सलीम शहाला अटक

By admin | Published: July 17, 2017 02:25 AM2017-07-17T02:25:33+5:302017-07-17T02:25:33+5:30

कथित गोमांस बाळगल्याच्या आरोपावरून जलालखेडा पोलिसांनी सलीम इस्माईल शहा (रा. हत्तीखाना, काटोल)

Saleem Shaha arrested | सलीम शहाला अटक

सलीम शहाला अटक

Next

कथित गोमांस प्रकरण एक दिवसाची पोलीस कोठडी मारहाण करणारेही कोठडीत
लोकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : कथित गोमांस बाळगल्याच्या आरोपावरून जलालखेडा पोलिसांनी सलीम इस्माईल शहा (रा. हत्तीखाना, काटोल) याला शनिवारी मध्यरात्री अटक केली. त्याला रविवारी दुपारी नरखेड येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर करून त्याची एक दिवसााची पोलीस कोठडी मिळवली.

बुधवारी (१२ जुलै) ला सकाळी सलीम हा गोमांस नेत असल्याच्या संशयावरून कथित गोरक्षकांंनी त्याला भारसिंगी येथील बसस्टॉपजवळ अडविले. त्याच्या अ‍ॅक्टिव्हाची तपासणी केली. त्यात मांस आढळून येताच या कथित गोरक्षकांनी सलीमला जबर मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता. गोमांस आणि मारहाणीचे लोण देशाचे हृदयस्थळ समजल्या जाणाऱ्या नागपुरात पोहचल्यामुळे देशभर खळबळ उडाली. दरम्यान, सलीमवर नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्याला मारहाण करणाऱ्या चार आरोपींना अटक केली तर सलीमकडून त्याची अ‍ॅक्टिव्हा व मांस जप्त करण्यात आले. ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. सदर मांस हे गाईचे नसून बैलाचे असल्याचे सलिमने पोलिसांना सांगितले होते. बैलाचेही मांस बाळगणे गुन्हा असल्यामुळे जलालखेडा पोलिसांनी सलीमविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ व गोवंश हत्याबंदी कायदा २०१५ कलम ५ (क) अन्वये गुन्हा नोंदविला होता. पोलिसांना शनिवारी दुपारी प्रयोगशाळेतील तज्ज्ञांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात हे मासं ‘गोवंशाचे’ असल्याचे नमूद आहे. त्याआधारे जलालखेडा पोलिसांनी सलीमला शनिवारी मध्यरात्री १२.२१ वाजता अटक केली. त्याला रविवार दुपारी नरखेड येथील न्यायालयात हजर करण्यात आले.न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली. सोमवारी (दि. १७) त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, सलीमला माारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना घटनेच्या दिवशीच अटक केली होती. त्या चौघांनाही न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. १७) पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे त्यांनाही उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

पोलिसांची चुप्पी
या घटनेच्या संबंधाने सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. सलीम हा भाजपाचा कार्यकर्ता होता. त्याला मारहाण करणाऱ्यांमध्ये एक आरोपी प्रहार संघटनेचा पदाधिकारी आहे. या मारहाणीचे वृत्त कळताच भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून घटनेचा निषेध नोंदवला होता. सलीमला मारहाण करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणीही केली होती. मात्र, शनिवारी भाजपा पदाधिकाऱ्यांनी एक पत्रक काढून सलीमला पक्षातून काढून टाकण्यात आल्याचे म्हटले. यामुळे उलटसुलट चर्चेत आणखी भर पडली. दुसरीकडे पोलीस अधिकाऱ्यांनी चुप्पी साधली आहे. शनिवारी आणि रविवारीदेखिल या संबंधाने प्रतिक्रियेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क केला. मात्र ते उपलब्ध झाले नाहीत.

Web Title: Saleem Shaha arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.