सिम स्वॅप आणि सिम एक्सचेंजच्या माध्यमांतून ‘हातोहात’ दरोडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 06:04 AM2018-12-23T06:04:00+5:302018-12-23T06:05:09+5:30

नवा मोबाइल घेताना आपण आधी त्याची फीचर्स जाणून घेतो; पण त्याच्या सुरक्षेची माहिती घेतो? - मोबाइल सिम स्वॅप किंवा एक्सचेंजच्या माध्यमातून आता आपल्यावर गंडा घातला जातोय.

Sim swap and sim exchange fraud | सिम स्वॅप आणि सिम एक्सचेंजच्या माध्यमांतून ‘हातोहात’ दरोडा!

सिम स्वॅप आणि सिम एक्सचेंजच्या माध्यमांतून ‘हातोहात’ दरोडा!

googlenewsNext
ठळक मुद्देसिमचा वापर करून सिम स्वॅप किंवा सिम एक्सचेंज फ्रॉडसारखे गुन्हे सहजरीत्या केले जातात.

-अ‍ॅड. प्रशांत माळी

काळ बदलतो तसे तंत्रज्ञान बदलते आणि गुन्ह्यांचे स्वरूपही बदलते. आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा आपल्याला होतोच; पण हे तंत्रज्ञान आपल्याबरोबर तंत्रज्ञानाच्या दुष्परिणामांचे गाठोडेही सोबत घेऊन येते. आपण विचारही करू शकत नाही इतक्या वेगाने तंत्रज्ञान अपडेट होत आहे. आपला दोष हाच की या तंत्रज्ञानाबरोबर आपण स्वत:ला अपडेट करत नाही. गुन्ह्यांची सुरुवात इथूनच होते.
साधी मोबाइलची गोष्ट. बाजारात आलेला नवा, हटके फीचर्स असलेला मोबाइल आपल्याला हवा असतो. बऱ्याचदा आपण तो घेतोही. त्यातल्या ई- सुविधांचा वापर करतो, नवीन फीचर्स, त्यातल्या बारीक-सारीक गोष्टींची विचारपूस करतो, त्या जाणून घेतो; परंतु आपल्यापैकी कोणीही ते सुरक्षित कसे वापरायचे हे विचारत नाही किंवा समजून घेत नाही. कारण कोणाला त्याची गरजच वाटत नाही.
मुळात मोबाइलच्या माध्यमातूनही खूप मोठे फ्रॉड होतात, हेच अनेकांना माहीत नाही. ज्या मोबाइल सिमद्वारे आपण एकमेकांशी संवाद साधतो त्याच सिमचा वापर करून सिम स्वॅप किंवा सिम एक्सचेंज फ्रॉडसारखे गुन्हे सहजरीत्या केले जातात. अशा प्रकारच्या फ्रॉडमध्ये कोणाची तरी संपूर्ण आयुष्याची जमा पुंजी बॅँक खात्यातून अवैधरीत्या हस्तांतरण केली जाते.
मोबाइल फ्रॉड नेमके होतात कसे?
१. फसवणूक करणारा तुमची सगळी वैयक्तिक माहिती अवैधरीत्या गोळा करतो. बनावट ई-मेलद्वारे, बनावट फोन कॉल करून, ट्रोजन/मालवेअर असलेला ई-मेल पाठवून किंवा सोशल मीडियाद्वारे तुमची बारीक बारीक माहिती तो जमा करतो व या माहितीच्या मदतीने तुमच्या बॅँक खात्याच्या संदर्भातील सगळा तपशील जमा करत राहतो.
२. एकदा का तुमची वैयक्तिक माहिती मिळाली की फसवणूक करणारा तुमच्या नावाचा वापर करून बनावट कागदपत्रं तयार करतो व मोबाइल आॅपरेटरशी संपर्क करून असे भासवतो की तोच खरा ग्राहक आहे. फोन हरवला आहे किंवा खराब झाला आहे, अशी खोटी कारणे देऊन मोबाइल आॅपरेटरला सिम कार्ड ब्लॉक करण्याची विनंती तो करतो.
३. नवीन सिमसाठी खोट्या कागदपत्रांचा वापर करून फसवणूक करणारा डुप्लिकेट सिमकार्ड घेतो. मोबाइल गॅलरीमध्ये काम करणारा कर्मचारी कागदपत्रे बघून डुप्लिकेट सिमकार्ड देतातदेखील, कारण कागदपत्रांची सहानिशा करणे खूप कठीण असते. ती खरी की खोटी हे पटकन ओळखता येत नाही. एकदा हे डुप्लिकेट सिम मिळाले की फसवणूक करणाºयाचे काम खूपच सोपे होते. ते सिम तो स्वत:च्या मोबाइलमध्ये चालू करतो; पण खºया ग्राहकाच्या फोनचे नेटवर्क लागेच जाते व त्याला कोणत्याही प्रकारचे फोन, मेसेजस येणे बंद होते. साधारणत: फसवणूकदार असे गुन्हे करण्यासाठी शुक्र वार किंवा शनिवार संध्याकाळ निवडतो जेणेकरून पुढील वार हा सुट्टीचा असतो व खरा ग्राहक मोबाइल गॅलरीपर्यंत पोहोचू शकत नाही.
४. फसवणूक करणारा महाठग नवीन सिमच्या मदतीने वनटाइम पासवर्ड स्वत:च्या मोबाइलवर मिळवतो व त्याच्या साहाय्याने आॅनलाइन आर्थिक व्यवहार पूर्ण करतो. हा वनटाइम पासवर्ड खºया ग्राहकापर्यंत पोहचतच नाही कारण त्याचा फोन बंद असतो.
सिम स्वॅप किंवा सिम एक्सचेंजसारखे फ्रॉड साधारणत: दोन टप्प्यामध्ये पार पडले जातात. पहिल्या टप्प्यात फ्रॉड करण्यासाठी लागणारा महत्त्वाचा डेटा म्हणजे बॅँक खात्याची गोपनीय माहिती व दुसरा म्हणजे मोबाइलवर येणारा वनटाइम पासवर्ड. ज्याद्वारे फसवणूक करणारा अवैध आॅनलाइन व्यवहार करून आपल्याला गंडा घालू शकतो. त्यामुळे नवा, आधुनिक मोबाइल घेणार असाल, तर त्याची फीचर्स जाणून घेण्याआधी त्याच्या सुरक्षेचे उपाय आधी जाणून घ्या.
(लेखक ज्येष्ठ सायबर कायदातज्ज्ञ आहेत.)

manthan@lokmat.com

Web Title: Sim swap and sim exchange fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.