सावली झाली गायब ! नागपूरकरांनी अनुभवला शून्य सावली दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 08:32 PM2021-05-26T20:32:21+5:302021-05-26T20:33:48+5:30

zero shadow day, Nagpur news नागपूरकरांनी बुधवारी शून्य सावली दिवस अनुभवला. दुपारी ठीक १२.१० वाजता सावली शून्यावर आली. अगदी पायांखाली आली. सर्वकाही सोडून जाईल; पण सावली सोडून जात नाही म्हणतात; मात्र काही काळासाठी सावलीही सोडून गेल्याचा अनुभव खगोल अभ्यासकांनी नागपूरकरांना घडविला.

The shadow disappeared! Nagpurkars experienced zero shadow day | सावली झाली गायब ! नागपूरकरांनी अनुभवला शून्य सावली दिवस

सावली झाली गायब ! नागपूरकरांनी अनुभवला शून्य सावली दिवस

Next
ठळक मुद्देकामठी आणि कळमेश्वरमध्येही आला अनुभव

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूरकरांनी बुधवारी शून्य सावली दिवस अनुभवला. दुपारी ठीक १२.१० वाजता सावली शून्यावर आली. अगदी पायांखाली आली. सर्वकाही सोडून जाईल; पण सावली सोडून जात नाही म्हणतात; मात्र काही काळासाठी सावलीही सोडून गेल्याचा अनुभव खगोल अभ्यासकांनी नागपूरकरांना घडविला.

कोरोना प्रतिबंधामुळे बाहेर निघण्यावर बंधन असल्याने अनेक खगोलप्रेमींनी आणि विद्यार्थ्यांनी अंगणातून आणि घराच्या गच्चीवरून हा अनुभव घेतला. कुणी स्वत:ची सावली पडताळून पाहिली; तर कुणी उन्हामध्ये एखादी वस्तू ९०च्या अंशांमध्ये उभी ठेवून हा प्रयोग अनुभवला. नागपूर शहरासोबतच, कामठीमध्ये दुपारी १२.१० वाजता आणि हिंगणामध्ये १२.१२ वाजता हा अनुभव आला होता.

रमण विज्ञान केंद्राकडून फेसबुक लाईव्ह

शालेय सत्र बंद असल्याने आणि कोरोना लाॅकडाऊनमुळे एकत्र येऊन या खगोलीय घटनेचा अभ्यासपूर्ण आनंद घेता आला नाही. मात्र नागपुरातील रमण विज्ञान केंद्राने एका फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून अभ्यासक आणि विद्यार्थ्यांना याची प्रात्यक्षिके दाखविली, संवाद साधला व माहितीही दिली.

केंद्राचे तंत्र अधिकारी महेंद्र वाघ, शिक्षणाधिकारी विलास चौधरी यांनी यात सहभाग घेतला होता. यासाठी केंद्राच्या प्रांगणामध्ये विविध प्रात्यक्षिके करण्यासाठी तयारी करून ठेवली होती. दुपारी १२.१० वाजता या घटनेचा अनुभव अनेकांना घेता आला. ही घटना का घडते, खगोलीय अभ्यासासाठी याचा काय व कसा उपयोग होऊ शकतो, याबद्दल चौधरी यांनी माहिती दिली व शंकासमाधानही केले. या घटनेमागील रहस्य समजून घेण्यासाठी विद्यार्थी उत्सुक होते. अनेकांनी घरीही प्रयोग केले.

आज व उद्याही ग्रामीण भागात अनुभव

सूर्याच्या संक्रमणामुळे आणि अक्षांश-रेखांशामुळे ही खगोलीय घटना दोन दिवस नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनुभवता येणार आहे. २७ मे रोजी मौदा (१२.०९), रामटेक, पारशिवणी (१२.१०), सावनेर (१२.११) व काटोल (१२.१३) तसेच २८ मे रोजी नरखेड तालुक्यात (१२.१३) अनुभवता येणार आहे. पुन्हा १७ जुलैलादेखील हा योग आहे. मात्र पावसाळ्याच्या दिवसांमुळे तेव्हा कितपत आनंद घेता येईल, हे आजच सांगणे कठीण आहे.

Web Title: The shadow disappeared! Nagpurkars experienced zero shadow day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.