मुख्य कार्यकारी अधिका-यांचे बोगस काम करणा-या समित्यांवर कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 04:22 PM2017-11-07T16:22:17+5:302017-11-07T17:16:17+5:30

मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी रखडलेल्या योजना मार्गी लावण्याचे  तसेच  गावस्तरावरील बोगस काम करणा-या पाणी पुरवठा समित्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले़ 

Order of action on committees of bogus working of the Chief Executive Officers | मुख्य कार्यकारी अधिका-यांचे बोगस काम करणा-या समित्यांवर कारवाईचे आदेश

मुख्य कार्यकारी अधिका-यांचे बोगस काम करणा-या समित्यांवर कारवाईचे आदेश

googlenewsNext
ठळक मुद्देपाणी टंचाई  संदर्भात  जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत संताप व्यक्त करून कार्यकारी अभियंत्यास धारेवर धरले़ अनेक ठिकाणी टीएसपी व समितीचा वाद तर कुठे पदाधिकारी व समिती सदस्यांचा समन्वय नसल्याने  पाणी पुरवठा योजनेचे कामे प्रलंबीत आहेत़

नांदेड : ग्रामीण भागातील अर्धवट  पाणीपुरवठा योजना, प्रलंबीत विकास कामे तसेच पाणी पुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे निर्माण झालेल्या पाणी टंचाई  संदर्भात  जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत संताप व्यक्त करून कार्यकारी अभियंत्यास धारेवर धरले़ तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी रखडलेल्या योजना मार्गी लावण्याचे  तसेच  गावस्तरावरील बोगस काम करणा-या पाणी पुरवठा समित्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले़ 

जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर  यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्व साधारण सभा  पार पडली़ यावेळी सदस्यांनी पाणी पुरवठा योजनेच्या प्रलंबीत कामासंदर्भात नाराजी व्यक्त केली़ यावर्षी ६० टक्के झालेल्या पावसामुळे पाणी टंचाईच्या झळा आतापासूनच वाडी, वस्ती, तांड्यांना बसत आहे़ ग्रामीण भागात राबविण्यात येणा-या केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना कार्यान्वित  न झाल्यामुळे कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे़ हे सर्व चित्र जि़ प़ सदस्यांनी सभागृहात उभे केले़ नरसी येथील अर्धवट पाणीपुरवठा योजनेच्या बाबतीत जि़ प़ सदस्य माणिक लोहगावे यांनी प्रश्न उपस्थित केला़ ४ कोटी ७१ लाख ५० हजार रूपयांच्या या योजनेतंर्गत ३ कोटी १८ लाख रूपये खर्च करण्यात आले असून अनेक कामे अर्धवट आहेत़ या कामाची चौकशी करावी अशी मागणी लोहगावे यांनी केली़  तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी शिनगारे यांनी  १५ दिवसाच्या आत बैठक घेवून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे सांगितले़

दरम्यान, सदस्य रामराव नाईक यांनी गावस्तरावर स्थापन केलेल्या  पाणी पुरवठा समित्यांमुळे अनेक गावातील योजना पूर्ण झाल्या नसल्याचे सांगितले़ अनेक ठिकाणी टीएसपी व समितीचा वाद तर कुठे पदाधिकारी व समिती सदस्यांचा समन्वय नसल्याने  पाणी पुरवठा योजनेचे कामे प्रलंबीत आहेत़ काही  पाणी पुरवठा समित्यांनी  बोगस  कामे केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली़  यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईची झळ बसणार नाही, याची ग्वाही देत मुख्य कार्यकारी अधिकारी शिनगारे म्हणाले,  यावर्षीचा उन्हाळा अडचणीचा ठरणार आहे़ त्यामुळे आतापासूनच कामे सुरू करा़ जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून अशा तीन - तीन महिन्याचा आराखडा तयार करा़ पाणी टंचाई असलेले गावे निवडून उपाय योजना राबवा़ काही गावात किरकोळ निधीमुळे रखडलेले कामे तातडीने पूर्ण करा़ दरम्यान,  पाणी पुरवठ्याच्या बोगस कामे करणा-या समित्यावर गुन्हे दाखल करण्याचा ठराव मंजूर केला़ सभेस जि़ प़ उपाध्यक्ष समाधान जाधव, समाज कल्याण सभापती शिला निखाते, शिक्षण सभापती माधवराव मिसाळे गुरूजी, कृषी सभापती दत्तात्रय रेड्डी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, प्रकल्प संचालक नईम कुरेशी आदी उपस्थित होते़ 

समाज कल्याण अधिका-यांना कारणे दाखवा
सर्वसाधारण सभेस गैरहजर असलेल्या समाज कल्याण अधिकारी कुंभारगावे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले़ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन शासन नियम डावलून केल्याचा आरोप रावसाहेब धनवे यांनी केला़ परंतु प्रभारी शिक्षणाधिकारी शिवाजी खुडे यांनी समायोजन शासनाच्या ३१ मार्च २०१७ च्या आदेशानुसार केल्याचे सांगितले़ 

Web Title: Order of action on committees of bogus working of the Chief Executive Officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.