नागपुरात अमानुष टोळीयुद्ध! गुंडांची गुंडांकडून सिनेस्टाईल हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 04:30 PM2017-12-19T16:30:26+5:302017-12-19T16:35:54+5:30

खापरखेडा आणि हिंगण्यातील हत्याकांडाच्या वृत्ताची शाई वाळायची असतानाच मंगळवारी पहाटे पुन्हा उपराजधानीत दुहेरी हत्याकांड घडले. गुंडांच्या एका टोळीने प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांना सिनेस्टाईल कारने उडवून दिले.

Inhuman gang war in Nagpur! Cine style murder | नागपुरात अमानुष टोळीयुद्ध! गुंडांची गुंडांकडून सिनेस्टाईल हत्या

नागपुरात अमानुष टोळीयुद्ध! गुंडांची गुंडांकडून सिनेस्टाईल हत्या

ठळक मुद्देदोघांचा मृत्यू, तिसरा गंभीर जखमीनंदनवनमध्ये पहाटे घडले हत्याकांडआधी कारने उडवले, नंतर रॉडने मारले

आॅनलाईन लोकमत
नागपूर : खापरखेडा आणि हिंगण्यातील हत्याकांडाच्या वृत्ताची शाई वाळायची असतानाच मंगळवारी पहाटे पुन्हा उपराजधानीत दुहेरी हत्याकांड घडले. गुंडांच्या एका टोळीने प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांना सिनेस्टाईल कारने उडवून दिले. अपघात घडवूनही ते जिवंतच असल्याचे लक्षात आल्याने कारमधील गुंडांनी लोखंडी रॉड काढून तिघांच्याही डोक्यावर जोरदार फटके मारले. त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. तर, तिसरा बेशुद्धावस्थेत मृत्यूशी झूंज देत आहे. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी पहाटे ४ वाजून २२ मिनिटांनी ही थरारक घटना घडली.
भुऱ्या उर्फ संजय कदोई बनोदे (वय ४०, रा. पांढराबोडी), बादल संजय शंभरकर (वय २६, रा. कुंजीपेठ) अशी मृतांची नावे आहेत. तर, राजेश हनुमंत यादव (वय ४५, रा. बाजारगाव) असे गंभीर जखमी असलेल्याचे नाव आहे.
संजय बनोदे हा खतरनाक गुंड होता. दोन वर्षांपुर्वीपर्यंत तो पांढराबोडीतील खतरनाक गुंड भुऱ्या उर्फ सेवक मसरामचा साथीदार म्हणून ओळखला जायचा. अलिकडे या दोघांमधून विस्तव जात नव्हता. दोघेही एकमेकांच्या जीवावर उठले होते. या पार्श्वभूमीवर, संजय त्याचा गुंड साथीदार बादल शंभरकर आणि राजेश यादव यांच्यासोबत स्प्लेंडरवर बसून खरबी चौकातून मंगळवारी पहाटे पारडीकडे जात होता. त्याच्या मागावर असलेले गुंड स्वीफ्ट कार (एमएच ४०/ एआर ५७२२)मधून त्यांचा पाठलाग करीत होते. खरबी चौकातून १०० मिटर अंतरावर लक्ष्मी भोजनालयाजवळ आरोपींनी भुऱ्याच्या स्प्लेंडरला जोरदार धडक मारली. त्यामुळे ते भुऱ्या, बादल आणि राजेश तिघेही खाली पडले. त्यांना फारसा मार लागला नसल्याने ते उठून उभे झाले. ते पाहून कारमधून चार गुंड उतरले. त्यातील दोघांनी लोखंडी रॉडने भुऱ्या आणि त्याच्या साथीदारांवर जोरदार हल्ला चढवला. डोक्यावर फटके पडल्याने तिघेही रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले. त्यानंतर आरोपी दुसऱ्या वाहनाने पळून गेले.

अपघाताचा बनाव
या मार्गाने जाणारांनी तब्बल २५ मिनिटानंतर कंट्रोल रूममध्ये अपघात झाल्याची माहिती कळविली. कंट्रोलमधून माहिती कळताच पहाटे ५ च्या दरम्यान नंदनवन आणि सक्करदरा पोलिसांचे गस्ती पथक तेथे पोहचले.
अपघातग्रस्त कार आणि मोटरसायकल बाजूला पडून होती. तर, रस्त्याच्या मधोमध तिघे रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. त्यातील एक जिवंत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी त्याला मेडिकलमध्ये पाठविले. त्याच्या जवळच्या मोबाईलमधून त्यांची ओळख पटली. नंतर कारच्या नंबरवरून ती गणेश मेश्राम (रा. जयताळा) याची असल्याचे स्पष्ट झाले. भरधाव वाहनाने धडक दिल्यामुळे अपघातात दोघांचा मृत्यू झाला अन् एक गंभीर जखमी झाला, अशीच माहिती पोलीसांनी वरिष्ठांना कळविली. त्यामुळे कळमना रिंग रोडवर भीषण अपघात झाल्याची चर्चा सर्वत्र पसरली. ते कळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त श्यामराव दिघावकर, परिमंडळ चारचे उपायुक्त एस. चैतन्य यांनी घटनास्थळी आणि नंदनवन ठाण्यात भेट दिली.

सीसीटीव्ही मुळे उलटला डाव
हा अपघात वाटावा, असा बनाव आरोपींनी केला होता. मात्र, ज्या लक्ष्मी भोजनालयासमोर ही थरारक घटना घडली, त्या भोजनालयाच्या सीसीटीव्हीत हत्याकांडाचे चित्रण कैद झाल्याने आरोपींचा डाव उलटला. दुसरे म्हणजे, आरोपींनी अपघाताचा बनाव करताना स्वत:च्या कारलाही ठोकून दर्शनी भागाची तोडफोड केली. त्यामुळे ती सुरूच होईना. कार बंद पडल्याने आरोपींना दुसऱ्या वाहनाने पळ काढावा लागला. अर्थात् त्यांनी आपली कार तेथेच सोडल्याने कार मालकाचे नाव स्पष्ट झाले. ती गणेश मेश्रामची असल्याचे कळाल्याने पोलीस त्याच्या घरी पोहचले. तो तेथे आढळला नाही. मेश्राम हा खतरनाक गुंड सेवक मसरामच्या टोळीतील सदस्य आहे. मसरामचे आणि भुऱ्या बनोदेचे शत्रुत्व पोलिसांच्या रेकॉर्डवर होते, या कड्या जुळत गेल्याने सेवक मसरामच्या टोळीनेच भुऱ्या आणि त्याच्या साथीदारांचा गेम केल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला. त्यानुसार, पोलिसांनी सेवकच्या घरी धडक दिली. मात्र, तो घरी आढळला नाही. त्याचा मोबाईलही बंद होता. त्यामुळे त्यानेच भुऱ्याचा गेम केल्याचा संशय पोलीस व्यक्त करीत आहेत. वृत्त लिहिस्तोवर कुणालाही अटक झालेली नव्हती.

उपराजधानीत खळबळ
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन शहरात सुरू आहे. सरकारच नागपुरात असल्याने सर्वत्र प्रचंड पोलीस बंदोबस्त आहे. अशात चार दिवसात हत्येच्या तीन घटना घडल्याने नागपुरातील गुन्हेगार किती निर्ढावलेत, त्याची प्रचिती आली आहे. शनिवारी रात्री खापरखेड्यात आकाश पानपत्ते नामक गुंडाची हत्या झाली. सोमवारी हिंगण्यात समीर शेखची हत्या झाली. तर, मंगळवारी पहाटे नंदनवनमध्ये हे दुहेरी हत्याकांड घडले. या घटनाक्रमामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

 

Web Title: Inhuman gang war in Nagpur! Cine style murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.