‘व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिन’ला नागपूर विद्यापीठाकडून कायदेशीर नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 09:51 PM2017-12-07T21:51:02+5:302017-12-07T22:02:08+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने एका ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’ अ‍ॅडमिनला कायदेशीर नोटीस बजावली आहे. संबंधित ‘ग्रुप’च्या नावात ‘आरटीएमएनयू’ वापरण्यास विद्यापीठ प्रशासनाने हरकत घेतली आहे. या प्रकाराबाबत विद्यापीठ वर्तुळातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाला झाले तरी काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Legal notice from Nagpur University to 'WhatsApp Admin' | ‘व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिन’ला नागपूर विद्यापीठाकडून कायदेशीर नोटीस

‘व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिन’ला नागपूर विद्यापीठाकडून कायदेशीर नोटीस

googlenewsNext
ठळक मुद्दे‘आरटीएमएनयू’ नाव वापरण्यास हरकतप्रशासनाला झाले तरी काय?अ‍ॅन्टी‘सोशल’ पाऊल असल्याची विद्यापीठ वर्तुळातून टीका

आॅनलाईन लोकमत
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अधिकारी विकासाकडे लक्ष देण्याऐवजी स्वत:हूनच वाद उकरून काढण्यावर बहुदा जास्त भर देत आहेत. दीक्षांत समारंभात विनानिमंत्रण जेवायला आलेल्या प्राध्यापकांना नोटीस देण्यासंदर्भातील वाद ताजाच असताना एका ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’मुळे विद्यापीठातील अधिकारी अस्वस्थ झाले आहेत. संबंधित ‘ग्रुप’च्या नावात ‘आरटीएमएनयू’ वापरण्यास विद्यापीठ प्रशासनाने हरकत घेतली असून चक्क ‘व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिन’ला कायदेशीर नोटीसदेखील बजावली आहे. या प्रकाराबाबत विद्यापीठ वर्तुळातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाला झाले तरी काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य महेंद्र निंबर्ते यांनी ‘आरटीएमएनयू-ए’ या नावाचा ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’ तयार केला आहे. या ‘ग्रुप’चे ‘आयकॉन’ म्हणून नागपूर विद्यापीठाच्या इमारतीचे चित्र लावले होते. यात शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, अधिकारी तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. विद्यापीठासह समाजातील विविध घडामोडींवर येथे मतमतांतरे व्यक्त करण्यात येतात.
मात्र तीन दिवसांअगोदर महेंद्र निंबर्ते यांना धक्काच बसला. त्यांच्या भंडारा येथील निवासस्थानी कायदेशीर नोटिशीचे पत्र आले. विद्यापीठाच्या वतीने अ‍ॅड.महेंद्र लिमये यांनी ही नोटीस पाठविली होती. आमचे पक्षकार विदर्भातील नामांकित विद्यापीठ असून याला ‘आरटीएमएनयू’ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी) असे ओळखल्या जाते. मात्र याच नावाचा उपयोग करून तयार झालेल्या ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’मुळे संभ्रम निर्माण झाला असून हा विद्यापीठाचा अधिकृत ‘ग्रुप’ आहे की काय, अशी शंका अनेक सदस्यांच्या मनात उपस्थित होत आहे. त्यामुळे या ‘ग्रुप’चे नाव बदलण्यात यावे व विद्यापीठाचे छायाचित्रदेखील तीन दिवसांत हटवावे, असे नोटिसीच्या माध्यमातून बजाविण्यात आले. अशाप्रकारे ‘व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिन’ला विद्यापीठाने नोटीस देण्याची ही पहिलीच घटना आहे. या मुद्यावरून विद्यापीठ वर्तुळातदेखील खळबळ उडाली असून अनेकांनी विद्यापीठाच्या या पावलावर टीका केली आहे.

सुनील मिश्रांना ‘ग्रुप’मधून काढा
विद्यापीठाच्या जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा हेदेखील या ‘ग्रुप’चे सदस्य आहेत. मिश्रा या ‘ग्रुप’मध्ये विद्यापीठ आणि अधिकाºयांची मानहानी करणारे व तथ्यहीन ‘पोस्ट’ करतात. यामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे सुनील मिश्रा यांनादेखील ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’मधून काढण्यात यावे. जर तीन दिवसांत असे झाले नाही तर विद्यापीठाकडून फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यासंदर्भात पावले उचलण्यात येतील, असा इशारा या नोटिशीच्या माध्यमातून निंबर्ते यांना देण्यात आला आहे.

विद्यापीठाची बदनामी सहन करणार नाही : कुलगुरू
महेंद्र निंबर्ते यांना नोटीस पाठविण्याचा निर्णय प्रशासकीय आहे. यासंदर्भात कुलसचिवांनी माझी परवानगी घेतली होती. मुळात ‘आरटीएमएनयू’ म्हणजे नागपूर विद्यापीठ हे समीकरण प्रचलित असून त्यांनी विद्यापीठाचा फोटोदेखील वापरला आहे. शिवाय या ‘ग्रुप’वर विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव यांच्याविरोधात बदनामीकारक मजकूर मिश्रा यांच्याकडून टाकण्यात येतो. आम्ही गप्प बसलो तर आम्ही खरेच काही करतो की काय, अशी शंका उत्पन्न होऊ शकते. त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलले आहे. विद्यापीठाची बदनामी आम्ही सहन करणार नाही, असे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी स्पष्ट केले. कुलसचिवांशी यासंदर्भात संपर्क होऊ शकला नाही.

‘आरटीएमएनयू’चा ‘कॉपीराईट’ आहे का?
यासंदर्भात महेंद्र निंबर्ते यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ‘आरटीएमएनयू’चा आमचा ‘फुलफॉर्म’ हा ‘रिस्पेक्टिव्ह टीचर्स, मॅच्युअर नेटीझन्स अ‍ॅन्ड यू’ असा असून विद्यापीठ वर्तुळातील लोक असल्यामुळे विद्यापीठाचे छायाचित्र टाकले होते. ‘आरटीएमएनयू’ या शब्दावर विद्यापीठाचा ‘कॉपीराईट’ आहे का, असा प्रश्न निंबर्ते यांनी उपस्थित केला. नोटीस देताना नेमका काय आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला हे सांगण्यात आलेले नाही. या ‘ग्रुप’वर वर्तमानपत्रातील बातम्या टाकण्यात येतात व त्यावर चर्चा होते. विद्यापीठाने पाठविलेली ही नोटीस मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न आहे. येथील काही अधिकारी वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येऊ नयेत म्हणून ते मला विद्यापीठात येण्यापासून मज्जाव करण्याचा डाव रचत आहेत, असा आरोपदेखील निंबर्ते यांनी केला.

Web Title: Legal notice from Nagpur University to 'WhatsApp Admin'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.