पंपचालक पेट्रोल-डिझेल लिटरमध्ये विकण्यास तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:13 AM2019-04-19T00:13:11+5:302019-04-19T00:15:40+5:30

पेट्रोल आणि डिझेल लिटरमध्ये विक्री करण्याच्या वैधमापनशास्त्र विभागाच्या निर्णयाचे शहरातील पंपचालकांनी स्वागत केले आहे. पेट्रोल व डिझेलची विक्री रुपयांमध्ये नव्हे तर लिटरमध्ये व्हावी, यावर पंपचालक सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून माहिती देणार आहे.

The pump operators are ready to sell petrol and diesel in liter | पंपचालक पेट्रोल-डिझेल लिटरमध्ये विकण्यास तयार

पंपचालक पेट्रोल-डिझेल लिटरमध्ये विकण्यास तयार

Next
ठळक मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार : एक लिटरपेक्षा कमी विक्रीवर आपत्ती

लोकमत  न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोल आणि डिझेल लिटरमध्ये विक्री करण्याच्या वैधमापनशास्त्र विभागाच्या निर्णयाचे शहरातील पंपचालकांनी स्वागत केले आहे. पेट्रोल व डिझेलची विक्री रुपयांमध्ये नव्हे तर लिटरमध्ये व्हावी, यावर पंपचालक सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून माहिती देणार आहे.
पेट्रोल आणि डिझेल रुपयात नव्हे तर लिटरनुसार विक्री करावी, अशा संदर्भाचे पत्र वैधमापनशास्त्र विभागाचे उपनियंत्रक एस.एस. काकडे यांनी बीबीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल या तिन्ही पेट्रोलियम कंपन्यांना पाठविले होते, हे विशेष. या आधारावर त्यांनी पेट्रोलियम कंपन्यांना लिटरनुसार विक्री करण्यास सांगितले आहे.
विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी सांगितले की, शहरातील सर्वच पंपाचालक पेट्रोल व डिझेल लिटरमध्ये विकण्यास तयार आहेत. तसे पाहता मेडको, टोकेम, गिलबर्को, ड्रेसर वेन या मशीन बनविणाऱ्या कंपन्या मशीनला लिटरनुसार सेट करते. त्यांचा एमएसक्यू (मिनिमम मेजरड् क्वान्टिटी) दोन वा पाच लिटरचा असतो. यामध्ये विक्रीत कमी-जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरून मशीनची स्टॅम्पिंग लिटरमध्ये होते. नियमानुसार पंप चालविण्याची चालकांची तयारी आहे. याकरिता सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून पेट्रोल आणि डिझेलची विक्री केवळ लिटरमध्ये करण्याची परवानगी देण्याची मागणी करणार आहे. पंपचालक एक लिटरपेक्षा कमी विक्री करणार नाही, याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहे.
दंडाची तरतूद
लीगल मेट्रोलॉजी कायद्यानुसार पेट्रोल आणि डिझेलची विक्री लिटर प्रमाणात झाली पाहिजे. असे न केल्यास दोन हजार रुपये दंडाची तरतूद आहे. २०, ३० आणि ५० रुपयांचे पेट्रोल विकल्यामुळे पंपचालकांचे नुकसान होते तसेच मानवीश्रम आणि वेळ वाया जातो.
चिल्लर पैशांची तरतूद कशी होणार?
लिटरनुसार विक्री करण्यात सर्वात मोठी समस्या पेट्रोलच्या दरासंदर्भात आहे. दरदिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर पैशात वाढतात. गुरुवारी पेट्रोलचे दर प्रति लिटर ७९ रुपये ५ पैसे होते. अशावेळी ग्राहक एक लिटर पेट्रोल भरत असेल तर त्याला ९५ पैसे परत करणे कठीण होणार आहे. प्रत्येक ग्राहकाच्या संदर्भात पैसे परतीची तरतूद पंपचालक कशी करणार, हा गंभीर प्रश्न आहे. पंपावर दररोज चिल्लर गोळा करणे कठीण होणार आहे. ही बाब पंपचालकांना शक्य नाही. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर रुपयांत ठेवण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी तरतूद करावी, असे असोसिएशनचे मत आहे. त्यामुळे ग्राहकांसोबत पंपचालकांची सोय होणार आहे.

Web Title: The pump operators are ready to sell petrol and diesel in liter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.