Nagpur | काँग्रेसच्या तंबूतून कंभाले, कवरे, मानकर गायब; कळमेश्वरजवळील फार्म हाऊसवर मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2022 11:38 AM2022-10-15T11:38:23+5:302022-10-15T16:29:22+5:30

३८ सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा

Nagpur ZP | Nana Kambhale, Pritam Kawre and Medha mankar are missing from congress tent; Stay at a farm house near Kalameshwar | Nagpur | काँग्रेसच्या तंबूतून कंभाले, कवरे, मानकर गायब; कळमेश्वरजवळील फार्म हाऊसवर मुक्काम

Nagpur | काँग्रेसच्या तंबूतून कंभाले, कवरे, मानकर गायब; कळमेश्वरजवळील फार्म हाऊसवर मुक्काम

googlenewsNext

नागपूर :जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कुठलीही फुटाफुटी होऊ नये म्हणून काँग्रेसने आपल्या सदस्यांचा मुक्काम कळमेश्वरातील अंबिका फार्म हाऊसवर हलविला आहे. मात्र, काँग्रेसचे ३३ पैकी २९ सदस्यच येथे मुक्कामी पोहोचले आहेत. शंकर डडमल (भिवापूर) हे हरीण शिकार प्रकरणी फरार आहेत. तर नाराज असलेले नाना कंभाले (कोराडी) यांच्यासह मेधा मानकर (बेसा) व प्रीतम कवरे (नरखेड) हे तीन सदस्य काँग्रेसच्या तंबूत दाखल झालेले नाहीत. या तीनही सदस्यांशी लोकमतने संपर्क केला असता, प्रतिसाद मिळत नव्हता.

शुक्रवारी दुपारी काँग्रेसचे सर्व सदस्य जि. प. अध्यक्षांच्या बंगल्यावर जमले. तेथे काँग्रेस नेत्यांनी पुन्हा एकदा मार्गदर्शन केले. यानंतर सर्व जण अंबिका फार्मसाठी रवाना झाले. रात्री माजी मंत्री सुनील केदार, राजेंद्र मुळक, सुरेश भोयर आदी नेतेही तेथे पोहचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी झालेल्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचेही चार सदस्य दुपारनंतर काँग्रेसच्या तंबूत पोहोचले. शेकापचे एक व एक अपक्ष सदस्यही तेथे पोहोचले.

गोंडवाना गणतंत्र पार्टीचे हरीश उईके हे रात्री फार्म हाऊसवर पोहचले व आपले काँग्रेसला समर्थन असल्याचे नेत्यांसमक्ष जाहीर करीत तेथून रवाना झाले. एकूण ३८ सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. पुढील दोन दिवस सदस्य तेथेच मुक्कामी राहणार असून १७ ऑक्टोबर रोजी थेट मतदानाच्या दिवशीच जिल्हा परिषदेत दाखल होणार आहेत. या फार्म हाऊसवरूनच पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींच्या निवडणुकीवर लक्ष ठेवले जात आहे.

- कंभाले उपाध्यक्षासाठी अर्ज भरणार?

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या तोंडावर काँग्रेसमधील नाराजी उघडपणे दिसून येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना कंभाले यांची पक्षाच्या बैठकीला अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत आहे. ते उपाध्यक्ष पदासाठीचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. कंभाले यांच्याशी या संदर्भात वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र ते प्रतिसाद देण्याच्या मानसिकतेत नव्हते.

- कुमरे, कोहळे की कोकड्डे

तसे काँग्रेसकडे अनुसूचित जमाती प्रवर्गातील ७ सदस्य आहेत; पण, ज्येष्ठ सदस्य शांता कुमरे, देवानंद कोहळे व मुक्ता कोकड्डे यांच्या नावांची चर्चा आहे. शांता कुमरे यांच्याबाबत बहुतांश सदस्य सकारात्मक आहेत; तर सलग तीन टर्मपासून जि. प.च्या अध्यक्षपदी महिलांची वर्णी लागली आहे. याचा विचार केला तर देवानंद कोहळे यांचीही लॉटरी लागू शकते. पण गोंडखैरी सर्कलचे सदस्य असलेल्या कोहळेंची गोटी जातवैधता प्रमाणपत्रामुळे न्यायालयात फसली आहे. त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. मुक्ता कोकड्डे या सावनेर विधानसभा सर्कलमधून येतात. सर्वाधिक मतांनी त्या निवडून आल्या आहेत; पण अनुभव कमी आहे. कोहळे व कोकड्डे या सावनेर विधानसभेतील आहेत. तर कुमरे या रामटेक विधानसभेतील. माजी मंत्री सुनील केदार यांच्या मनात उपाध्यक्ष पदाबाबत काय आहे, यावर अध्यक्षपद कुणाला द्यायचे हे अवलंबून असल्याची चर्चा जि. प. वर्तुळात आहे.

- पंचायत समिती सभापती, उपसभापतींची आज निवडणूक

जिल्ह्यातील १३ ही पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतिपदासाठी शनिवारी निवडणूक होणार आहे. काँग्रेसने काही निवडक लोकांना त्याची जबाबदारी दिली आहे. १३ पैकी १० पंचायत समित्यांवर काँग्रेसने दावा केला आहे. राष्ट्रवादीने तीन पंचायत समित्यांवर दावा केला आहे. भाजपची पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत सक्रियता दिसून येत नाही.

Web Title: Nagpur ZP | Nana Kambhale, Pritam Kawre and Medha mankar are missing from congress tent; Stay at a farm house near Kalameshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.