आता नागपूरची मेट्रो रेल्वे ४१.५ किलो मीटर आणि  ४०स्थानके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 08:26 PM2017-11-22T20:26:31+5:302017-11-22T20:33:38+5:30

पूर्वीच्या ३८.५ कि़मी. आणि ३६ स्टेशनच्या तुलनेत आता मेट्रो रेल्वे पहिल्या टप्प्यात ४१.५ कि़मी. धावणार असून त्या मार्गात ४० स्थानके राहणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.

Now Nagpur's metro rail is 41.5 kms and 40 stations | आता नागपूरची मेट्रो रेल्वे ४१.५ किलो मीटर आणि  ४०स्थानके

आता नागपूरची मेट्रो रेल्वे ४१.५ किलो मीटर आणि  ४०स्थानके

googlenewsNext
ठळक मुद्देमहामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांची माहितीपहिल्या टप्प्यात ५० टक्के काम पूर्ण

आॅनलाईन लोकमत
नागपूर : पूर्वीच्या ३८.५ कि़मी. आणि ३६ स्टेशनच्या तुलनेत आता मेट्रो रेल्वे पहिल्या टप्प्यात ४१.५ कि़मी. धावणार असून त्या मार्गात ४० स्थानके राहणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.
मिहान डेपोपुढे इको पार्क आणि मेट्रो सिटीपर्यंत तीन कि़मी. अंतर वाढले आहे. कॉटन मार्केट, एअरपोर्ट साऊथ, इको पार्क आणि मेट्रो सिटी अशा चार स्टेशनचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. जमिनीवर धावणाऱ्या  मेट्रो रेल्वेची लांबी ८ कि़मी. झाली आहे. दुसऱ्या  टप्प्यात मेट्रो रेल्वेचा ५० कि़मी. विस्तार कापसी, कन्हान पूल, बुटीबोरी आणि हिंगणापर्यंत होणार आहे. नवीन मेट्रो पॉलिसीमुळे डिसेंबर अखेरपर्यंत डीपीआर तयार होईल. पहिल्या टप्प्यात मेट्रोचे डबे नागपुरात तयार होणार नाहीत, पण नवीन मेट्रो पॉलिसीमध्ये दुसऱ्या  टप्प्यात डबे नागपुरात तयार होऊ शकतात.

आरडीएसओ चाचणी पूर्ण
जमिनीवरून धावणाऱ्या  मेट्रो रेल्वेची प्रवेश चाचणी रेल्वे बोर्डांतर्गत कार्य करणाऱ्या  आरडीएसओने पूर्ण केली असून आठवड्यात प्रमाणपत्र मिळण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांतर्फे सुरक्षेच्या तपासणीसाठी चमू प्रमाणपत्र मिळाल्यानंतर येणार आहे. ही सर्व प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नवीन वर्षात अर्थात जानेवारी-२०१८ पासून मेट्रो रेल्वेची जॉय राईड सुरू होईल.

आतापर्यंत २११५ कोटी खर्च
आतापर्यंत मेट्रो रेल्वेच्या विकास कामांवर २११५ कोटींचा खर्च झाला आहे. त्यात १६०० कोटी रुपये विदेशी वित्तीय संस्था (जर्मनी व फ्रान्स)आणि ५१५ कोटी राज्य शासनाकडून मिळाले आहे. तसे पाहिल्यास एकूण खर्च २७०० कोटींचा असून त्यात जमिनीच्या किमतीचा समावेश आहे. मार्च-२०१८ पर्यंत ८०० कोटी महामेट्रोला मिळणार आहे.

स्टेशनपासून सायकलचा उपयोग
मल्टी मॉडेल इंटिग्रेशन आणि फिडर सेवेंतर्गत प्रवाशांना स्टेशनपासून ८०० मीटरचे अंतर सायकलने कापता येईल. सायकल खासगी कंपनी पुरविणार आहे. ही एक स्मार्ट डॉकलेस पब्लिक बाईक शेअरिंग योजना आहे. सायकलच्या उपयोगासाठी ५ ते १० रुपये खर्च येईल. हा प्रकल्प चिचभुवन आणि खापरी येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. चीनमधील गाँगझाऊ शहरात सर्वत्र सायकलचा उपयोग करण्यात येत असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.

५० टक्के उत्पन्न व्यावसायिक स्वरूपात
मेट्रो रेल्वेचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन व्यावसायिक स्वरूपात राहणार असून त्यासाठी मनपा आणि नासुप्रकडून कंपनीला मोक्याचे भूखंड मिळाले आहेत. त्या ठिकाणी आधुनिक स्टेशन उभारून आणि व्यावसायिक उपक्रम राबवून व्यावसायिक उत्पन्न मिळेल. सिंगापूर मेट्रो रेल्वेला ४० टक्क्यांपेक्षा जास्त व्यावसायिक उत्पन्न मिळत नाही. याशिवाय कंपनीला मिळालेल्या जागेवर हिंगणा येथे २५ हेक्टर आणि मेट्रो सिटी येथील २५ हेक्टर जागेवर निवासी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. दोन्ही प्रकल्पाचे डिझाईन हफिज कॉन्ट्रॅक्टरने तयार केले आहे. या प्रकल्पात सर्वसामान्यांना खरेदीचा पर्याय राहील. व्यावसायिक उत्पन्नामुळे तिकिटांचे दर कमी राहतील आणि प्रवासी संख्येत वाढ होईल.

सोलर पॅनल कंपनी लावणार
महामेट्रो सोलर पॅनलवर आधारित ओपन अ‍ॅसेस कॅप्टिव्ह प्रकल्प बीओटी तत्त्वावर उभारणार आहे. त्यात महामेट्रोचा १० टक्के वाटा राहील. पूर्वी महावितरणसोबत प्रकल्प उभारताना विजेचा प्रति युनिट ७.५० रुपये खर्च अपेक्षित होता. पण कंपनी स्वतंत्ररीत्या प्रकल्प उभारत असल्यामुळे कंपनीला वीज प्रति युनिट ४.५० रुपये मिळणार आहे.
पत्रपरिषदेत कंपनीचे प्रकल्प संचालक महेशकुमार अग्रवाल, संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथूर, वित्त संचालक एस. शिवमाथन आणि महाव्यवस्थापन (प्रशासन) अनिल कोकाटे उपस्थित होते.

Web Title: Now Nagpur's metro rail is 41.5 kms and 40 stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो