ट्रकमधून गांजाची वाहतूक, ४९५ किलो गांजा जप्त

By योगेश पांडे | Published: January 12, 2024 03:42 PM2024-01-12T15:42:55+5:302024-01-12T15:44:02+5:30

चंद्रपूर-नागपूर मार्गावरून मोठ्या प्रमाणावर गांजा वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती नागपूर ग्रामीणच्या पथकाला मिळाली.

Transportation of ganja by truck, 495 kg of ganja seized | ट्रकमधून गांजाची वाहतूक, ४९५ किलो गांजा जप्त

ट्रकमधून गांजाची वाहतूक, ४९५ किलो गांजा जप्त

नागपूर : वर्षाच्या सुरुवातीला नागपूर जिल्ह्यातून होणारी गांजाची मोठी तस्करी समोर आली आहे. ग्रामीण पोलिसांच्या पथकाने केलेल्या कारवाईत ट्रकमधून नेण्यात येत असलेला ४९५ किलोंहून अधिकचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ट्रकमध्ये वेगळा चोरकप्पा करून त्यात पोत्यांच्या माध्यमातून हा गांजा भरण्यात आला होता.

चंद्रपूर-नागपूर मार्गावरून मोठ्या प्रमाणावर गांजा वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती नागपूर ग्रामीणच्या पथकाला मिळाली. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गस्त वाढवली. रात्रीच्या सुमारास एचआर ५५-एस-२३४६ या ट्रकला नाकाबंदीदरम्यान अडविण्यात आले. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यात काहीच बेकायदेशीर आढळले नाही. मात्र सखोल पाहणी केली असता ट्रकमध्ये एक चोरकप्पा दिसून आला. त्यात प्लास्टिकच्या पोत्यांंमध्ये ४९५ किलो ६०० ग्रॅम गांजा होता. पोलिसांनी शब्बीर जुम्मे खान (३०, मनपूर करमाला, अल्वर, राजस्थान), मुनव्वर आझाद खान (२८, शहापूर नगली, मेवात, हरयाणा) तसेच गाडी मालक हाफिज जुम्मे खान (यमुनानगर, हरयाणा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किमत ४९ लाख ५६ हजार इतकी आहे.

पोलिसांनी गांजा, ट्रक व मोबाईलस ६९ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपींना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्थानिक गून्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, आशीश मोरखडे, बट्टूलाल पांडे, अरविंद भगत, गजेंद्र चौधरी, मिलिंद नांदुरकर, संजय बांते, मयूर ढेकळे, सत्यशील कोठारे, अमृत किनगे, रोहन डाखोरे, राकेश तालेवार, आशुतोष लांजेवार, सुमित बांगडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बिहारकडे चालला होता माल

संबंधित ट्रक हा विशाखापट्टणम येथून गांजाचा माल घेऊन निघाला होता व ट्रक बिहारकडे जात होता. सुनिल नामक व्यक्तीचा हा माल होता. बिहारमध्ये ट्रकचालकाला डिलिव्हरी द्यायची होती. काही महिन्यांअगोदर नागपूर शहराच्या सीमेवरदेखील मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला होता.

Web Title: Transportation of ganja by truck, 495 kg of ganja seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.