नागपुरात छेडखानीच्या घटना वाढल्या : महिलांमध्ये दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 10:32 PM2019-02-20T22:32:19+5:302019-02-20T22:33:13+5:30

शहरात छेडखानीच्या घटना सातत्याने वाढत असून, महिलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. नुकतीच एका अल्पवयीन मुलीसह चार महिलांची छेडखानी करण्यात आली.

Eve teasing incident in Nagpur increased, women panic | नागपुरात छेडखानीच्या घटना वाढल्या : महिलांमध्ये दहशत

नागपुरात छेडखानीच्या घटना वाढल्या : महिलांमध्ये दहशत

Next
ठळक मुद्देअल्पवयीन मुलीसह चौघींची छेडखानी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात छेडखानीच्या घटना सातत्याने वाढत असून, महिलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. नुकतीच एका अल्पवयीन मुलीसह चार महिलांची छेडखानी करण्यात आली.
अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे एका आरोपीस रंगेहात पकडण्यात आले. नागरिकांनी त्याची धुलाई केली. ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाणे परिसरात घडली. पीडित १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही अकरावीची विद्यार्थिनी आहे. शाळेत आणि शिकवणी वर्गात ये-जा करीत असताना चार युवक तिची नेहमीच छेडखानी करायचे. १४ फेब्रुवारीपासून हा प्रकार सुरू झाला. त्यांनी विद्यार्थिनीला रस्त्यात थांबवून तिच्याशी आपत्तीजनक व्यवहार केला. विद्यार्थिनीने प्रतिसाद न दिल्याने तिची छेडखानी करू लागले. तिने दुर्लक्ष केल्याने आणखी त्रास देऊ लागले. ते हुडकेश्वर येथील दुर्गानगर उद्यानाजवळ तिची प्रतीक्षा करीत उभे राहत होते. त्रस्त होऊन विद्यार्थिनीने घरच्यांना सर्व प्रकार सांगितला. बुधवारी रात्री तिचे कुटुंबीय तिच्यावर लक्ष ठेवून होते. रात्री ८.३० वाजता दुर्गानगर उद्यानाजवळ वर्धा येथील २५ वर्षीय अस्मित वसंतराव भगत तिची छेडखानी करू लागला. तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी त्याला पकडले. आरडाओरड ऐकून नागरिक जमा झाले. खरा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी आरोपीची धुलाई केली. अस्मित परिसरातच राहतो. तो बीबीएचा विद्यार्थी आहे. घटनेपासून त्याचे साथीदार फरार आहेत.
दुसरी घटना बजाजनगर येथील रहिवासी असलेल्या एका तरुणीशी फेसबुक फ्रेण्डशिपमध्ये घडली. २२ वर्षीय तरुणीची दीड वर्षांपूर्वी रमेशकुमार माली नावाच्या युवकाशी फेसबुकवर मैत्री झाली. दोघांनीही एकमेकांना मोबाईल नंबर दिले. यानंतर फोनवर बोलणे सुरू झाले. कथित रमेशकुमारने तरुणीशी लग्न करण्याची इच्छा दर्शविली. तरुणीने नकार दिला. यानंतर तो तिच्यावर दबाव टाकू लागला. त्यामुळे ती त्याला टाळू लागली. तेव्हा तो तिला धमकावू लागला. त्रस्त होऊन तरुणीने फेसबुक अकाऊंट डिलीट करून आपला मोबाईलनंबरही बंद केला. यामुळे दुखावल्या गेलेल्या आरोपीने तरुणीच्या नावाने बोगस फेसबुक अकाऊंट बनवले. त्यासाठी तिच्या फोटोचा वापर करून तिला कॉलगर्ल असल्याचे दर्शविले. संपर्कासाठी तिच्या मैत्रिणीचा मोबाईल नंबरही त्यात टाकला.
बोगस अकाऊंटवरून तरुणीच्या मैत्रिणीला आपत्तीजनक फोन येऊ लागले. फटकारले असता संपर्क करणाऱ्यांनी तरुणीच्या नावावर असलेल्या फेसबुकची माहिती दिली. तेव्हा खरा प्रकार लक्षात आला. तरुणीने बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी छेडखानी, बदनाम करणे, धमकावणे आणि आयटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी युवक हा राजस्थानचा असल्याचे सांगितले जाते.
तिसरी घटनेतील पीडित २८ वर्षीय महिला जरीपटक्यात राहते. ती चार वर्षांपासून सिरसपेठ येथील साजन ब्राम्हणकरसोबत लिव्ह इन-रिलेशनमध्ये राहत होती. साजनने स्वत:ला अविवाहित असल्याचे सांगितले होते. तो विवाहित असल्याचा संशय आल्याने, पीडितेने २९ मार्च २०१८ रोजी लग्न करण्याबाबत विचारले. तेव्हा साजनने तिला कुठलाही प्रतिसाद न देता निघून गेला. यानंतर १६ सप्टेंबर २०१८ रोजी साजनची पत्नी प्रियाने पीडितेला फेसबुकवर फ्रेण्ड्स रिक्वेस्ट पाठविली. ती स्वीकार केल्यानंतर प्रियाच्या प्रोफाईलवरून ती साजनची पत्नी असल्याचे उघडकीस आले. पीडित महिलेने साजनला फोन केला तेव्हा तिचे प्रियासोबत बोलणे झाले. प्रियाने पीडित महिलेला शिवीगाळ करीत धमकावले. तेव्हापासून प्रिया आणि साजन पीडितेला फेसबुकवर अश्लील मॅसेज पाठवून त्रास देऊ लागले. पीडित महिलेनुसार प्रिया तिला असाध्य रोग झाल्याचे सांगून बदनाम करू लागली. तिचे म्हणणे होते की, तिचे गर्भाशय काढण्यात आले. तिला निपुत्रीक जीवन जगावे लागू शकते. आरोपींच्या कृत्यामुळे त्रस्त होऊन पीडितेने जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्याचप्रकारे सदर येथील २७ वर्षीय तरुणीचे लग्न उत्तराखंड येथील ३५ वर्षीय वसीम कुरैशी याच्याशी ठरले होते. वसीम कुठलाही कामधंदा करीत नसल्याने तरुणीच्या घरच्यांनी लग्न तोडले होते. त्यामुळे वसीम दुखावला होता. दरम्यान तरुणीचे दुसऱ्या ठिकाणी लग्न पक्के झाले. वसीमचेही लग्न झाले होते तरी वसीम तिला अश्लील मॅसेज पाठवून त्रास देऊ लागला. तरुणीने आपल्या कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला. त्यांनी वसीमला समजाविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने ऐकले नाही. तो तरुणीला बदनाम करण्यासाठी दुष्प्रचार करू लागला. त्याने पत्नीसह तरुणीच्या भावी पतीची भेट घेतली. त्यांना तरुणीबाबत खोटी मोहिती देऊन बदनाम केले. याची माहिती होताच तरुणीने सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

 

Web Title: Eve teasing incident in Nagpur increased, women panic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.