संशोधकांचा प्रयोग आर्थिकदृष्ट्या यशस्वी व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:54 AM2019-03-04T10:54:04+5:302019-03-04T10:55:17+5:30

संशोधकांनी चौकटीबाहेर जाऊन विचार करावा, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. महापौर ‘इनोव्हेशन अवॉर्डस्’चे रविवारी वितरण झाले. यावेळी ते बोलत होते.

Use of researchers to be economically successful | संशोधकांचा प्रयोग आर्थिकदृष्ट्या यशस्वी व्हावा

संशोधकांचा प्रयोग आर्थिकदृष्ट्या यशस्वी व्हावा

Next
ठळक मुद्देमहापौर ‘इनोव्हेशन अवॉर्डस्’चे वितरणविजेत्यांचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या समाजात अनेक तरुण चांगले संशोधन करीत आहेत. समाजाने व वैज्ञानिकांनी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे केवळ प्रयोगावर समाधान न मानता त्याचा समाजाला चांगला उपयोग कसा होईल व आर्थिकदृष्ट्या तो यशस्वी कसा होईल, याचादेखील विचार झाला पाहिजे. यासाठी संशोधकांनी चौकटीबाहेर जाऊन विचार करावा, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. महापौर ‘इनोव्हेशन अवॉर्डस्’चे रविवारी वितरण झाले. यावेळी ते बोलत होते.
रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला खा. विकास महात्मे, आ. मिलिंद माने, महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, मनपाचे सत्ता पक्षनेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, बसपाचे शेख मो. जमाल प्रामुख्याने उपस्थित होते. समाजात कुठलीही गोष्ट किंवा व्यक्ती टाकाऊ नसतो. प्रत्येकाचा समाजाच्या हितासाठी उपयोग होऊ शकतो. त्यासाठी संशोधकाची नजर हवी आणि मेहनत करण्याची तयारी हवी. कुठल्याही शॉर्टकटमधून शाश्वत यश मिळत नाही. त्यामुळे त्या दृष्टीने तरुणांनी विचार करावा, असे आवाहन गडकरी यांनी केले. संशोधनाची व्याप्ती आता वाढत आहे. कृषी क्षेत्रातूनदेखील इंधन तयार करता येऊ शकते. शेतकऱ्यांनी गहू, तांदळासोबतच जैवप्लास्टिक तसेच जैवइंधन तयार करण्यासाठीदेखील पुढाकार घेतला पाहिजे. मानवी मूत्रापासून ‘युरिया’ तयार होतो. स्थानिक स्वराज्य संस्थांनी मानवी मूत्र गोळा केले तर देशात ‘युरिया’ आयात करण्याची वेळच येणार नाही. दळणवळणाच्या क्षेत्रातदेखील संशोधनात प्रचंड संधी आहे. मुंबईत आता ‘वॉटर टॅक्सी’ सुरू होत आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रचंड वेळ वाचेल व झपाट्याने विमानतळापर्यंत पोहोचता येईल, असे गडकरी यांनी सांगितले. नंदा जिचकार यांनीदेखील यावेळी आपले मत व्यक्त केले.
यावेळी महापौर ‘इनोव्हेशन अवॉर्डस्’ने युवा संशोधकांचा सन्मान करण्यात आला. सोबतच विष्णू मनोहर, तनुजा नाफडे, डॉ. अविनाश जोशी, श्वेता उमरे, सुरेश शर्मा, राजकुमार खापरकर यांचादेखील सत्कार करण्यात आला. संयोजक डॉ. प्रशांत कडू व मुख्य समन्वयक केतन मोहितकर यांनी प्रास्ताविक केले. तर मनपाचे नोडल अधिकारी नितीन कापडनीस यांनी आयोजनावर प्रकाश टाकला. रेणुका देशकर यांनी संचालन केले तर मनपाचे सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी आभार मानले.

मीदेखील ‘इनोव्हेटर’च आहे
मीदेखील एक ‘इनोव्हेटर’च आहे. माझ्या कल्पनेमुळे मनपाचे दीडशे कोटी रुपये वाचत आहेत. माझ्या कल्पना या अशक्य वाटत असतात. मात्र ‘व्हिजन’ डोळ्यासमोर ठेवून व अभ्यास करून मी त्या मांडतो. मात्र काही वेळा प्रशासनातून हवा तसा उत्साह दाखविण्यात येत नाही. आता नागपुरात ‘मेट्रो’ येत आहे. त्यापुढे जात शहीद चौकासारख्या गर्दीच्या ठिकाणी जमिनीहून अनेक फूट उंचीवरून चालू शकणारी ‘डबल डेकर’ बस आणता येईल का याचा विचार सुरू आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

‘नाळ’च्या बालकलाकाराचा मनपाला विसर
‘नाळ’ चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोकळे याला मनपाने अतिथी म्हणून या कार्यक्रमाला बोलावले होते. तो आईवडिलांसह आला आणि प्रेक्षकातच बसला. मनपा प्रशासनाला त्याला अतिथी म्हणून बोलावल्याचे भानही राहिले नाही. तो उपस्थित झाला असताना त्याला व्यासपीठावरही बोलावले नाही. याबद्दल श्रीनिवास व त्याच्या आईवडिलांनी मनपाबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली.

Web Title: Use of researchers to be economically successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.