कोरोना रुग्णांचे मृतदेह आणले जात आहेत प्रकाशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:27 AM2021-04-14T04:27:53+5:302021-04-14T04:27:53+5:30

नरेंद्र गुरव प्रकाशा प्रकाशा : येथील अमरधाममध्ये सध्या एका दिवसाला साधारणत: पंधरा ते वीस मृतदेह जाळण्यात येत आहेत. ...

The bodies of Corona patients are being brought to light | कोरोना रुग्णांचे मृतदेह आणले जात आहेत प्रकाशात

कोरोना रुग्णांचे मृतदेह आणले जात आहेत प्रकाशात

Next

नरेंद्र गुरव प्रकाशा

प्रकाशा : येथील अमरधाममध्ये सध्या एका दिवसाला साधारणत: पंधरा ते वीस मृतदेह जाळण्यात येत आहेत.

त्यात बाहेरगावाहून येणारे मृतदेह हे योग्य ठिकाणी न जाळता रस्त्यावर व रस्त्याचा बाजूलाच जाळले जातात. त्यामुळे इतरांना त्याचा धोका होऊ नये, म्हणून अमरधाममध्ये बाहेरगावाहून येणाऱ्यांना शिस्त लावण्याची गरज आहे.

सविस्तर वृत्त असे की, सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यात महाराष्ट्र व नंदुरबार जिल्हा हिटलिस्टवर आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत, तर लोकप्रतिनिधींकडून जनजागृती सुरू आहे. मात्र, तरीही काही लोक त्याचे नियम पाहताना दिसून येत नाही.

प्रकाशा हे तीर्थक्षेत्र आहे येथे गावासह परगावातील म्हणजे नंदुरबार जिल्हा, पर जिल्हा, गुजरात, मध्य प्रदेश येथूनही अंत्यविधीसाठी लोक येतात.

कोरोना नव्हता, तेव्हा दिवसाला १० ते १५ मृतदेह अंत्यविधीसाठी दिवसभरातून येत होते. आता याची संख्या खूपच वाढली आहे.

प्रकाशा हे तीर्थक्षेत्र असल्याने तापी नदीकाठावर अंत्यविधी करण्याला महत्त्व दिले जाते. म्हणून तापी नदीचा काठावर म्हणजे पुलाखाली अमरधाम आहे या ठिकाणी अंत्यविधीसाठी चौथरे तयार केले होते. मात्र, पावसाळ्यात महापुरामध्ये काही चौथरे खराब झाले, तर काही अजून तग धरून आहेत. गावातील मंडळी ही चौथर्‍यावर आणि योग्य ठिकाणी अंत्यविधी करतात.

मात्र, सध्याच्या स्थितीला बाहेर गावाहून अंत्यविधीसाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यात कोरोनाला घाबरल्यामुळे अंत्यविधी करताना काही लोक चौथऱ्यावर न करता, अमरधामाच्या रस्त्यालगतच अंत्यविधी करीत आहेत.

काही तर अंत्यविधीची लाकडे पूर्ण जळूही देत नाहीत, तोच पळ काढत आहेत.

काही पीपीई किट घालून अंत्यविधी करीत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित झालेल्या मृतदेहावर अंत्यविधी तर केला जात नाही ना, अशी शंकाही व्यक्त होत आहे. तेव्हा येथे प्रशासनाने तत्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. कारण प्रकाशा ग्रामपंचायत कुठे-कुठे लक्ष देणार, गाव सांभाळेल की बाहेरगावाहून अंत्यविधीसाठी येणाऱ्यांना सांभाळेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गावात कोरोनाचे रुग्ण दिवसाला एक-दोन निघत आहेत. त्यामुळे गावात नियमितपणे फवारणी केली जात आहे. घंटागाडी लावून स्वच्छता व सूचनाही दिली जात आहे, यात बरीच शक्ती खर्च होते . म्हणून अमरधाम कडे तालुका किंवा जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

पीपीई किटच्या विल्हेवाटकडे दुर्लक्ष

पीपीई किट घालून अंत्यविधी करणारे काही जण तर त्या अग्नीत किट न टाकता, बाहेरच फेकून देत आहेत. त्यामुळे प्रकाशा गावाला त्याचा धोका निर्माण झाला आहे. एवढेच नव्हे, तर अंत्यविधीसाठी येणाऱ्या इतर लोकांनाही त्याचा धोका निर्माण झाला आहे.

अंत्यविधीचे नियम न पाळल्यामुळे इतरांना कोरोणाचे आमंत्रण देत तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. ज्यांना कोरोना नाही, असे प्रेत अंत्यविधीसाठी या ठिकाणी आल्यास सोबत असलेल्या लोकांना त्यांना इतरत्र होत असलेल्या अंत्यविधीचा, तसेच पीपीई किटचा धोका निर्माण होत आहे. म्हणून प्रशासनाने यात लक्ष देऊन एक नियमावली तयार करून शिस्त लावावी, अशी मागणी प्रकाशा ग्रामस्थांकडून होत आहे.

अंत्यविधीची नोंद नाही

सोमवारी ११ एप्रिल सकाळी आठ वाजता नंदुरबारकडून एक मृतदेह अंत्यविधीसाठी आला. चार जण सोबत होते. रस्त्याचा बाजूलाच आठ वाजण्याच्या दरम्यान अंत्यविधी केला व ते निघून गेलेत, अशा घटनांनी भीतीचे वातावरण तयार झाले आहे. तेव्हा कोरोनाग्रस्ताला अंत्यविधीसाठी आणू नये आणि जर पीपीई किट घालून आणलेच, तर त्याचा पुलाचा पलीकडे अंत्यविधी करावा, जेणेकरून कोरोनाचा धोका इतरांना होणार नाही, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

प्रकाशा येथील अमरधाममध्ये कोरोनाची लागण असलेल्या मृतदेहावर अंत्यविधीला अनुमती दिलेली नाही. तेव्हा परगावाहून कोणीही कोरोना लागण झालेला मृतदेह अंत्यविधीसाठी प्रकाशा येथे आणू नये.

- बी.जे.पाटील, प्रकाशा ग्रामविकास अधिकारी

प्रकाशा येथील अमरधामच्या रस्त्यावर अर्धवट जळालेली चिता. यामुळे इतरांना धोका निर्माण होत आहे

Web Title: The bodies of Corona patients are being brought to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.