मराठवाड्यातील विभागीय कार्यालयांच्या स्थलांतरणाचा घाट - अशोक चव्हाण

By admin | Published: April 22, 2017 05:46 PM2017-04-22T17:46:41+5:302017-04-22T17:46:41+5:30

नांदेड, औरंगाबाद येथील विभागीय कार्यालये स्थलांतर करण्याचा घाट घातला जात असून, मराठवाड्यातील सत्ताधारी मात्र मूग गिळून गप्प आहेत.अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे.

Ghat of migratory zonal offices in Marathwada - Ashok Chavan | मराठवाड्यातील विभागीय कार्यालयांच्या स्थलांतरणाचा घाट - अशोक चव्हाण

मराठवाड्यातील विभागीय कार्यालयांच्या स्थलांतरणाचा घाट - अशोक चव्हाण

Next

ऑनलाइन लोकमत

नांदेड, दि. 22 - एका पाठोपाठ नांदेड, औरंगाबाद येथील विभागीय कार्यालये स्थलांतर करण्याचा घाट घातला जात असून, मराठवाड्यातील सत्ताधारी मात्र मूग गिळून गप्प आहेत. त्याचवेळी मराठवाड्यातील प्रकल्पांना निधी द्यायचा नाही, विकासाचे प्रश्न प्रलंबित ठेवायाचे हा जणू सरकारचा अजेंडाच आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी  केली़.


जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकास प्रश्नासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, नांदेडमधील पत्रसूचना कार्यालय विरोधानंतरही स्थलांतरित झाले़ महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मुख्यालय, एमआयडीसीचे मुख्य अभियंता कार्यालयही औरंगाबादला स्थलांतरित झाले आहे. आता बँकांच्या विलीनीकरणानंतर स्टेट बँक आॅफ इंडियाचे झोनल कार्यालय स्थलांतरण हालचालींना वेग आला आहे़ इतकेच नव्हे, औरंगाबादचे केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे लेखापरीक्षण कार्यालयही नाशिकला हलवले जात आहे. यावर मराठवाड्यातील भाजपा-सेनेचे पदाधिकारी शांत आहेत. दिवंगत नेते डॉ़ शंकरराव चव्हाण यांनी आणलेली कार्यालये इतरत्र हलवली जात आहेत़ त्यामुळे या भागातील जनतेची गैरसोय होणार आहे.


संघर्ष यात्रेबद्दल ते म्हणाले, सरकारच्या नाकर्तेपणामुळे आम्हाला संघर्षयात्रा काढावी लागत आहे़ शेतकरी आत्महत्यांचा राज्यात उच्चांक गाठलेला असताना, सभागृहात मात्र या विषयावर बोलले जात नाही़ आत्महत्येच्या विषयावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची भाषणे सुरु आहेत़ दुसरीकडे दीड लाखांच्या कर्जासाठी शेतकऱ्याची मुलगी आत्महत्या करते़ संवेदनशीलता हरवलेल्या सरकारला सत्तेचा उन्माद आला आहे़ त्यामुळे हे मुद्दे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही संघर्षयात्रा सुरु केली आहे़ आतापर्यंत दुसऱ्या टप्प्यात जवळपास चार हजार किलोमीटरचा प्रवास झाला आहे.


मोदी, मोदी नंतर आता योगी योगी सुरु आहे, यावर ते म्हणाले, सध्याचे सरकार हे इव्हेन्ट मॅनजमेंटमध्ये गुंतले आहे़ निवडणुकीतील विजय वेगळा अन् प्रशासन चालविणे वेगळे़ हे जास्त दिवस चालणार नाही़ देशपातळीवर समविचारी पक्षांची एकत्र येण्याची मानसिकता तयार होत आहे़ त्यामुळे येत्या काळात राज्यातही सत्तापरिवर्तन होईल.


रेल्वे वेळापत्रकाच्या संदर्भाने खा़चव्हाण म्हणाले, रेल्वेचे अधिकारी अन् खाजगी ट्रॅव्हल्सचालकांमध्ये साटेलोटे आहे. नांदेडहून पुणे गाडी सोडण्यासाठी अनेक वर्षे पाठपुरावा करण्यात आला़ त्यानंतर ही गाडी सोडण्यात आली़, परंतु त्याचे वेळापत्रक नागरिकांना कसे त्रासदायक ठरेल याचीच अधिक दक्षता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घेतली़ नागपूर गाडीची अवस्थाही तशीच आहे़ गाड्या सुरु करायच्या अन् त्याबाबत प्रसिद्धीच करायची नाही़ मग प्रतिसाद भेटला नसल्याचे कारण दाखवित त्या पुन्हा बंद करायच्या असा उद्योग सुरु आहे़ यामध्ये प्रचंड आर्थिक गैरव्यवहार असून याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी मी यापूर्वीच केली असल्याचेही खा़चव्हाण म्हणाले.


दरम्यान, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासंदर्भात ते म्हणाले, प्रभू चांगले व्यक्ती आहेत, परंतु गाड्यातील टॉयलेट, वायफाय यापुढे ते जात नाहीत़ विमानसेवेचेही तसेच भिजत घोंगडे आहे़ सरकारने एअर इंडियाची दोन विमाने घेतली़, परंतु त्यातील एक विमान गुजरात आणि दुसरे आंध्र प्रदेशात देण्यात आले़ राज्यात ३० विमानतळे असताना त्याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले. नांदेडच्या धावपट्टीचे विस्तारिकरण करण्यासाठी आम्हाला भांडावे लागले. २००८ मध्ये नांदेडचे विमानतळ झाले़ या ठिकाणी नाईट लँडींगची व्यवस्था आहे, परंतु धावपट्टीचे अद्याप नूतनीकरण झाले नाही़ यावेळी माजी राज्यमंत्री आ़डी़पी़सावंत, आ़अमरनाथ राजूरकर यांची उपस्थिती होती.


परभणीत काँग्रेसला यश तर लातुरात भाजपाचा निसटता विजय

नांदेडमध्ये लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, नगरपालिका त्यापाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसला जनतेने साथ दिली़ हेच चित्र अन्यत्र का दिसत नाही ? या प्रश्नावर खा़ अशोकराव चव्हाण म्हणाले, परभणीत यश मिळाले़ लातुरातही भाजपाला निसटता विजय मिळाला़ तीन जागांचा फरक आहे़ परंतु आता विश्लेषणच सत्तेच्या बाजूने सुरु आहे़ परंतु जिथे कमी पडलो तिथे आत्मपरीक्षण करुन पुढे जाऊ़ येणाऱ्या काळात राज्यात सत्तापरिवर्तन अटळ आहे, समविचारी पक्षांना सोबत घेऊ़ परभणीमध्येही समविचारी पक्षांच्या सोबत जाण्याची तयारी आहे़ याबाबत स्थानिक पातळीवर सकारात्मक विचार होईल असेही ते म्हणाले.
 

 

Web Title: Ghat of migratory zonal offices in Marathwada - Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.