र मागील काही दिवसांपासून बेवारस मृतदेहांच्या चौकशीपासून सगळ्याच बाबतीत उदासीन भूमिका शहर व ग्रामीण पोलिसांनी घेतल्यामुळे दुर्दैवी अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू पावलेल्या बेवारस, अनोळखी देहांचा अंत्यसंस्काराचा मार्ग खुला होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागारात एकूण ५६ मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे; मात्र  त्यापैकी काही कप्पे नादुरुस्त यंत्रणेमुळे वापरात आणणे प्रशासनाला शक्य होत नाही. रुग्णालयाकडून शवागाराच्या देखभाल दुरुस्तीकडे फारसे लक्ष पुरविले जात नाही. त्यामुळे शवागृहाची क्षमता संपुष्टात आली आहे. सध्या शवागारातील मृतदेहांची संख्या ३४वर पोहचली असून, यामध्ये बहुतांश देह कुजलेल्या अवस्थेपर्यंत पोहचले असून त्यांना दुर्गंधी सुटली आहे.
पावसाळ्यात परिसरात रुग्णालयातूनच साथीचे आजार पसरण्याचा धोका यामुळे निर्माण झाला आहे. बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लवकरात लवकर लावली न गेल्यास जिल्हा रुग्णालयातील वातावरण रोगट होऊन इतर रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यास विलंब होण्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी वर्तविली आहे.
मृतदेहांच्या हेळसांडचे गांभीर्य नाही
३४ मृतदेहांपैकी बहुतांश कुजलेल्या अवस्थेत आहेत. एक मृतदेह २२५ दिवसांपासून पडून आहे, तर दोन मृतदेह २०० दिवसांपासून आणि आठ ते दहा मृतदेह १५० दिवसांपासून पडून आहेत. यावरून पोलिसांकडून बेवारस मृतदेहांबाबत किती गांभीर्याने चौकशी केली जाते हे स्पष्ट होते. मृतदेहांची हेळसांड संबंधित पोलीस प्रशासनाने थांबवावी, अशी मागणी होत आहे. २० मृतदेह शहर व १४ ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील आहेत.

Web Title:  34 bodies are still lying in the graveyard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.