नागपूरच्या पंचशील चित्रपटगृहात मोठी दुर्घटना टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 11:39 PM2018-06-09T23:39:46+5:302018-06-09T23:42:37+5:30

मुसळधार पावसामुळे पंचशील चित्रपटगृहाच्या छताला गळती लागली. पीओपीच्या छताचे तुकडेही पडले. सुदैवाने छत पडले नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, संभाव्य धोका लक्षात घेत चित्रपटगृह व्यवस्थापनाने अर्ध्यावरच शो बंद करून प्रेक्षकांना चित्रपटगृहाबाहेर काढले. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे चित्रपटगृहात काही वेळेसाठी धावपळ निर्माण झाली होती.

A major accident in Nagpur's Panchsheel cinemas was avoided | नागपूरच्या पंचशील चित्रपटगृहात मोठी दुर्घटना टळली

नागपूरच्या पंचशील चित्रपटगृहात मोठी दुर्घटना टळली

googlenewsNext
ठळक मुद्देछताला गळती : पीओपीचे तुकडे : मध्यंतरानंतर शो रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुसळधार पावसामुळे पंचशील चित्रपटगृहाच्या छताला गळती लागली. पीओपीच्या छताचे तुकडेही पडले. सुदैवाने छत पडले नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, संभाव्य धोका लक्षात घेत चित्रपटगृह व्यवस्थापनाने अर्ध्यावरच शो बंद करून प्रेक्षकांना चित्रपटगृहाबाहेर काढले. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे चित्रपटगृहात काही वेळेसाठी धावपळ निर्माण झाली होती.
सीताबर्डीतील पंचशील सिनेमागृहात ‘काला’ हा हिंदी चित्रपट सध्या सुरु आहे. शनिवारी सायंकाळी ६ ते ९ चा शो सुरू झाला. चित्रपटगृहात प्रेक्षकांची मोठी गर्दी होती. दरम्यान,मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री ८ वाजताच्या सुमारास चित्रपटगृहाच्या बालकनीच्या छतातून अचानक पाणी गळू लागले. पाणी गळतीचे प्रमाण वाढले असतानाच सिलींग फॅनजवळचा पीओपीचा काही भाग तुकडे होऊन खुर्च्यांवर बसलेल्या प्रेक्षकांवर तसेच आजूबाजूला पडला तर, काही भागांना तडे गेल्याने प्रेक्षकात दहशत निर्माण झाली. परिणामी प्रेक्षकांनी आरडाओरड केली. लगेच चित्रपटगृहात गोंधळ निर्माण झाला. सुदैवाने यावेळी अर्धा चित्रपट संपला होता. त्यामुळे सर्वच प्रेक्षक बाहेर पडले. संभाव्य धोका लक्षात घेत व्यवस्थापनाने प्रेक्षकांना शांत करून काहीही धोका नसल्याचे सांगितले. चित्रपटगृहाचे व्यवस्थापक राजा लहरी यांनी चित्रपटाचा पुढचा शो रद्द करण्याची घोषणा करून रसिकांना त्यांच्या तिकिटांचे पैसे परत देण्यात येत असल्याचेही सांगितले. यानंतरचा ९ ते १२ चाही शो रद्द करण्यात आला. तिकडे मोठी दुर्घटना टळल्याची प्रतिक्रिया नोंदवत प्रेक्षक भरपावसातच चित्रपटगृहाबाहेर पडले. त्यांनी चित्रपटगृहाच्या परिसरात थांबण्याऐवजी समोरच्या उड्डाणपुलाखाली थांबणे पसंत केले. दरम्यान, गोंधळाची माहिती कळताच सीताबर्डी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला.

अफवांचा पाऊस
दरम्यान, पंचशील चित्रपटगृहाचे छत पडल्याची वार्ता वायुवेगाने उपराजधानीत पसरली. अनेक व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर तसे मेसेज व्हायरल झाल्याने अफवांचा सर्वत्र जोरदार पाऊस पडला. दरम्यान, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी चित्रपटगृहात पोहचले. मात्र, व्यवस्थापनाने त्यांना आतमध्ये जाण्यास मनाई केली. त्यांना बाहेरच थांबवण्यात आले. लोकमत प्रतिनिधीने यासंदर्भात चित्रपटाचे मालक प्रतीक मुणोत यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, ही फार मोठी घटना नाही. बालकनीतील सिलींग फॅनजवळच्या ठिकाणाहून पाणी गळती झाली. कुणाला कोणतीही दुखापत झाली नाही. खबरदारी म्हणून चित्रपटाचा पुुढचा शो रद्द करण्यात आला आहे. लगेच छत दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: A major accident in Nagpur's Panchsheel cinemas was avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.