गुलाबी थंडी झाली रोगट; थंडी, पाऊस व ढगाळ वातावरणाचा शरीरावर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 12:38 PM2023-11-29T12:38:49+5:302023-11-29T12:41:43+5:30

सर्दी, खोकला, ताप, न्यूमोनिया, दमा, संधिवाताचा वाढला त्रास

Increase in patients of various diseases as effects of cold, rain and cloudy weather on the body | गुलाबी थंडी झाली रोगट; थंडी, पाऊस व ढगाळ वातावरणाचा शरीरावर परिणाम

गुलाबी थंडी झाली रोगट; थंडी, पाऊस व ढगाळ वातावरणाचा शरीरावर परिणाम

नागपूर : हिवाळा हा ऋतू आरोग्यास लाभदायक असतो. मात्र, ढगाळ वातावरण, पाऊस आणि वाढलेल्या थंडीमुळे तो रोगट ठरत आहे. वातावरणातील बदलांमुळे विविध आजारांच्या रुग्णांत वाढ झाली आहे. विशेषत: बालकांना सर्दी, खोकला, ताप, दमा, न्यूमोनिया, मोठ्यांमध्ये वाढलेला संधिवाताचा त्रास, तर ज्येष्ठांमध्ये कंबरदुखी, मणक्यांचे आजार बळावले आहेत.

हिवाळा हा अनेकांसाठी सर्वाधिक प्रतीक्षेत असलेला ऋतू. सुट्ट्या साजऱ्या करण्यापासून ते कौटुंबिक सहलीपर्यंत कितीतरी कारणांनी या ऋतुचा आनंद लुटला जातो. मात्र, सध्या प्रमाणाबाहेर घसरलेला पारा, ढगाळ वातावरण, त्यात पावसाची पडलेली भर, यामुळे विविध आजारांची डोकेदुखी वाढली आहे. डॉक्टरांच्या मते, सध्या लहान मुले सर्दी, खोकल्याने बेजार झाली आहेत.

- ५० ते ६० टक्के रुग्ण सर्दी, खोकला, ताप, न्यूमोनियाचे

बदलेल्या वातावरणाचा शरीरावर लवकर प्रभाव पडतो. विशेषत: लहान मुले याला लवकर बळी पडतात. परिणामी, मेयो, मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) रोज ५० ते ६० टक्के रुग्ण सर्दी, खोकला, ताप व न्यूमोनियाचे रुग्ण येत आहेत. यातील १० ते १२ टक्के रुग्णांना वॉर्डात भरती करून उपचार द्यावा लागत असल्याची माहिती आहे. या आजारांना दूर ठेवण्यासाठी थंडीपासून बचाव करावा. कुठल्याही थंड वस्तूचे सेवन करू नये. शिळे अन्न खाऊ नये. नवजात बालकांना उबदार कपड्यात गुंडाळून ठेवावे, वारंवार स्तनपान करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

- संधिवाताचा दाह वाढलेल्या रुग्णांत वाढ

थंडी वाढल्यास संधिवात म्हणजे आर्थरायटीसचे रुग्ण वाढतात असे नाही. या दिवसांमध्ये स्नायू जाड होतात, यामुळे संधिवाताचा दाह वाढतो. सध्या असलेल्या हवामानामुळे ‘ह्युमटॉइड आर्थरायटीस’ व ‘ऑस्टिओ आर्थरायटीस’चा त्रास असलेल्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. अशा रुग्णांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नियमित औषधे व नियमित व्यायाम करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

- २० टक्क्यांनी वाढले श्वसनाचे रुग्ण

श्वसनरोग तज्ज्ञ डॉ.आकाश बलकी म्हणाले, थंडीत दमा, सीओपीडी व श्वसनाच्या आजाराच्या रुग्णांत वाढ होते, परंतु सध्या असलेल्या हवामानामुळे २० टक्क्यांनी या सर्वच आजारांच्या रुग्णांत वाढ झाली आहे. विशेषत: जुना अस्थमा असलेल्यांना त्रास वाढला असून, त्यांना डोस वाढवून घेण्याची वेळ आली आहे. या वातावरणाचा सामान्यांनाही त्रास होत आहे. काहींमध्ये अस्थमाच्या सुरुवातीची लक्षणे दिसून येत आहेत. थंडीपासून बचाव व नियमित औषधे हाच यावर उपाय आहे.

Web Title: Increase in patients of various diseases as effects of cold, rain and cloudy weather on the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.